Heavy Rain Crop Damage Maharashtra : राज्यात मागील आठ दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. पुन्हा पुन्हा अतिवृष्टी आणि महापुराने शेतीचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये असा पाऊस कधीही पाहिला नव्हता, असे अनेक वयोवृद्ध शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा आणि सोलापूर या भागांत पावसाचा तडाखा अधिक आहे. अनेक ठिकाणी पिकांसोबत माती वाहून गेली. शेताला नदी-नाल्याचे स्वरूप आले. .पशुधनही वाहून गेले. दीर्घकाळ आधार असलेल्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. खरे तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला आतापर्यंत शेतकऱ्यांनी अत्यंत धीराने तोंड दिले आहे. परंतु आताची आपत्ती ही एक पीक अथवा हंगामापूर्ती मर्यादित नाही. खरडून गेलेली जमीन पुन्हा लागवडयोग्य होण्यासाठी किती काळ लागेल, हे सांगता येत नाही. फळबागा कधी उभ्या राहतील, गाई-म्हशी-बैल-शेळ्या-मेंढ्या अशा पशुधनाची पुन्हा जुळवाजुळव कधी आणि कशी होईल हेही त्यास ठाऊक नाही. .Parbhani Flood : शेतकऱ्यांनो, खचू नका; सरकार तुमच्या पाठीशी.अशा अगतिकतेतून खचून जाऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलू शकतो, तशा काही घटनाही राज्यात घडत आहेत. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, उलट आत्महत्या करून आपण कुटुंबाला अधिकच संकटाच्या गर्तेत ढकलत आहोत, हे शेतकऱ्यांनी जाणायला हवे. या आपत्तीकडे नेहमीसारखे संकट म्हणून पाहता येणार नाही. पाहणी, पंचनामे, निकषांद्वारे केली जाणारी आर्थिक मदत, पीक कर्जमाफी, शैक्षणिक फी माफी यापुढे जाऊन या आपत्तीचा विचार करावा लागणार आहे..आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ भरीव आर्थिक मदत तर मिळायलाच हवी. परंतु त्याचबरोबर त्यांची खरडून गेलेली जमीन लागवडयोग्य कशी होईल, कायमस्वरूपी आधार असलेल्या फळबागा पुन्हा कशा उभ्या राहतील हेही पाहावे लागेल. या दोन्ही कामांसाठी रोजगार हमी योजनेची मदत घेता येऊ शकते. यातून शेतमजुरांना गावातच काम मिळून त्यांनाही थोडाफार आधार मिळू शकतो. एवढेच नाही तर रब्बी हंगामासाठी त्याला उभे करण्याकरिता अधिकाधिक पीक कर्ज मिळायला हवे. त्याचबरोबर रब्बी पेरणी करीता बियाणे, रासायनिक खते, सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना मिळतील, हेही पाहावे लागेल.Nanded Flood : संसार उघड्यावर, जगायचे कसे?.या आपत्तीमध्ये केवळ सरकारवर अवलंबून राहूनही चालणार नाही तर ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी मदतीसाठी पुढे यायला हवे. शेतकऱ्यांवर आलेले संकट हे त्यांच्या एकट्यावरचे नाही तर आपल्या सर्वांवरचे आहे, असा विश्वास त्यांना द्यावा लागेल. याकरीता आर्थिक तसेच पूरग्रस्तांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू, साधनांची मदत आपण त्यांना करू शकतो. अनेक सेवाभावी संस्था तसे आव्हान करीत आहेत. त्यांच्यामार्फत आपण गरजवंतांपर्यंत आपली मदत पोहोचू शकतो. मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे देखील आपण आपली आर्थिक मदत देऊ शकतो. .आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा या आपत्ती शेतकऱ्यांना सर्वांत मोठा आधार ठरणार आहे. याच भावनेतून कोणतीही अडचण असो आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण हार मानू नका, असे शिवार संसदेने केलेले आवाहन या संकट काळात फार महत्त्वाचे वाटते. या प्रमाणे इतरही संस्थांनी केवळ आर्थिक मदतीचे आवाहन करण्यापेक्षा थेट साह्य करण्याकरिता पुढे यायला हवे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा या आपत्तीवर मात करण्यासाठी शासन, संस्था आणि समाज अशा सर्वांनी पुढाकार घेतला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.