Indian Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यू विलक्षण वेदनादायी, चटका लावणारा आणि सुन्न करणारा आहे. एरव्हीही सतत घाईत असणारे आणि जणू घड्याळ्याच्या वेगाशी सतत स्पर्धा करणारे अजित पवार इतक्या झटकन निघून गेले, की अवघा महाराष्ट्र आज शोकाकूल झाला आहे. राजकारणातील स्पर्धा-असुया, हेवेदावे, जय-पराजय, खोड्या-कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप सारे सारे बाजूला ठेवून महाराष्ट्राचे समाजमन व्याकुळ झाले आहे. राजकारणातील प्रस्थापित प्रथा-परंपरांना ठोकरून स्वतःचे रांगडेपण ठामपणाने मिरवणारे अजित पवार आज आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारणे महाराष्ट्राला कठीण जात आहे. .कार्यकर्त्यांच्या वर्तुळात आणि त्याबाहेरही ‘दादा’ हे अजित पवारांसाठीचे लाडके संबोधन. अजितदादा या संबोधनाभोवती दिलखुलासपणा, मोकळेपणा, स्पष्टवक्तेपणा होता आणि त्याचवेळी दरारा, करारीपणा आणि परखडपणादेखील होता. त्यांचा करारीपणा, परखडता कधी कुणाला बोचरी वाटलीही असेल. मात्र अजितदादांचा हेतू कामे मार्गी लावण्याचा असे. अनेक प्रस्थापित राजकारणी पोटात एक दडवतात आणि तोंडावाटे दुसरेच बोलतात, हा जनतेचा अनुभव. अजितदादा या अनुभवाला छेद देणारे राजकारणी होते..जे पोटात तेच बोलून रिकामे होणारे. नुसते बोलून न थांबता आवश्यक तिथे कृती करणारे. कृती करण्यासाठी सारे प्रशासन कामाला जुंपणारे. त्यामुळेच, सरकारवर आणि प्रशासनावर पकड असणारा नेता, असे त्यांच्याबद्दल बोलले जायचे. ही त्यांची केवळ प्रतिमा नव्हती. ती त्यांच्या कामाची पद्धत होती. अशी पद्धत अंगी रुजवण्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा अनुभव त्यांनी चार दशकांच्या प्रवासात जमा केला होता. टीकेची वादळे आणि वावटळी झेलल्या होत्या. विशेषतः गेल्या अडीच दशकांतील अजित पवार एका विशिष्ट पद्धतीने घडत गेले होते..Ajit Pawar Passes Away: या दुःखाच्या क्षणात मी पवार कुटुंबियांच्या सोबत; राहुल गांधी.ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पंखाखाली सुरू झालेला अजितदादांचा प्रवास गेल्या दीड दशकांत टप्प्याटप्प्यांनी स्वतंत्र नेतृत्वाकडे होत गेला. राजकारणात ग्रामपंचायत अथवा पालिका- महापालिका ते संसद असा प्रवास करण्याकडे बहुतांश; नव्हे साऱ्याच राजकीय नेत्यांचा कल असतो. अजित पवार त्याला अपवाद होते. खासदारकीचा प्रवास १९९१मध्ये वयाच्या ३२व्या वर्षीच केला आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत ते महाराष्ट्रात परतले आणि महाराष्ट्रातच रमले. १९९० ते २००४ या कालखंडात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची एक अख्खी पिढी तयार झाली..अजितदादा या पिढीचे प्रतिनिधी होते. महाराष्ट्रात १९९५ मध्ये पहिल्यांदाच सत्तारूढ झालेल्या काँग्रेसेतर युती सरकारच्या काळात विधिमंडळात विरोधी पक्षाची खिंड लढविणाऱ्यांमध्ये आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील अशी आघाडीची नावे होती. हे सारे नेते तेव्हा वयाच्या चाळिशीच्या आत-बाहेर होते. पुढच्या तीन दशकांतही याच नेत्यांची नावे चमकत राहिली, हे विशेष. अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद प्रदीर्घकाळ सांभाळले..चार वेळा उपमुख्यमंत्रिपदापर्यंतच घोडे अडले, आता मुख्यमंत्री केव्हा होणार हा प्रश्न अजितदादांना अनेकांनी अनेकदा विचारला आणि अजितदादांनीही यावर ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय की’ असे मोकळेढाकळे उत्तर प्रत्येक वेळी दिले. प्रश्न विचारण्याचा भले खोचक भाव असेल, पण उत्तर देताना अजितदादा मिश्किल हसत. राजकीय मर्यादांची पुरेशी जाणीव त्यांना होती, हे त्यांच्या मिश्किलपणातूनही सहज समजून यायचे. कोणत्याही प्रश्नापासून न पळणारा हा नेता होता..Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर .शरद पवारांपासून फारकत घेऊन आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ताब्यात घेऊन भाजपसोबत सत्तेत बसण्याची त्यांची २०२३ ची खेळी राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी ठरली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. मात्र २०२३ ते २०२४ या काळात अजित पवार त्यांच्या नव्या भूमिकेशी ठाम राहिले. ही भूमिका कुणाला आवडो ना आवडो, त्यांनी माघार घेतली नाही. ते जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहिले. आपलीच भूमिका योग्य होती, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्यांनी पटवून दिले. अजित पवारांनी केलेली ही काही पहिली राजकीय बंडखोरी नव्हती. त्याआधीही दोनदा अजितदादांनी स्वतंत्र भूमिका घेऊन पाहिली होती..तत्कालीन परिस्थितीच्या रेट्यापुढे त्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला. भारतीय राजकारणात वरच्या पायऱ्या वयाच्या पन्नाशीनंतर सुरू होतात, वयाच्या सत्तरीपर्यंत या पायऱ्या आणखी उंची गाठतात असे इतिहास सांगतो. अजितदादांनी वयाच्या चाळिशीत वरच्या पायऱ्यांवरून राजकारण सुरू केले. या दृष्टिकोनातून त्यांची महत्त्वाकांक्षा तपासली, तर ती गैर ठरणारी नव्हती, हे मान्य करावे लागते. सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवणे आणि ती जाहीरपणाने मांडणे अजित पवारांचे वैशिष्ट्य. त्यासाठी भाषेचा यथेच्छ वापर करण्यातही ते मागेपुढे पाहत नसत. त्यातून वाद उद्भवले, तर माफी मागून विषयावर पडदा टाकून पुन्हा अजित पवार आपल्याच मार्गाने चालू लागत आणि पुन्हा नवे वादविवाद तितक्याच तडफेने अंगावर घेत..ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही राजकारणाचे धागे अजित पवार जुळवू पाहत. बारामती असो किंवा पिंपरी- चिंचवड असो, त्यांनी नियोजित नागरीकरणाचे उत्तम धडे महाराष्ट्राला घालून दिले. त्याच वेळी ग्रामीण महाराष्ट्राशी, विशेषतः शेतीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. कर्जमाफी करू; मात्र कर्जमाफीने शेतीचा प्रश्न सुटणारा नाही, असे जाहीरपणे सांगण्याचे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नसते..ते अजितदादांमध्ये होते. शेतीचा प्रश्न सुटायचा असेल, तर बदलते हवामान आणि तंत्रज्ञान वापरून पीक व्यवस्थापन केले पाहिजे याची त्यांना जाणीव होती. ती जाणीवही अजितदादांच्या भाषणांमध्ये येत असे. शेतीबद्दल जितकी आस्था होती, तितकेच त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत जगभरात सुरू असलेल्या प्रयोगांचे कुतूहल होते. असे प्रयोग काटेकोरपणे राबविण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या दटावण्यात आणि उत्तम कामाबद्दल पाठ थोपटण्यातही ‘दादा’पण असायचे..गेल्या पाच वर्षांतील राजकारणात अजित पवार अधिक आक्रमकतेने पुढे येताना दिसत राहिले. काँग्रेस ते भाजप अशी सहकारी पक्षांसोबतची बदलती संगत हा त्या आक्रमतेचाच भाग. राजकीय वैचारिकतेशी तडजोडीच्या आरोपांवर उत्तर म्हणूनही अजितदादांनी हीच आक्रमकता वापरली. त्यांच्या आक्रमकतेपुढे विरोधाची धार बोथट झाल्याचे अलीकडच्या काळात महाराष्ट्राने पाहिले. नेतृत्व घडण्यासाठी दशके जावी लागतात. त्यामुळेच अशा नेतृत्वाचे अकाली निधन समाजासाठी फार मोठी हानी असते. महाराष्ट्राची आज अशी फार मोठी हानी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.