सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

सुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. सुपारीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. त्यासाठी आवश्यक यंत्राची माहिती या लेखातून घेऊ.
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

सुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. सुपारीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. त्यासाठी आवश्यक यंत्राची माहिती या लेखातून घेऊ.               सुपारी (शा. नाव ः अरेका कॅटेचू) हे भारत, चीन बरोबरच दक्षिण पूर्व आशियातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे उष्ण कटिबंधीय पीक आहे. जागतिक पातळीवर चीन आणि बांगलादेशनंतर भारत देश हा सुपारी उत्पादनात आघाडीवर असून, इंडोनेशिया, म्यानमारमध्येही सुपारीचे उत्पादन घेतात. भारतातील कर्नाटक, केरळ, आसाम, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराच्या काही भागात लागवड केली जाते. भारतात ३.३ लाख टन सुपारी उत्पादन २.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. सुपारी (अरेका नट) विविध मातीत वाढण्यास सक्षम आहे. चांगल्या निचरा झालेल्या मातीत हे उत्तम प्रकारे वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला मे-जूनमध्ये सुपारीची लागवड केली जाते. लागवडीच्या तीन ते चार वर्षानंतर सुपारी झाडाला फुले येण्यास सुरुवात होते. मार्च महिना हा मुख्य फुलांचा हंगाम आहे. आणि साधारणपणे जून ते जुलै या महिन्यात कच्ची सुपारी कापली जाते. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात परिपक्व सुपारीची कापणी केली जाते. ४५ ते ५० या दिवसांच्या अंतराने कापणी केली जाते. सुपारीवरील प्रक्रियायुक्त पदार्थ - सुपारीपासून प्रामुख्याने विविध प्रकारचे पान मसाले, अडाका किंवा कच तमुल (कच्ची/पिकलेली सुपारी), बाटेल्डिक, कालीपाक, चाळी सुपारी इ. तयार होतात. जीवनावश्यक वस्तू उदा. शाई, ट्रे, कप, प्लेट्स, बॉस्केट, कपडे तयार करतात. चामडे चमकवताना सुपारीतील टॅनिन वापरले जाते. आकाराने लहान, टणक आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असणाऱ्या सुपारीवरील प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक यंत्रे पुढीलप्रमाणे आहेत. कच्ची सुपारी स्वच्छ करण्याचे यंत्र - कापणी केलेल्या सुपारीवरील धूळ, माती आणि अन्य पदार्थ दूर करून सुपारी स्वच्छ केली जाते. माणसांद्वारे हे काम केल्यास दिवसभरात फक्त ४०० सुपारी स्वच्छ होतात. मात्र, हे नवीन यंत्र केवळ अर्ध्या तासात ४०० नट (सुपारी) स्वच्छ करू शकते. अगदी लहान मोठी माणसेसुद्धा हे यंत्र सहजपणे हाताळू शकतात. हे यंत्र ४५ ते ६० हजार या किमतीत बाजारात उपलब्ध आहे. बाहेरील आवरण काढण्याचे यंत्र (डिहस्किंग मशीन) - पांढऱ्या सुपारीचे बाह्य आवरण काढण्यासाठी प्रामुख्याने हे यंत्र उपयोगी आहे. या स्वयंचलित यंत्रामुळे प्रति तास ७५ ते ४५० किलो सुपारीचे बाह्य आवरण सुपारी न तोडता काढले जाते. या यंत्राची किंमत सुमारे ८५ हजार ते १.