संत्रा बागांची तोड ही सिट्रस डीक्लाइनमुळे असो की फळगळीने असो, याचे गांभीर्य संशोधक तसेच शासन असे कोणालाही दिसत नाही.Impact of climate change on Nagpur orange orchards: ऑरेंज सिटी म्हणून नागपूरची ओळख जगभर असली तरी संत्र्याची लागवड अमरावती जिल्ह्यात अधिक आहे. परंतु मागील सात-आठ वर्षांपासून या भागातील शेतकरी फळगळतीसह नवे वाण, दर्जेदार रोपं, प्रगत लागवड तंत्र, नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, घटते उत्पादन, वाढणारा उत्पादन खर्च आणि संत्रा भावातील मोठ्या प्रमाणातील चढ-उतार यांनी त्रस्त आहेत. संत्र्याची शेती उत्पादकांना आतबट्ट्याची ठरत आहे. तोट्याची शेती करायची कशाला म्हणून मागील चार-पाच वर्षांपासून बागा तोडण्याचे प्रमाण वाढत आहे..तत्पुर्वी सिट्रस डीक्लाइन या जटिल समस्येमुळे अनेक बागायतदारांनी संत्रा बागांवर कुऱ्हाड चालविली होती. संत्रा बागांची तोड ही सिट्रस डीक्लाइनमुळे असो की फळगळीने असो, याचे गांभीर्य संशोधक तसेच शासन असे कोणालाही दिसत नाही. आता तर या भागातून हंगामात संत्रा फळांची वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो दिसण्यापेक्षा तोडलेल्या बागांची इंधन म्हणून वाहतूक करणारे टेम्पो, ट्रकच अधिक दिसताहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत अमरावतीसह एकंदरीतच विदर्भातील संत्रा नामशेष झाले तर कोणालाही आश्चर्य वाटू नये, अशीच काहीशी सध्याची परिस्थिती आहे..Orange Farming: संत्रा लागवडीत शून्य मशागत तंत्रावर भर.विदर्भाच्या मातीत रुजलेले एकमेव फळपीक म्हणजे संत्रा. आकर्षक रंग आणि अवीट अशा आंबटगोड चवीने नागपुरी संत्र्याला जगभरातून मागणी होते. असे असताना संत्र्याच्या बाबतीत नवसंशोधन, प्रगत लागवड तंत्रज्ञान, प्रभावी अन्नद्रव्य तसेच कीड-रोग व्यवस्थापन, विक्रीव्यवस्था आणि प्रक्रिया अशा सर्वच स्तरावर संस्थात्मक आणि शासन पातळीवर फारसे काम झालेले नाही, त्याचेच परिणाम संत्रा उत्पादक भोगत आहेत. लिंबूवर्गीय फळपिकांत संशोधनाला चालना मिळावी याकरिता राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था नागपुरात स्थापन करण्यात आली..मात्र, गेल्या अनेक वर्षांत उत्पादकता वाढीसाठी पूरक तंत्रज्ञान, शिफारशी तर दूरच, परंतु सिट्रस डीक्लाइन, फळगळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना सुचविण्यातही ही संस्था अपयशी ठरली आहे. त्यातच केंद्रीय संशोधन संस्था असलेल्या भागातील अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता..Orange Farming Success: संघर्षातून बहरली संत्र्याची बाग.त्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गतच्या लिंबूवर्गीय संशोधन प्रकल्पाचाही समावेश होता. संत्र्यासह इतरही लिंबूवर्गीय पिकांमध्ये अनेक समस्यांनी उत्पादक ग्रासलेला असताना अशा निर्णयातून सरकारचे या पिकांकडील दुर्लक्ष आपल्या लक्षात यायला हवे. शेवटी या निर्णयास शेतकरी, शास्त्रज्ञांनी प्रखर विरोध केल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांना हा प्रकल्प बंद करणार नाही, असे स्पष्ट करावे लागले..विदर्भातून देशभरातील बाजारात संत्रा जातो. परंतु विक्री, साठवण, प्रक्रिया, वाहतूक याबाबत कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने उत्पादकांना कमी दर मिळतो. संत्र्याची प्रतवारी, व्हॅक्स कोटिंग आणि बॉक्स पॅकिंगमध्ये पाठविला, तर त्याची टिकाऊक्षमता वाढते, प्रत चांगली राहून दरही अधिक मिळतो. परंतु संत्रा ग्रेडिंग, पॅकिंगचे जेमतेम दोन-तीन प्रकल्प विदर्भात असून, तेही बहुतांश वेळा बंदच असतात..काही काळ कंपन्यांकडून चालविल्या जात असलेल्या या प्रकल्पांचा उत्पादकांना काहीही फायदा होत नाही. संत्र्यावरील प्रक्रियेबाबतच्या अनेक घोषणा देखील हवेतच विरल्या आहेत. संत्रा निर्यातीची अशीच दयनीय अवस्था आहे.संत्र्याची बहुतांश निर्यात शेजारील राष्ट्रांत होत असली तरी त्यातही सातत्य नाही. अमरावती, नागपूर परिसरातील संत्रा टिकवायचा असेल तर वाण संशोधनापासून ते एकंदरीतच मूल्यसाखळी विकासावर व्यापक काम करावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.