Fruit Market: प्रतिकूल हवामान परिस्थितीत हापूस, केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत असताना शेतशिवारापासून ते बाजारापर्यंत रायवळचा चांगलाच दरवळ पाहावयास मिळतोय. .पूर्वी राज्यभरात बहुतांश शेताच्या बांधावर किंवा अगदी मधोमध एक-दोन तरी रायवळ आंब्यांची झाडे असायची. हवामान कसेही असले तरी ह्या झाडांना हमखास आंबे लागलेले असायचे आणि त्यात शेतकरी कुटुंबाची रसाळी होऊन त्यांचा हंगाम गोड व्हायचाच! विशेष म्हणजे प्रदेशनिहाय विविध रायवळ (गावठी) आंब्याच्या जातींचा आकार, रंग, चव, स्वाद हा वेगवेगळा आहे. काही आंबे रसासाठी चांगले तर काही कापून खाण्यासाठी, काही लोणच्यासाठी उपयुक्त तर काही औषधी गुणधर्मयुक्त! रायवळची फळेच नाही तर साल, पानेही औषधीदृष्ट्या उपयुक्त आहेत. .Mango Season: ग्रामीण भागात वाढली गावरान आंब्याला मागणी.अशी गुणवैशिष्ट्य लाभलेल्या बहुतांश रायवळ जाती आता मात्र नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. त्यांची जागा कलमीकरण केलेल्या, एकाच रंग, आकार, चवीच्या हापूस, केसर, पायरी या जातींनी घेतली आहे. प्रामुख्याने व्यावसायिक उत्पादनासाठी लावलेल्या हापूस, केसरच्या बागा हवामान बदलाच्या काळात अपेक्षित उत्पादन देताना दिसत नाहीत. गेल्या आणि यावर्षीच्या हंगामात हवामान बदलामुळे हापूस, केसरचे जेमतेम ३० ते ३५ टक्केच उत्पादन मिळाले आहे. .त्याचवेळी प्रतिकूल हवामान परिस्थितीत सुद्धा रायवळचा शेतशिवारापासून ते बाजारापर्यंत चांगलाच दरवळ पाहावयास मिळतोय. कोणत्याही जातीची आंबा बाग असो त्यात २० ते २५ टक्के झाडे रायवळची असली म्हणजे परपरागीभवन चांगले होऊन आंब्याचे उत्पादन वाढीस हातभार लागतो. त्यामुळे बदलत्या हवामानास पूरक, वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये असलेल्या रायवळ जातींचे संवर्धन राज्यात झाले पाहिजे. रायवळचे संवर्धन, संशोधनासाठी ‘बाएफ’च्या वतीने रायवळ आंबा महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले होते. या महोत्सवात रायवळ संशोधन, संवर्धनाला गती द्यावी, असे मत प्रसिद्ध चर्चासत्रात उपस्थित विविध तज्ञांनी व्यक्त केले..Mango Conservation: रायवळ आंब्याची विविधता जपूया; संवर्धन, संशोधनाला गती देण्याची सयाजी शिंदेची मागणी.एकंदरीत रायवळ जातींचे महत्त्व पाहता विभागनिहाय विविध जातींच्या जनुकीय तपासण्या करून त्यांना वेगळी ओळख लाभायला हवी. रायवळ जातींना वेगळी ओळख लाभल्यानंतर विभाग, गुणवैशिष्ट्येनिहाय जीन बॅंक तयार व्हायला हव्यात. रायवळची गुणवैशिष्ट्य, उपयुक्ततेचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार प्रचार झाला पाहिजे. असे झाल्यास जीन बॅंकेद्वारे शेतकरी विशिष्ट रायवळ जातींची लागवड करू शकतील. त्यामुळे रायवळ जाती नष्ट तर होणार नाहीत, उलट त्यांचे संवर्धन होईल. .याकरिता आंबा संवर्धक, कृषी विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घ्यायला हवा. या दिशेने एक पाऊल पुढे म्हणजे आंबा संवर्धक, अभ्यासक यांनी एकत्र येऊन आंबा जैवविविधता संवर्धन गटाची स्थापना केली आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. या गटाला कृषी विद्यापीठे तसेच राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य लाभायला हवे. रायवळ आंब्याचे संवर्धन झाले, त्यांची लागवड वाढली, उत्पादन वाढले म्हणजे हे आंबे ग्राहकांपर्यंत देखील पोहोचवावे लागणार आहेत. .त्याकरिता देखील बाएफ या संस्थेतर्फे कृषी जैवविविधता प्रकल्पांतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन सुरू आहे, ही बाब देखील उल्लेखनीय म्हणावी लागेल. पणन मंडळ मुंबई, पुणे येथे हापूस आंबा महोत्सव भरविते. त्यात थेट शेतकऱ्यांचे हापूस आंबे ग्राहकांपर्यंत पोहोचविले जातात. पणन मंडळाने असेच महोत्सव रायवळ आंब्यासाठी देखील भरवायला हवेत. असे झाल्यास रायवळचे खऱ्या अर्थाने ब्रॅंडिग होईल. उत्पादन ते विक्रीपर्यंत रायवळची अशी व्यावसायिक मूल्य जपली गेली तर हापूस, केसर प्रमाणे त्यांनाही ग्लॅमर लाभण्यास वेळ लागणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.