हवामान पूर्वानुमान प्रणाली ठरेल दिशादायक

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद सध्या डॉ. एस. डी. सावंत भूषवित आहेत. त्यांनी राष्ट्रीयस्तरावरील द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. हवामानावर आधारित कीड-रोग सल्ला आणि संशोधन हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon

भविष्यातील शेती कशी असेल, याविषयी शेतकऱ्यांना कमालीची उत्सुकता असते. तसेच तो आमच्यासारख्या शास्त्रज्ञांचा अभ्यासाचा, संशोधनाचा चिंतनाचाही विषय असतो. खते, बियाणे, कीडनाशके, अवजारे, सिंचन अशा शेतीच्या विविधांगी क्षेत्रात पुढे झपाट्याने बदल होत जातील. पण काहीही बदल किंवा प्रगती झाली तरी मुख्य मुद्दा हवामानाचाच राहील. कारण उत्पादन असो की कीड-रोग असोत त्याचा थेट संबंध हवामानाशी असतो. हवामानातील बदल चटक ओळखता आले आणि त्यानुसार पिकाचे व्यवस्थापन केले तरच तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळेल व खर्चही मर्यादित राहील. त्यामुळे माझ्या मते भविष्याची शेती हवामानातील बदल चटकन टिपून त्यानुसार शेतकऱ्याला व्यवस्थापन करायला लावणारी असेल.

आताही काही पिकात आपण हे तंत्र आत्मसात केलेले आहे. मात्र सर्व पिकांमध्ये अद्यापही हवामान बदलानुसार पिकाचे व्यवस्थापन झालेले नाही, तसेच तशी प्रणाली किंवा साधनेदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत. सर्व भौगोलिक स्थितीत किंवा वातावरणात सर्वत्र काम करेल अशा प्रणालीचा विकास करणे, ही प्रणाली पुरविणारी साधने किंवा उपकरणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हेच आता भविष्यातील शेतीत संशोधकांचे मुख्य उद्दिष्ट राहील. मी तुम्हाला हे आणखी सोपे करून सांगतो. वादळे, महापूर, अतिपाऊस किंवा दीर्घ कालावधीचा दुष्काळ यापासून शेतीचे नुकसान होते. ते टाळणे अवघडही असते. वादळासमोर किंवा अतिपावसासमोर शेतकरी हतबल असतात. पण हवामानातील अल्पकालीन बदलामुळे शेतीचे होणारे नुकसान निश्‍चित टाळता येऊ शकते. त्यासाठी हवामानात पुढील काही दिवसांत नेमके काय बदल होतील हे सांगणारी यंत्रणा हवी, या यंत्रणेने एकदा तसे पूर्वानुमान दिल्यानंतर त्यावर आधारित पीकसल्ला तयार व्हायला हवा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे असे पूर्वानुमान आणि पीकसल्ला तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचायला हवा. आता तुमच्या लक्षात येईल, की हवामान बदलाचा पूर्वनुमान सांगणारे तंत्रज्ञान सध्या जगात उपलब्ध आहे. तसेच या बदलाचा नेमका काय परिणाम पिकांवर होईल हे सांगणारे अभ्यासू शास्त्रज्ञ, संशोधकदेखील उपलब्ध आहेत. मग नेमके काय नाही, असे पूर्वानुमान आणि पीकसल्ला तत्काळ पोहोचविणारी प्रणाली किंवा साधने प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत.

तेच आव्हान सध्या शेतीत असून, भविष्यात खासगी संस्था, सरकारी यंत्रणा किंवा शास्त्रज्ञांसमोर हेच आव्हान एक उद्दिष्ट बनून उभे राहील. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत हवामान पूर्वानुमानावर आधारित बिनचूक व तत्काळ पीकसल्ला कसा पोचवायचा, यासाठी देशभर काम चालेल. हे काम जितके जलद आणि विस्तारित असेल त्याप्रमाणात शेती व शेतकऱ्यांमध्ये समृद्धी झालेली दिसेल. उदाहरण, द्यायचे झाल्यास द्राक्ष शेतीमधील शेतकऱ्यांचे देता येईल. द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत हवामानाचा अंदाज घेत असतात. हवामानाचे पूर्वानुमान त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. कारण हवामानात नेमका काय, किती आणि कधी बदल होईल हे कळले तर आपली द्राक्षशेती उत्तम राहू शकते, हे त्यांच्या ध्यानात आलेले आहे. त्यांना हवामान पूर्वानुमानाचा अभ्यास आणि त्यानुसार व्यवस्थापन करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे अगदी हवामानाच्या विरोधात किंवा हंगामाच्या विरोधात जाऊन द्राक्ष शेती करण्याचे जोखीमभरे कौशल्य शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहे. जागतिक हवामान बदलाचे चटके आपल्याला जाणवू लागले आहेत. शेतकरी या बदलाचे तोटे सहन करतानाच शिकण्याचाही प्रयत्न करीत आहे.

माझ्या मते भविष्यात सर्वच शेतकऱ्यांना हवामान पूर्वानुमान कळवणारी प्रणाली आणि पीकसल्ला उपलब्ध होत राहील. त्यासाठी

छोटी व कमी खर्चाची स्वयंचलित हवामान केंद्रे (एव्हीएस) मोठ्या संख्येने गावपातळीपर्यंत पोहोचतील. आमच्या दापोली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अवघ्या १० ते १५ हजार रुपये खर्चाच्या एव्हीएस निर्मितीवर काम सुरू केले आहे. सामूहिक निर्मिती (मास प्रॉडक्शन) आणि सरकारी अनुदान मिळाले तर भविष्यात एव्हीएस अत्यंत कमी किमतीत प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात उपलब्ध होऊ शकतील. हवामान बदलविषयक उपग्रहाकडून हवामानाची वेळोवेळी मिळणारी माहिती आणि प्रत्यक्ष शेतीतील पिकांची अवस्था सांगणारी छायाचित्रे हे दोन मुद्दे भविष्यात एकत्र येतील. त्याची सांगड घालून स्वयंचलित प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना तत्काळ पीकसल्ला मिळू शकेल. याविषयी मी कधी तरी पुन्हा ‘अॅग्रोवन’मधून सविस्तर तुमच्याशी बोलेन.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com