अनिल राजवंशी, नंदिनी निंबकरगोड धाटाची ज्वारी हे पीक भारतात निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस आणले. आज गोड ज्वारी जागतिक स्तरावर इथेनॉल परिसंस्थेतील एक महत्त्वाचे पीक म्हणून ओळखली जाते. त्याबाबत घेतलेला हा आढावा....नारीचे सुरुवातीचे संशोधन (१९७०-८०) उसाला पर्यायी किंवा पूरक पीक म्हणून गोड धाटाची ज्वारी विकसित करण्यावर केंद्रित होते. गोड धाटाची ज्वारी हे असे एकमेव पीक आहे ज्यातून धान्य व धाटे दोन्ही मिळतात आणि त्यांचा उपयोग साखर, दारू, काकवी, गूळ, जनावरांचा चारा, इंधन, आच्छादन, कुंपण, कागद तसेच खाण्यासाठी करता येतो. अमेरिकेत जवळपास १५० वर्षांपासून गोड धाटाच्या ज्वारीपासून वैशिष्ट्यपूर्ण चवीची काकवी तयार केली जात आहे..Ethanol Production Sweet Sorghum : गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी बीपीसीएल आणि राष्ट्रीय साखर संस्थेत करार.जातींचा विकास१९७० च्या सुरुवातीस अमेरिकेतील मिसिसिपी, टेक्सास आणि जॉर्जिया या प्रांतांमधील संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या जाती नारीमध्ये आणण्यात आल्या. या अमेरिकन वाणांचे मालदांडी ज्वारीसोबत संकरीकरण करण्यात आले. परिणामी वर्षभर लागवड करता येतील अशा, प्रतिहेक्टर सुमारे ३० टन सवळलेल्या धाटांचे उत्पादन देणाऱ्या आणि लवकर तयार होणाऱ्या जाती विकसित झाल्या. यानंतर बुटक्या अगोड व उंच गोड अशा दोन्ही प्रकारच्या वाणांचे संकरीकरण करून ‘मधुरा’ ही संकरित जात विकसित करण्यात आली..संकरित जातींमधील झाडे एकसमान असल्याने व्यापारीकरणाच्या दृष्टीने त्या अधिक उपयुक्त ठरतात. तथापि, संकर जातींमध्ये बियाणे उत्पादन अडचणीचे असल्याचे आढळल्याने काकवी उत्पादनासाठी रसात साखरेचे जास्त प्रमाण असणाऱ्या, कीड प्रतिरोधक व जैवभाराचे अधिक उत्पादन देणाऱ्या सरळ जाती विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यातून ‘मधुरा-२’ व ‘मधुरा-३’ या जाती विकसित झाल्या. त्या इथेनॉल उत्पादनासाठीही वापरता येतात. यापैकी मधुरा-३ ही सध्या काकवी उत्पादनासाठी वापरली जाते. नारीने विकसित केलेल्या जातींमध्ये दाणे पक्व झाल्यावर रसामधील साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते..Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?.गोड ज्वारीपासून सौर ऊर्जेने इथेनॉल ऊर्ध्वपातन करणारा जगातील पहिलाच प्रकल्प नारीने उभारला. तेव्हापासून २०-२५ वर्षांनंतर भारतात व जगभर गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल उत्पादन व त्यासाठी सौर ऊर्जेच्या वापराबाबत मोठी रुची निर्माण झाली आहे. नारीने गेल्या २५ वर्षांत ‘मधुरा’ गोड धाटाच्या ज्वारीचे १५ टनांहून अधिक बियाणे देश-विदेशांतील उद्योगांना पुरवले आहे..इथेनॉलवरील कंदील व शेगड्या‘नारी’मध्ये ‘नूरी’ नावाचा बहुइंधन, दाबानुकूलित, मँटल कंदील विकसित करण्यात आला. हा कंदील १०० वॉट बल्बइतका (१२५०–१३०० ल्युमेन्स) प्रकाश देतो, अत्यंत कमी दाबावर कार्य करतो आणि नेहमीच्या रॉकेलवर चालणाऱ्या कंदिलाच्या तुलनेत ६० टक्केच इंधन वापरतो. ६० टक्के इथेनॉल-पाणी मिश्रणावर चालणारी शेगडीही ‘नारी’मध्ये विकसित करण्यात आली. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या अवैध दारूवर चालणारी शेगडी विकसित करण्याचा हा जगातील पहिलाच यशस्वी प्रयत्न असावा. या शेगडीत मिश्रणातल्या इथेनॉलचे पूर्णपणे ज्वलन होऊन खाली फक्त पाणी उरते. यानंतर ‘लॅनस्टोव्ह’ (कंदील + शेगडी) हे संयुक्त उपकरण विकसित करण्यात आले. या उपकरणाने प्रकाश तर मिळतोच, पण वाया जाणारी उष्णता वापरून वाफेवर चालणाऱ्या कुकरच्या साह्याने पाच जणांचे जेवण शिजवता येते. या तंत्रज्ञानासाठी ‘नारी’ला २००९ मध्ये स्टॉकहोम येथे ‘ग्लोब फोरम’ पुरस्कार मिळाला..Ethanol Sweet Sorghum : इथेनॅाल उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारची गोड ज्वारीला पसंती | ॲग्रोवन.इथेनॉल हे एक मौल्यवान रसायन असून, वाहनांच्या अकार्यक्षम अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये ते जाळणे हा त्याचा अपव्यय आहे. वाहनांची कार्यक्षमता फक्त १-२ टक्के असते. त्यामुळे इथेनॉलसारखी ऊर्जा-घन रसायने वाहनांसाठी वापरणे चुकीचे आहे. नूतनीकरणक्षम सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत वाहने ही अंतर्गत ज्वलन इंजिनांपेक्षा तिपटीने अधिक कार्यक्षम असून, त्यांना पर्यावरणपूरक पर्याय आहे. याशिवाय इथेनॉल निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते व प्रदूषणकारी सांडपाणी तयार होते. १ लिटर इथेनॉल निर्मितीसाठी १५ लिटर सांडपाणी तयार होते, जे जलस्रोत प्रदूषित करू शकते. त्यामुळे इथेनॉल-पेट्रोल मिश्रणामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्याचे संभाव्य फायदे या जल प्रदूषणामुळे नष्ट होतात. म्हणून वाहनांसाठी इथेनॉल वापरणे ही चुकीची रणनीती आहे. त्याचा वापर रासायनिक उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून करणे अधिक श्रेयस्कर आहे..काकवीनिर्मिती तंत्रज्ञानाचा विकास१९९० नंतर इथेनॉलसाठी असणारी बाजारपेठ अनिश्चित असल्याने ‘नारी’मध्ये गोड ज्वारीपासून काकवी उत्पादनावर भर देण्यात आला. गोड ज्वारीची काकवी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असून अन्न, पेय, औषध व न्यूट्रास्युटिकल उद्योगात उपयुक्त आहे. योग्य प्रकारे रस गाळणे व आटवताना मळी काढणे या बाबींकडे विशेष लक्ष पुरवल्यास उच्च दर्जाची काकवी मिळते. नारी येथे संपूर्ण काकवी उत्पादन प्रक्रिया विकसित करण्यात आली. गेल्या २० वर्षांत ‘नारी’ने १० टनांहून अधिक काकवी अन्न प्रक्रिया आणि न्यूट्रास्युटिकल उद्योगांना विकली आहे. धान्य आणि काकवी ही दोन्ही उत्पादने या पिकापासून मिळत असल्यामुळे गोड धाटाची ज्वारी लावल्यास शेतकऱ्यांना दुपटीने (अंदाजे हेक्टरी रु. ७५,०००) नफा कमावता येऊ शकतो. यासाठी गोड धाटाच्या ज्वारीला उसाप्रमाणे टनाला रु. ३५०० च्या आसपास दर मिळणे अपेक्षित आहे..शिकलेले धडेजमीन अन्न उत्पादनासाठी वापरली पाहिजे, इंधनासाठी नव्हे. गोड धाटाच्या ज्वारीवरील संशोधन धान्य आणि धाटे या दोन्हींच्या सुधारणेवर केंद्रित केले पाहिजे.गोड धाटाची ज्वारी हे बहुउपयोगी अन्नपीक आहे. ते धान्य, धाटातील रसापासून काकवी आणि उरलेला चोथा व पाने यांपासून उत्कृष्ट चारा प्रदान करते.योग्य दर, सरकारी धोरण व बाजारपेठ मिळाल्यास गोड ज्वारी भारतात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकते..पुढील संशोधन व विकासधाटांवरचा पाला सवळण्यासाठी यंत्र आणि काढणीसाठी कापणी यंत्र विकसित करणे आवश्यक आहे.शेतातच काकवी बनविण्यासाठी ट्रकवर बसवलेली संयंत्रे तयार केल्यास धाटांच्या वाहतुकीचा खर्च वाचेल.साखरेचे अधिक उत्पादन करणाऱ्या कीड-प्रतिरोधक वाणांची निर्मिती करण्याची गरज आहे.anilrajvanshi50@gmail.com(नंदिनी निंबकर नारी संस्थेच्या अध्यक्षा, तर अनिल राजवंशी संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.