आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

कमी पाण्यामध्ये उत्पादन देणाऱ्या फळ पिकांमध्ये आवळ्याची शेती महत्त्वाची ठरते. आवळ्याच्या उत्पादनाला प्रक्रियेची जोड दिल्यास चांगला उद्योग उभा राहू शकतो. आवळा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्राची माहिती या लेखामध्ये आपण घेऊ.
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

आपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय औषधांचा भाग असलेल्या आवळ्याचे शास्त्रीय नाव इम ब्लीका फिलॅन्थस असे आहे. भारतात आवळा फळाची लागवड उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये केली जाते.  आवळा फळाखालील एकूण क्षेत्रफळ सुमारे ५० हजार हेक्टर असून, वार्षिक उत्पादन सुमारे २ लाख टन फळ आहे.   विविध प्रदेशामध्ये आवळ्याला आमला, अओनला, अमलिका या नावाने ओळखले जाते. त्याच प्रमाणे भारतीय गुझबेरी या नावानेही आवळ्याची ओळख आहे. जागतिक पातळीवर ''इंडोनेशिया'' हा देश आवळा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असून, भारताचा तिसरा क्रमांक लागतो. सामान्यतः जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आवळा लागवड केली जाते. उदयपूर येथे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लागवड होते. लागवडीपासून साधारण २ वर्षानंतर आवळा फळांचे उत्पादन मिळण्यास सुरवात होते. फळाची काढणी फिकट हिरव्या पिवळ्या रंगाचे होताच साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते. आवळ्यावर प्रक्रियेसाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. त्यात सामान्यतः खालील यंत्राचा समावेश असतो.  आवळा स्वच्छ करण्याचे यंत्र (वॉशर) आवळा फळांची स्वच्छता आणि धुण्यासाठी वॉशर हे उपकरण वापरतात. या यंत्रामध्ये आवळे टाकल्यानंतर त्यावरून नोझलच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते. या उपकरणाच्या मदतीने प्रति तास ६० ते ८० किलो आवळे स्वच्छ केले जातात. संपूर्णपणे स्टेनलेस स्टील पासून बनवल्या जाणाऱ्या यंत्राला २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असते. यंत्राला ०.५ एचपी विद्यूत मोटार जोडलेली असते. यंत्राचा आकार हा ४ बाय २ फूट एवढा असून, यंत्राचे वजन हे ९० किलो असते. यात विविध क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध असून, त्याच्या किमती ५० हजार रुपयापासून सुरू होतात. आवळा फळ टोचण्याचे यंत्र (पंचिंग मशिन) लोणची व कॅण्डी बनवण्यासाठी आवळ्याला टोचे मारले जातात. हे काम हाताने करताना हाताला इजा होण्याची शक्यता असते.  आवळा पंचिंग  हे उपकरण आवळा फळ टोचण्यासाठी वापरले जाते. या यंत्रामध्ये वरील बाजूने आवळा टाकला जातो. आतमध्ये लावलेल्या धारदार खिळ्याच्या साह्याने आवळ्याला छिद्रे पाडली जातात. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असून, यंत्राची क्षमता प्रति तास ८० किलो इतकी आहे. विजेवर चालणाऱ्या या यंत्रामध्ये १ एचपी विद्यूत मोटार जोडलेली असते. यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागत असून, ते सिंगल फेजवर चालते. यंत्राचे वजन ४० किलो आहे. बाजारामध्ये उपलब्ध या यंत्रांची किंमत ३० हजारापासून सुरू होते. आवळा पंचिंगसाठी मनुष्यचलीत यंत्रही उपलब्ध आहे. त्याची किंमत १० हजार रुपये आहे.  आवळा फळ फोडण्याचे यंत्र (ब्रेकिंग मशिन) आवळा प्रक्रियेमध्ये फोडलेल्या आवळ्याचा वापर कॅण्डीसह अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आवळ्याचे तुकडे करताना आतील बियाणांना इजा होऊन चालत नाही. कारण इजा झालेल्या वा खराब झालेल्या बिया यांचा वापर बियाणांसाठी करता येत नाही. यंत्रामध्ये  बियाण्याची क्षमता आणि औषधी गुणधर्म घटणार नाहीत, याची काळजी घेतलेली आहे. यंत्रातून प्रति तास २०० किलो आवळा फळे फोडली जातात. या यंत्राला अर्धा एचपी क्षमतेची विद्यूत मोटार वापरलेली आहे. या यंत्रांचे काही भाग हे फूड ग्रेड स्टीलपासून बनवलेले आहेत. हे यंत्र सिंगल फेज वर चालत असून, त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागते. सध्या बाजारामध्ये या यंत्राची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे.  