Agricultural innovation: महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीसाठी विशेष आग्रही आहेत. त्यांच्या पुढाकाराने राजभवन येथे झालेल्या परिषदेत हवामान बदलाच्या संकटावर सर्वाधिक परिणामकारक उपाय म्हणून नैसर्गिक शेतीचे महत्त्व विषद करण्यात आले. राज्यात २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा संकल्प यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला..अर्थात ही घोषणा नवीन नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे २०२३ मध्ये अर्थ खात्याची जबाबदारी असताना त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र या शेती पद्धतीखाली आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाची व्याप्ती वाढवू, राज्यात एक हजार जैवनिविष्ठा स्रोत केंद्र स्थापन करू असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांना परत तीच घोषणा करावी लागली, याचा अर्थ मागच्या दोन वर्षांत या आघाडीवर फारसे काही उल्लेखनीय काम झालेले नाही..Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार.यातला आणखी एक पेच म्हणजे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन संकल्पनांबाबत असलेला संभ्रम. राज्यात नैसर्गिक शेती अभियान राबविले जात असले तरी प्रत्यक्षात नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती असा भेद न ठेवता ते एकत्रच राबविले जात होते, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हणजे आजपर्यंत नैसर्गिक शेतीच्या नावाखाली सेंद्रिय शेतीचीच योजना राबवली जात होती; परंतु आता मात्र स्वतंत्रपणे २५ लाख हेक्टरवर केवळ नैसर्गिक शेती पद्धती राबवली जाणार, असे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते..सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा शेताबाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकनेदेखील निश्चित केलेली आहेत. मात्र, नैसर्गिक शेतीमध्ये शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही. निसर्गाच्या नियमांमध्ये ढवळाढवळ न करता ही शेती केली जाते..या शेती पद्धतीमध्ये पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करणे, गायीचे शेण व गोमूत्रापासून जीवामृत तसेच बीजामृत तयार करून वापरणे, जमिनीतील पोषक जिवाणूंची संख्या वाढविणे, जमिनीचा वाफसा राखणे यावर भर देण्यात येतो. सेंद्रिय शेतीत उत्पादनात घट होत असल्यामुळे सरकारने अनेक वर्षे प्रचार करूनही शेतकऱ्यांना ती व्यवहार्य वाटत नाही; परंतु नैसर्गिक शेतीत मात्र उत्पादन घटत नाही, असा दावा राज्यपालांनी केला आहे. तो मात्र शास्त्रीय कसोट्यांवर तपासून पाहिला पाहिजे..Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची.वास्तविक नैसर्गिक संसाधनांचा सजग व संतुलित वापर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य राखणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन यांचा मेळ घालणारी शेती पद्धती अवलंबणे ही काळाची गरज आहे. सध्या रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता, पीक उत्पादन, पर्यावरण, मानवी आरोग्य यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी विविध पर्यायी शेती पद्धतींचा आग्रह धरला जात आहे. .त्यातील एक पद्धती म्हणजे नैसर्गिक शेती. परंतु या शेती पध्दतीचे प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे नेमके कशाला नैसर्गिक शेती म्हणावे, याविषयी संदिग्धता आहे. तसेच या शेती पध्दतीचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, स्थित्यंतराचे टप्पे, उत्पादनात घट होते की नाही आदी अनेक मुद्यांबाबत सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन, प्रमाणीकरण ही शास्त्रीय प्रक्रिया पार पाडण्याकडे दुर्लक्ष करत सरकार नैसर्गिक शेतीविषयी वारंवार धोरणात्मक घोषणा करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीत गफलत आणि सावळा गोंधळ होण्याची शक्यता अधिक दिसते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.