प्रेमाचा दिवस म्हणून तरुणाईला भुरळ घालणारा व्हॅलेंटाइन डे शेतकऱ्यांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आलं. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढली आहे. आपले काही सण बाहेर देशात साजरे होत आहेत. तिकडची ‘डेज’ संस्कृती आपल्याकडे आली आहे. आज १४ फेब्रुवारीला सर्वत्र साजरा होणारा व्हॅलेंटाइन डे त्याचेच एक प्रतीक! प्रेमाचा दिवस म्हणून तरुणाईला भुरळ घालणारा व्हॅलेंटाइन डे शेतकऱ्यांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाइन डे’ असा अख्खा आठवडा गुलाबासह इतरही रंगीबेरंगी फुलांना जगभर मागणी वाढते. त्यांना दरही चांगला मिळतो. .महाराष्ट्रात लग्नसराईबरोबर निवडणूक निकाल, नियुक्त्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या सत्कार समारंभाची रेलचेल असल्याने बाजारात गुलाबासह इतरही फुलांना सध्या विक्रमी मागणी आहे. त्याच वेळी हवामान बदलाच्या फटक्याने फुलांचे उत्पादन घटल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा घटून विक्रमी दर मिळतोय. सन २०२२ मध्ये गुलाबाला सरासरी प्रतिनग १० रुपये दर मिळत होता, तो आता २० रुपये झाला आहे. त्यामुळे गुलाबासह एकंदरीतच फुलशेतीचे यंदा तरी आर्थिक गणित जुळावे, अशी आशा फूल उत्पादकांना आहे..Rose Demand: ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाबाला मागणी.खरे तर कोरोना लॉकडाउनपासून फुलशेतीचा घसरलेला गाडा अजूनपर्यंत रुळावर आला नाही. कोरोना आपत्तीनंतर फूल उत्पादक कसाबसा सावरू पाहत असताना हवाईसह इतरही वाहतुकीचे दर प्रचंड वाढले. त्यात निर्यातीच्या फुलांवर जीएसटीचे भूत बसले. मजुरी, वीज, रासायनिक खते, कीडनाशके यांचेही दर वाढल्याने उघड्यावरील तसेच पॉलिहाउसमधील फुलांचा उत्पादन खर्च वाढला. पॉलिहाउस उभारणीचा मुळातच खर्च अधिक असतो. कर्ज काढून शेतकरी पॉलिहाउस उभारतात..परंतु सातत्याच्या तोट्याने तेही आता बंद पडत आहेत. अस्मानी संकटांचा कहरही वाढत आहे. गेल्या वर्षी थंडीचा कालावधी कमी राहिल्याने प्रामुख्याने गुलाबाचा ६० दिवसांचा काढणी हंगाम ४० दिवसांवर आला. त्यामुळे गरजेपेक्षा लवकर निर्यात करावी लागली. त्याचा थोडाफार फटका दराला बसला. या वर्षी मात्र लांबलेल्या मॉन्सून, लवकर सुरू झालेली थंडी आणि थंडीचा वाढलेला कालावधी याचा थेट परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी सुद्धा गुलाबाला दर चांगले असूनही त्याचे अपेक्षित लाभ मिळताना दिसत नाहीत..Rose Demand: ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाबाला मागणी.गुलाबासह इतरही लांब दांड्याच्या फुलांमध्ये नवनव्या आकर्षक रंगांच्या फुलांची मागणी वाढत आहे. मागील दोन दशकांत फुलांच्या नव्या वाणांवर फारसे संशोधनात्मक काम झाले नाही. त्यामुळे त्याच त्या प्रकारची फुले आपण निर्यात करीत आहोत. आफ्रिकी देशांसह इतरही फूल उत्पादक सातत्याने आकर्षक रंगसंगतीची फुले जागतिक बाजारात आणत असल्याने त्याचाही फटका आपल्याला बसतोय. शिवाय या देशांत उत्पादन तसेच हवाई वाहतूक खर्च देखील कमी असल्याने स्पर्धा वाढत आहे..या सर्व बाबींचा केंद्र-राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून फुलशेती वाचविण्यासाठीचे धोरण जाहीर करायला पाहिजे. पॉलिहाउस उभारणीसाठीचे कर्ज-अनुदान प्रक्रिया सुलभ झाली पाहिजेत. पॉलिहाउसमधील फुलांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा उत्पादकांना कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे. वाढत्या नैसर्गिक आपत्तीत पॉलिहाउस, शेडनेट तसेच त्यातील फुलशेतीचे नुकसान झाल्यास तत्काळ पाहणी-पंचनामे करून नुकसान भरपाई मिळायला हवी..गुलाबासह इतर निर्यातक्षम फुलांच्या जातीत संशोधन व्हायला हवे. वाढलेले विमान वाहतूक दर कमी करावेत तसेच फूल निर्यातीसाठी अनुदान द्यायला हवे. असे झाले तरच भारतातील दर्जेदार गुलाब तसेच इतरही लांब दांड्याच्या फुलांचा दबदबा जगभर निर्माण होईल. देशांत प्लॅस्टिकच्या फुलांच्या वाढलेल्या बाजाराने फुलशेती कोमेजून जात आहे. पर्यावरणासह घातक आणि फूल उत्पादकांना मारक प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणून ती बाजारातून हद्दपार झाली तरच फूल उत्पादकांना अच्छे दिन येतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.