Teacher Workload in Government Schools: प्रजेला भेडसावणाऱ्या समस्यांवर ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ प्रकारातले उपाय शोधू पाहणारे प्रशासनातील ढुढ्ढाचार्य हे दिवसेंदिवस अवघड जागचे दुखणे बनत चालले आहेत. जुगाडू वृत्तीने ती ती वेळ मारून नेण्याचे कौशल्य आपल्या प्रशासकीय व्यवस्थेने साध्य केले असल्याने तिच्या कार्यक्षमतेचा एकंदर लसावि ‘पंत मेले, राव चढले’ अशाच गोळाबेरजेचा असतो. वरिष्ठ पदावर कुणीही आले तरी व्यवस्थेत मुद्दलात काही फरक पडत नाही. त्यामुळे याचा परिणाम प्रशासकीय परिणामशून्यतेत दिसतो. .परंतु, त्यांच्या या निर्णयांच्या वरवंट्याखाली भरडून निघणाऱ्यांच्या व्यथा त्यांच्या गावीही नसतात. अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात उद्भवली आहे. राज्याचा कारभार चालविणाऱ्या प्रशासनातील या ‘पंत’मंडळींमुळे पंतोजी अर्थात शिक्षकमंडळींची पंचाईत झाली आहे. ही पंचाईत सहन होइनाशी झाल्यामुळे शिक्षकांनी थेट संपाचे हत्यार उगारले आहे..अगोदरच शिक्षकांकडे सोपविण्यात आलेल्या शिक्षणबाह्य कामांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिवर्गाची हेळसांड सुरू आहे. शिक्षणाचा वेध घेऊ इच्छिणाऱ्या या एकांड्या एकलव्यांना तसा कुणी वाली उरलेला नाही. त्यामुळे सरकारदरबारच्या पंतांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे..Agriculture Education Initiative: जिल्हा परिषद शाळेने निर्माण केला कृषी क्षेत्रात आदर्श .शिक्षकांना आंदोलनाचे हत्यार उगारावे लागले यासाठी की, शालाबाह्य कामांच्या ओझ्याखाली ते पिचून निघाले आहेत. त्यात ग्रामीण भागातील शिक्षकांचे प्रमाण लक्षणीय आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जनगणनेच्या कामांना त्यांना जुंपण्यात आले होते. कोरोनासारख्या महामारीनंतर पुढे ढकलल्या गेलेल्या या अक्राळविक्राळ कामाचे आव्हानात्मक शिवधनुष्य या बिचाऱ्या शिक्षकांनी कुरकुर न करता पेलले..त्यानंतर आली ती टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा. शिक्षक खरोखरच शिक्षक म्हणवून घेण्यास पात्र आहे की नाही, याचे मूल्यमापन करणारी ही परीक्षा. पेपरफुटीच्या निमित्ताने तिचे निघालेले धिंडवडे काहीच दिवसांपूर्वी अनुभवायला मिळाले. पण, प्रामाणिकपणे तिच्यासाठी दिवसरात्र मेहनत केलेल्या शिक्षकांची मेहनत मात्र पाण्यात गेली..Agriculture Education: कृषी क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी....या परिक्षेसाठी घेतलेली रजा खर्च झाली आणि ताण अक्कलखाती जमा झाला. प्राथमिक शाळांमधला विद्यार्थीवर्ग शिक्षणात मागे पडू नये, म्हणून त्यांच्यासाठी सेतू अभ्यासक्रमाची टूम काढण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या २१ दिवसांच्या वेळेची जोडणीही याच शिक्षकांना करावी लागली..आता निवडणूक यंत्रणेकडून मतदारयादी पडताळणीची मोहीम सुरू आहे. त्याकामीही हक्काचे मनुष्यबळ म्हणून शिक्षकांनाच वेठीला धरण्यात आले आहे. बूथस्तरीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांवर त्याचे ओझे तर आहेच, पण इतर शिक्षकांनाही त्यांच्या जोडीला जुंपण्यात आले आहे. मूळ शिक्षकी काम करून झाल्यावर म्हणजे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हेही काम करावे, असे वरिष्ठांचे आदेश आहेत..पण, या कामाचा व्याप इतका प्रचंड आहे की, महिनाभर दररोज चोवीस तास खर्च केले, तरी ते काम होऊ शकणार नाही, असा आक्रोश शिक्षक करत आहेत. ग्रामीण भागात तर परिस्थिती अशी आहे की, अनेक दोनशिक्षकी शाळांमधील दोघाही शिक्षकांची रवानगी मतदार पडताळणीच्या मोहिमेवर झाली आहे..काही शाळांमध्ये शिकविण्याच्या कामावर शिक्षकांना ठेवण्याचा तोंडदेखलेपणा करत इतरांना मतदारांची घरे धुंडाळण्यासाठी पिटाळले गेले आहे. विद्यार्थी वर्गात आणि शिक्षक मतदारांच्या दारात, असे चित्र पाहून संवेदनशील मनांना पीळ पडल्याशिवाय राहणार नाही. पण, त्यांना या कामी जुंपणारे प्रशासकीय यंत्रणेतील महाभाग यापैकी कशाचीही स्वतःला तोशीस लागू न देण्यातच मश्गूल आहेत. गुरुजनांच्या गर्जनांमध्ये असा काय दम असणार, याचा बेफिकीर अदमास कदाचित त्यांना असावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.