५ लाख इतकी आहे. आकारानुसार प्रतवारी करणारे यंत्र (सॉर्टिंग मशीन)- हाताने सुपाऱ्यांची प्रतवारी करण्यासाठी अधिक मनुष्यबळ खर्ची पडते. हे टाळण्यासाठी या यंत्रामध्ये दोन टप्पे असून, तीन छिद्राद्वारे सुपारीची विभागणी होते. प्रथम मोठ्या सुपारी चाळणीद्वारे विशिष्ट आकाराच्या सुपाऱ्या वेगळ्या केल्या जातात. या यंत्रामध्ये एक फिरत्या पटल छिद्रावर (रोटरी स्क्रीन होलवर) आधारित सोय असून, त्याद्वारे आकारानुसार सुपारी वेगळ्या होतात. ही पटल छिद्रे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असतात. सर्व सुपारी यंत्रामध्ये टाकल्यानंतर रोटरी स्क्रीनच्या साह्याने वेगवेगळ्या आकाराच्या छिद्रानुसार सुपारीची विभागणी होते. या सुपाऱ्या बाहेरील बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या क्रेटमध्ये जमा होतात. या यंत्रामुळे प्रति तास सुमारे ६० किलो सुपारीचे आकारानुसार प्रतवारी केली जाते. त्यासाठी १ एचपी विद्युत ऊर्जा वापरली जाते. याची किंमत ६५ ते ८५ हजार इतकी आहे. सुपारी उकडण्याचे यंत्र - सुपारीची आकार व रंगानुसार प्रतवारी झाल्याने कच्ची सुपारी उकडून त्यापासून लाल सुपारी तयार केली जाते. ग्रामीण भागामध्ये पारंपरिकरीत्या मोठ्या पात्रात सुपारी उकडतात. मात्र, औद्योगिक पातळीवर अधिक प्रमाणात सुपारी उकडण्यासाठी अलीकडे बॉयलरचा वापर केला जातो. याद्वारे प्रति तास २०० किलो कच्ची सुपारी उकडली जाते. हे यंत्र ८५ हजारापासून बाजारात उपलब्ध आहे. सुपारी वाळवण्याचे यंत्र -                उकडलेली सुपारी वाळवली जाते. यासाठी प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र, या यंत्राद्वारे प्रति बॅच २० ते १०० किलो सुपारी ५० ते ६५ अंश तापमानावर वाळवली जाते. या यंत्राची किंमत क्षमतेनुसार १ ते २.५ लाख इतकी आहे. सुपारीला चकाकी आणणारे यंत्र (पॉलीशर) - सुपारीचा दर्जा व किंमत वाढवण्यासाठी त्याला चकाकी आणली जाते. त्यासाठी एक प्रक्रिया असून, या यंत्राद्वारे प्रति तास २५० किलो सुपारी पॉलीश (आकर्षक) करता येते. त्यासाठी १ एचपी ते ३ एचपी इतक्या क्षमतेच्या मोटार वापरल्या जातात. या यंत्राची किंमत क्षमतेनुसार ६० ते ८५ हजार इतकी आहे. सुपारी कापणी यंत्र - सुपारी वेगवेगळ्या उपयोगानुसार वेगवेगळ्या आकारात कापली जाते. त्याला तुकडे करणे, कतरी करणे असे म्हणतात. पूर्ण सुपारीचा फारसा वापर प्रक्रियेमध्ये होत नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे स्वयंचलित यंत्र असून, त्याद्वारे प्रति तास सुमारे १०० किलो सुपारी कापली जाते. हे सिंगल फेजवर चालणारे यंत्र असून, २२० ते २४० होल्टवर चालते. त्याची किंमत ५५ ते ६० हजार इतकी आहे. सुपारी पॅकिंग मशीन - प्रक्रियायुक्त सुपारी आणि सुपारीचे पदार्थांचे आकर्षक पॅकिंग करणे आवश्यक असते. यामुळे विक्रीयोग्य आकर्षक आणि त्याच वेळी अधिक काळ टिकण्याच्या दृष्टीने उत्तम पॅकिंग गरजेचे असते. या स्वयंचलित यंत्राने प्रति तास १५०० ते ४२०० पाउच (पिशव्या) पॅक केल्या जातात. प्रत्येक पिशवी १० ते २५० ग्रॅम या मर्यादेची असू शकते. याची किंमत ९० हजार ते १.५० लाख रुपये इतकी आहे. घरगुती व्यवसायासाठी छोट्या प्रकारात सिलिंग यंत्र उपलब्ध आहे. त्यात १० मिली पासून २ किलो इतक्या छोट्या आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्या हीटिंग कॉइलद्वारे हवाबंद केल्या जातात. या यंत्राची क्षमता प्रति तास ४० किलो असून, किंमत १५०० रुपयापासून सुरू होते. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (संशोधन विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,  सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय , प्रयागराज, उत्तरप्रदेश.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com