Agricultural Employment: महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे प्रगत राज्य मानले जाते. राज्याच्या विकासाची चर्चा करताना उद्योग, सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे आकडे पुढे येतात. पण या विकासाच्या गदारोळात राज्याच्या तरुणाईचा रोजगार नेमका कुठे आहे, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो. ‘फ्यूचर ऑफ इंडिया फाउंडेशन’च्या ‘यूथपॉवर’ अहवालामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. .राज्यातील दहापैकी जवळपास तीन तरुण रोजगारासाठी शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. मात्र शेतीचा राज्याच्या उत्पादनातील वाटा अवघा ११ टक्के आहे. त्याच वेळी १५ वर्षांवरील कार्यरत लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. श्रमाचा एवढा मोठा हिस्सा आणि उत्पादनातील एवढा कमी वाटा, ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील गंभीर विसंगती आहे..Washim Youth Employment: रिक्त पदे तातडीने भरा; रोजगार महाकुंभाचा युवकांना लाभ द्या : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर.राज्यातील १५ ते २९ वयोगटातील २९ टक्के तरुण शेतीत कार्यरत आहेत. त्यापैकी निम्मे कौटुंबिक शेतीत काम करतात; ३७ टक्के हंगामी कामगार आहेत, तर केवळ १२ टक्के स्वतः शेती करतात. अहवालातील आणखी एक बाब चिंताजनक आहे. राज्यातील २३ टक्के तरुण शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षण यापैकी कशातही सहभागी नाहीत. व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे प्रमाण अवघे तीन टक्के आहे. म्हणजेच तरुणांकडे श्रम करण्याची क्षमता आहे; पण बदलत्या अर्थव्यवस्थेत आवश्यक कौशल्ये मिळविण्याची व्यवस्था अपुरी आहे. राज्यातील सरासरी मासिक वेतन आठ वर्षांत १७ हजार १०० रुपयांवरून केवळ १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्रही रोजगाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करते..Agricultural Leadership Youth : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : शेट्टी.अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेती क्षेत्राची स्थिती शोचनीय आहे. अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक आहे. ग्रामीण भागात बिगर कृषी रोजगाराचीही परिस्थिती आशादायक नाही. हे चित्र पालटायचे असेल तर ग्रामीण पायाभूत सुविधांची उभारणी आणि शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी योग्य सरकारी धोरणे यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी शेतीमालाच्या संपूर्ण पुरवठा मूल्य साखळीवर काम करण्याची आवश्यकता आहे..शेती क्षेत्रात सर्वंकष संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतीतून बाहेर पडणाऱ्या तरुणांना उत्पादक आणि सन्मानजनक बिगरशेती रोजगार मिळेल, अशी अर्थव्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. आज जागतिक पटलावर महासत्ता म्हणून उदयाला आलेल्या चीनने हे करून दाखवले. १९५० मध्ये चीनचे दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा कमी होते. पण चीनने शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर प्रचंड गुंतवणूक केली. त्याच बरोबर बुरसटलेल्या सामाजिक रूढी, अंधश्रद्धा, धर्मांधता यांना मूठमाती देऊन समाज आधुनिकतेकडे नेला. त्यामुळे चीनने विकासाच्या मार्गावर अचाट झेप घेतली..आज जगाच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा ३ टक्के तर चीनचा ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या उलट भारतात एकीकडे शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष तर दुसरीकडे अंधश्रद्धा, धर्मांधता आणि कर्मकांड यांत गुरफटलेला आत्ममग्न समाज असे निराशाजनक चित्र दिसते. त्याचेच प्रतिबिंब महाराष्ट्रातही उमटलेले दिसते. महाराष्ट्रात ३.१५ कोटी तरुण आहेत. वास्तविक तरुणांची एवढी संख्या हे अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन म्हणून बघितली गेली पाहिजे, परंतु धोरणात्मक विस्कोट झाल्यामुळे चित्र विपरीत झाले आहे. या तरुणाईला शेतीत अडकवून ठेवणे किंवा रोजगाराच्या संधींशिवाय शहरांकडे ढकलणे, हे दोन्ही पर्याय घातक आहेत. शेतीतील श्रमाला योग्य मोबदला आणि शेतीबाहेर गुणवत्तापूर्ण रोजगार, या दोन्हींची सांगड घालावी लागेल. अन्यथा, लोकसंख्येचा लाभांश बेरोजगारीच्या ओझ्यात रूपांतरित होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.