आवळा बियाणे वेगळे करण्याचे यंत्र (श्रेडिंग मशिन ) आवळा श्रेडिंग मशिनचा वापर आवळा फळ फोडून त्यातील लगदा आणि बियाणे वेगळे करण्यासाठी होतो. हे दोन्ही घटक वेगळे करताना त्यांचे औषधी गुणधर्म व बियाणांची गुणवत्ता कमी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. आवळा लगद्याचा वापर मिठाई उद्योगामध्ये केला जातो. हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवले जात असल्याने गंज प्रतिरोधक आहे. या यंत्राची क्षमता प्रति तास २५० किलो इतकी आहे. या यंत्राचे वजन ४० किलो आहे. या यंत्रांतर्गत अर्धा एचपी क्षमतेची विद्यूत मोटार असते. हे यंत्र थ्री फेज वर चालत असून, अर्धस्वयंचलित आहे. बाजारामध्ये या यंत्राची किंमत ४५ हजार रुपये आहे.  आवळा फळाचा लगदा वेगळे करण्याचे यंत्र (पल्पर) आवळा फळातील तंतूमय पदार्थ (फायबर) आणि वरील आवरण वेगळे करावे लागतात. असा लगदा काढण्यासाठी पल्पर या यंत्राचा वापर करतात. उत्पादनाची गुणवत्ता आवळा फळाचा प्रकार आणि आकार यावर अवलंबून असते. या यंत्राच्या क्षमतेनुसार प्रति तास ५०० ते ५००० किलो इतका लगदा तयार होऊ शकतो. क्षमतेनुसार त्याच्या विविध श्रेणी असून, साधारणपणे ७.५ एचपी क्षमतेची विद्यूत मोटार त्यात वापरलेली असते. बाजारामध्ये ५० हजार रुपयांपासून पुढे श्रेणी व क्षमतेनुसार या यंत्राची किंमत वाढत जाते. आवळा रस काढण्याचे यंत्र (ज्यूस एक्स्ट्रॅक्टर) फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आलेल्या रस काढण्याच्या यंत्राचा वापर आवळा प्रक्रिया उद्योगामध्ये केला जातो. हे यंत्र अन्य फळांचा रस काढण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. या मशिनमध्ये कच्चा माल (आवळा फळ) हॉपरमध्ये टाकले जाते. त्यावर स्क्रूच्या मदतीने दबाव टाकला जातो. त्यातून निघणारा रस गाळण यंत्रणेतून तळाशी असलेल्या भांड्यामध्ये वेगळा होतो. या यंत्राच्या साहाय्याने प्रति तास २०० ते २५० किलो इतका रस तयार होतो. यात ३ एचपी क्षमतेची मोटार वापरलेली असून, २२० ते  २४० होल्ट इतकी ऊर्जा आवश्यक असते. या यंत्राची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे. आवळा रस काढण्याचे यंत्र  (हायड्रॉलिक प्रेस मशिन )  हायड्रॉलिक प्रेस या यंत्राचा उपयोग आवळा फळापासून रस काढण्यासाठी केला जातो. आवळा फळापासून रस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या आवळ्याचा वापर कॅण्डी बनविण्यासाठी केला जातो. हायड्रोलिक प्रेस मशिन पास्कलच्या नियमाने कार्य करते. हायड्रॉलिक प्रेस मशिन पंपाच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समान दाब आवळा फळावर तयार करते. त्यातून बाहेर पडणारा रस गाळण यंत्रणेतून तळाशी असलेल्या भांड्यामध्ये काढला जातो. या यंत्राने २ मिनिटाला सुमारे १० किलो रस काढला जातो. तसेच स्वयंचलित प्रकारात २० ते ४० टन क्षमतेचे हायड्रोलिक प्रेस उपलब्ध आहेत. अर्ध स्वयंचलित व मानवी पद्धतीने काम करणारी यंत्रे विविध श्रेणीमध्ये ( क्षमतेनुसार १ किलोपासून १०० किलोपर्यंत ) उपलब्ध आहेत. उत्पादनाच्या वैशिष्ट्यांनुसार या यंत्राची किंमत २० हजारपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत आहे.      