Maharashtra Citrus Farming: विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या मागे फळगळीचे लागलेले शुक्लकाष्ठ संपायचे नाव घेत नाही. सध्या अमरावती भागामध्ये आंबिया बहर संत्र्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू आहे. संत्रा या पिकामध्ये अगदी नैसर्गिकच थोड्याफार प्रमाणात फळगळ होते. परंतु हवामान बदलाच्या मागील दीड-दोन दशकांमध्ये ही फळगळ वाढली असून, पर्यायाने आर्थिक नुकसानही वाढली आहे. .संत्रा - मोसंबीतील फळगळ समस्येला त्रस्त होऊन काही शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढून टाकल्या आहेत. असे असताना याच परिसरातील राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठांतर्गतच्या संशोधन संस्था यावर प्रभावी उपाययोजना देऊ शकले नाही. कृषी विभागाकडून देखील संत्रा फळगळीवर उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात नाही..संत्रा फळगळीने उत्पादकांचे अर्थकारण कोलमडत असताना त्यांनी आवाज उठविल्यावर पाहणी-पंचनाम्याचा सोपस्कार केला जातो. परंतु प्रत्यक्ष त्यांच्या हाती काहीही पडत नाही. जानेवारी २०२२ मध्ये संत्रा फळगळती रोखण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात आला होता. संत्रा फळगळतीच्या अभ्यासासाठी अनेकदा समित्याही स्थापन करण्यात आल्या. परंतु या सर्वांमधून देखील फारसे काही साध्य झाले नाही, हेच सध्याच्या फळगळीतून स्पष्ट होते..Orange Fruit Drop Issue: अजैविक ताणामुळे संत्रा बागांत फळगळ समस्या.संत्रा पिकांमध्ये आंबिया बहर हा नैसर्गिकरीत्या येतो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा बहर घेण्याकडे असतो. आंबिया बहर मधील फळांची वाढ मुळातच अत्यंत विपरीत अशा परिस्थितीत होते. या बहरात थंडीमध्ये फुलांचे रूपांतर बहरात होते. फळे वाढीच्या अवस्थेत कडक उन्हाळा असतो आणि त्यानंतर फळ काढणी पावसाळ्यात होते. हवामान बदलाच्या काळात या तिन्ही ऋतूंमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्यामुळे संत्रा फळपिकाच्या अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळे निर्माण होऊन फळगळ वाढली आहे..फळगळतीसाठी हे एकमेव कारण नाही तर रसशोषक पतंग, फळमाशी, सीट्स सिला व कोळी या किडींमुळे आणि कोलेटोट्रिकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व अल्टरनेरिया या बुरशीमुळे देखील फळगळ होते. याबरोबर अन्नद्रव्य तसेच एकंदरीत बाग व्यवस्थापनाने देखील फळगळ होते. यातील तज्ज्ञ नेमक्या कोणत्या कारणांमुळे फळगळ होते, हे जाणून घेईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे त्यांनी सुचविलेल्या उपाय योजनांचा फायदा होताना दिसत नाही. असा हा सगळा फळगळीचा गुंता आहे. वाढत्या फळगळीच्या समस्या कमी करणे हे संशोधकांपुढील मोठे आव्हान असून ते त्यांनी स्वीकारायला हवे..Climate Change Crisis: आंबिया बहरावर हवामान बदलाचे संकट.संत्रा फळगळीची कारणे अनेक असली तरी नेमकी कशामुळे फळगळ होत आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले पाहिजेत. यासाठी संशोधकांनी संशोधन वाढवायला हवे. विशेष म्हणजे फळगळ होत असताना नेमका उपाय उत्पादकांना सुचवायला हवा. त्या उपायांची परिसरातील सर्व संत्रा उत्पादकांकडून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न वाढवायला हवेत. संत्रा फळगळीसाठीच्या प्रतिबंधक उपाययोजना उत्पादकांना बहर व्यवस्थापनातच सांगायला हव्यात..संत्रा उत्पादकांनी सुद्धा आपल्या बागेचे अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन अगदी योग्य पद्धतीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायला हवे. बाराही महिने संत्रा बाग स्वच्छ राहील, ही काळजी घेतली पाहिजे. पक्व फळांची गळ होत असताना पडलेली फळे प्रक्रियेसाठी वापरता येतील का, यावरही काम झाले पाहिजे. संत्रा फळगळीने उत्पादकांचे कंबरडे मोडत असल्याने त्यांना तत्काळ आर्थिक मदत देखील व्हायला हवी. आपल्या अवीट चवीने जगाला भुरळ घालणारे संत्रा फळपीक वाचवायचे असेल तर दर्जेदार खुटांपासून ते फळे काढणी-विक्री-प्रक्रिया-निर्यातीपर्यत व्यापक संशोधनात्मक आणि व्यवस्थापनात्मक बदल करावे लागणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.