Dedicates the Year to Women Farmers: संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. शेती क्षेत्र आणि महिला यांचे पूर्वापार अतूट असे नाते राहिले आहे. शेतीचा शोधाची नोंदच महिलांच्या नावे आहे. पूर्वी भटकंती करणाऱ्या मानव जमाती महिलांनी शेतीचा शोध लावला म्हणून स्थिरावल्यात. यातून वाडी, वस्ती, गाव अशी समाजरचना प्रस्थापित झाली. आजही भारतासह जगभरातील महिला ह्या कुटुंब सांभाळत शेती तसेच दुग्धोत्पादन, शेळी-मेंढी-कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसाय तसेच शेतीमाल प्रक्रिया उद्योगात मोलाचे योगदान देत आहेत. .एवढेच नव्हे तर नोकरी, उद्योग, सेवा क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिला उल्लेखनिय काम करीत आहेत. असे असताना प्रामुख्याने शेतीमधील त्यांचे योगदान जगभर दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे लिंग समानतेबरोबर महिलांना त्यांचे हक्क, अधिकार देऊन त्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष शेतकरी महिलांना समर्पित केले आहे. खरे तर हा आत्तापर्यंत दुर्लक्षित शेतकरी महिलांचा जागतिक पातळीवरील सर्वोच्च सन्मान म्हणावा लागेल..International Women Farmer Year: ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आशादायी.महिला ही फार मोठी ताकद आहे. ती गुणी आहे, सहनशील आहे, दुःख झेलण्याची तिच्यात क्षमता आहे. असे असताना आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्यासाठी महिलांचा संघर्ष चालूच आहे. ग्रामीण भागात महिला शेतकऱ्यांचा हा संघर्ष अधिक ठळकपणे जाणवतो. महिलांशी बरोबरीच्या नात्याने व्यवहार होताना दिसत नाही. ग्रामीण भागात निर्णय प्रक्रियेत, आर्थिक व्यवहारात महिलांना सामावून घेतले जात नाही. शेतीचा सर्व भार आपल्या माथी पेलणाऱ्या बहुतांश महिलांच्या नावे घर-शेती-पशुधन नाही..भारतात केवळ १३ टक्के महिलांची नोंद सातबारावर आहे. शेती-व्यवसायाचे नियोजन असो, की मुलीबाळींचे लग्नकार्य अशा निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. शेतीत पुरुषांबरोबर काम करूनही महिलांना ३० टक्के मजुरी कमी दिली जाते. महिलांच्या नावे शेती, संपत्ती नसल्याने अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागते. ही मन खिन्न करणारी विषमता आहे..शेतीमध्ये महिलांना केवळ निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून दिल्या, तर उत्पादकतेत २० ते ३० टक्के वाढ होते, असा एक अभ्यासपूर्ण अहवाल सांगतो. अशावेळी ही सर्व विषमता दूर करण्याची एक चांगली संधी आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने लाभली आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) आणि जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) या संस्थांच्या सहकार्याने देशात महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कोणते धोरणात्मक कार्यक्रम राबविता येतील, हे पाहावे..शेतकरी महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करायचे असेल तर त्यांच्या वेतन अथवा मजुरीत होत असलेला स्त्री-पुरुष लिंगभेद प्रथम संपविला पाहिजे. शेतीतील बहुतांश कामे करणाऱ्या महिलांची नावे सातबारावर यायला हवीत. शेतीत निविष्ठा खरेदीपासून ते शेतीमाल विक्रीपर्यंतच्या सर्व निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग हवा. वैयक्तिक अथवा गट-समुहाच्या माध्यमातून शेतीमाल प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या महिलांना त्यांच्या उद्योग व्यवसायाबाबत संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे..एक महिला म्हणून त्यांचा कोणताही हक्क, अधिकार डावलण्यात येऊ नये. स्थानिक ते जागतिक पुरवठा साखळीचे अधिक विकेंद्रीकरण होऊन त्यामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करणे हे केवळ सामाजिक व्यवस्थेसाठीच चांगले आहे असे नाही, तर अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचाही तो एक योग्य मार्ग आहे, हेही लक्षात घ्यायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.