आवळा रस बाष्पीभवन करण्याचे यंत्र  (स्टीम जॅकेटेड कॅटल)  स्टीम जॅकेटेड कॅटल किंवा बाष्पीभवन पॅन हे एक बाष्पीभवन तंत्रावरील यंत्र आहे. विविध प्रक्रिया उद्योगामध्ये या किटल्यांचा वापर केला जातो. आवळा रस निर्मितीमध्ये यात रसाला एकसमान उष्णता देण्यासाठी वाफेचा वापर केला जातो. वाफेचे तापमान सामान्य पाण्याच्या तापमानापेक्षा अधिक असते. त्यामुळे रस वेगाने गरम होतो. या किटलीचा आकार ५ ते २०० गॅलनपर्यंत उपलब्ध आहे. सामान्यपणे ४० गॅलन क्षमतेच्या किटल्यांचा वापर बहुतांश खाद्य व्यावसायिक करतात. साध्या टेबल टॉप प्रकारच्या किटल्यांमध्ये १२ गॅलनपर्यंत उत्पादनक्षमतेच्या किटल्या उपलब्ध आहेत. या यंत्राची किंमत ४७ हजार रुपयापासून पुढे क्षमतेनुसार वाढत जातात. आवळा रस साठवण टाकी (स्टोअरेज टँक) प्रक्रियायुक्त आवळा रस किंवा लगदा पदार्थ साठवण्यासाठी व त्यांचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या साठवण टाक्यांचा वापर केला जातो. ही टाकी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. साठवण टाकीचे उभे आणि आडवे असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडील जागेनुसार आपण निवडू शकतो. यंत्राच्या आडव्या प्रकारामध्ये उभ्या प्रकारापेक्षा जास्त जागा लागते. आपल्या मागणीनुसार ५०० लिटरपासून पुढे विविध क्षमतेच्या साठवण टाक्या मिळू शकतात. यंत्राला आतमध्ये एक एजिटेटर (फिरणारा पंखा) जोडलेला असतो. यंत्राला कंट्रोल पॅनेल जोडलेला असून त्याद्वारे यंत्रांचे तापमान नियंत्रित करता येते. साध्या टाकीपेक्षा या साठवण टाकीत साठवलेल्या रसाची टिकवण क्षमता अधिक असते. ही टाकी प्रत्येक वापराआधी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेणे गरजेचे असते.    साठवण टाकी ही अर्धस्वयंचलित आहे. या टाकीची किंमत ३५ हजारांपासून पुढे आहेत.     आवळा वाळवणी यंत्र (ट्रे ड्रायर) पदार्थातील ओलावा कमी करून पदार्थ सुकविण्यासाठी या यंत्रामध्ये उष्ण हवेचा वापर केला जातो. या यंत्रामध्ये गरम हवा सातत्याने प्रवाहित केली जाते. आपल्या आवश्यकतेनुसार हवेचे तापमान ठरवता येते. आवळा फळ सुकविण्यासाठी सामान्यतः ५० ते ७० अंश सेल्सिअस तापमानाचा वापर करतात. अधिक तापमानामध्ये वेगाने आवळे वाळवल्यास वजनामध्ये घट येते. उदा. ५० अंश सेल्सिअस तापमानावर कोरड्या केलेल्या आवळा फळाचे अंतिम वजन १२.९६ ग्रॅम असते. ६० अंश सेल्सिअस तापमानावर १२.९२ ग्रॅम असते. तर ७० अंश सेल्सिअस तापमानात १२.९० ग्रॅम असते. या यंत्राच्या मदतीने प्रत्येक बॅचमध्ये ६० ते २४० किलो आवळा फळे वाळवता येतात. त्यासाठी १० ते ३६ किलो स्टीम (वाफ) प्रति तास वापरली जाते. तर ९ ते ३० किलोवॅट उष्णता ऊर्जा वापरली जाते. हे उपकरण ७५ हजार या किमतीत बाजारात उपलब्ध आहे.       प्रक्रियायुक्त पदार्थ पॅक करण्यासाठीचे यंत्र (पॅकेजिंग मशिन) आवळ्याच्या विविध प्रक्रिया उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी विविध प्रकारच्या पॅकेजिंग यंत्राचा वापर केला जातो. त्यात सीलिंग मशिन, फिलिंग मशिन, स्ट्रेपिंग मशिन, रॅपिंग मशिन, कोडिंग मशिन आणि लेबलिंग मशिन इ. यंत्राचा समावेश आहे. संपूर्णपणे स्वयंचलित यंत्राने या सर्व क्रिया एकत्रितपणे केल्या जातात. त्याद्वारे प्रति तास ५०० किलोपर्यंत प्रक्रियायुक्त पदार्थ पॅक होतो. या मशिनची उंची ३.५० फूट व लांबी १.५० फूट आहे. हे यंत्र बाजारात ६० हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. आपल्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कामांसाठी हस्तचलित वेगवेगळी यंत्रेही उपलब्ध आहेत. लघू उद्योगासाठी त्यांचा वापर करणे शक्य आहे.          सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (संशोधन विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय,  प्रयागराज, उत्तरप्रदेश.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com