Farmer Safety: चार दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील (जि. पुणे) पिंपरखेड येथील १२ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यात त्याचा मृत्यू झाला. पिंपरखेड, जांबूत परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यूची ही वर्षभरातील दहावी घटना असून, जखमी तर अनेक जण झाले आहेत. मागील महिन्यात याच गावातील साडेपाच वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यावर तिला प्राणास मुकावे लागले होते. .शिरूर, मंचर परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यास महिला, मजूर धजावत नाहीत, मुलांना शाळेत पाठविण्यास नागरिक तयार नाहीत. संतप्त नागरिकांनी बिबट्यांना ठार मारून परिसर बिबटमुक्त करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा म्हणून आंदोलन केले..Leopard Death: पिंपरखेड येथील बिबट्याचा वन विभागाकडून खात्मा .त्यानंतर राज्य सरकार पातळीवर बिबटे पकडण्यासाठी ‘एआय’चा वापर, पकडलेले बिबटे ‘वनतारा’मध्ये सोडणे, `स्पेशल लेपर्ड फोर्स’ची स्थापना, बिबट्यांना शेड्यूल दोनमध्ये आणण्याचा प्रयत्न तसेच नसबंदीवर विचार याबरोबर विदर्भातील वाघ-मानव संघर्ष रोखण्यासाठीचे उपाय योजले जातील, असे निर्णय झाले..या निर्णयांमुळे बिबट्यांची संख्या थोडी कमी होऊन हल्ल्यांचे प्रमाण घटेल, परंतु ते चालूच राहतील. या सर्व घडामोडींनंतर टाकळी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलीचा, तर चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता जीव कोणाचा महत्त्वाचा - हिंस्र श्वापदांचा की मानवाचा, ही चर्चा सुरू झाली आहे..Leopard Conflict: पाचशे बिबटे वनताराला पाठविणार : वनमंत्री नाईक .राज्यात दरवर्षी हजारो हेक्टरवरील पिके वानरे, रोही, हरिण, काळवीट, रानडुकरे हे वन्यप्राणी फस्त करतात, तर अस्वल, बिबटे, वाघ या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. एवढा गंभीर हा विषय असताना अजूनही याबाबत शासन-प्रशासन म्हणावे तेवढे गंभीर नाही. मानव-वन्यप्राणी संघर्ष एवढा वाढलेला असताना सहजीवनाबाबतचे प्रबोधन शेतकऱ्यांसह नागरिकांना आता पटताना दिसत नाही..शिरूर, जुन्नर, नाशिक परिसरातील उसातले बिबटे आता अहिल्यानगर, मराठवाड्यासह राज्यातील ऊस पट्ट्यात पसरत चालले आहेत. येत्या काही वर्षांत बिबट्यांच्या संख्येचा स्फोट होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती यातील जाणकार व्यक्त करीत आहेत. धरा-पकडा-जेरबंद करून कुठे तरी नेऊन सोडा, हे मानव-वन्यप्राणी संघर्ष समस्येवरील दीर्घकालीन उपाय नाहीत, हे यापूर्वीच सिद्ध झाले असताना आताच्या निर्णयांचा भरही त्यावरच दिसतो..जुन्नर वनविभागांतर्गत येणाऱ्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या ऊसप्रवण चार तालुक्यांत १७०० बिबटे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अशा वेळी केवळ ५०० बिबटे पकडून ते वनतारात सोडले तरी त्यातून समस्या सुटणार नाही. शिवाय बिबट्यांची नसबंदी तसेच त्यांना शेड्यूल दोनमध्ये आणण्याचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने हे उपाय सध्यातरी अधांतरीच वाटतात..बिबट्यांचा नसबंदीचा निर्णय झाला तरी त्यासाठी पूरक यंत्रणा वन विभागाकडे नाही शिवाय त्याचे परिणाम दिसायला २५ ते ३० वर्षांचा कालावधी लागतो, तोपर्यंत काय? वाघ-मानव आणि बिबट-मानव संघर्ष या दोन्ही समस्या पूर्णपणे भिन्न असल्याने विदर्भातील वाघ-मानव संघर्षावरील मात्रा बिबट प्रवण क्षेत्रात चालणार नाही.आता बिबट्या ही केवळ वन विभागाची जबाबदारी राहिली नसून, ती सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी झाली आहे. बिबट्यांचे हल्ले कमी करण्यासाठी कृषी, पशू संवर्धन आदी विभागांसह साखर कारखान्यांनीही पुढाकार घ्यायला हवा. बिबट्याच्या अंशतः शिकारीची मागणी होत असताना या विषयाचे गांभीर्य वाढतच चालले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.