हिवाळी अधिवेशनात कधी काळी विरोधकांनी विरोधाच्या मशाली पेटवल्या आणि सरकारला जेरीस आणल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र महायुती जशी सत्तेत आली तसे विरोधक मुंबई असो की नागपूर, गारठ्यातून बाहेर यायला तयारच नाहीत. आता तर ते इतके गारठलेत की त्यांच्या तोंडतून शब्द फुटायला तयार नाही..विधिमंडळाचे जेमतेम आठ दिवसांचे अधिवेशन नागपुरात रविवारी संपले. राज्यात आबादी आबाद सर्व काही सुरू आहे असे चित्र या निमित्ताने जनतेसमोर गेले हे बरेच झाले. कारण जनता कोणत्या प्रश्नाने त्रस्त आहे हे ना सत्ताधाऱ्यांना माहीत आहे ना विरोधकांना. विरोधक हे जनतेचा आवाज असतो असे म्हटले जाते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता जनतेचे प्रतिनिधित्व करत जनतेच्या भल्याचे प्रश्न उचलून धरत सरकारला धारेवर धरत असतो. सरकारकडून निर्णय करून घेत असतो. मात्र दोन्ही सभागृहांत लुटुपुटुच्या लढाईला लाजवेल इतक्या नुरा कुस्त्या पाहायला मिळाल्या..Nagpur Winter Session: बौद्धिक दिवाळखोरी.उपराजधानीतील हिवाळी अधिवेशनाकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या नजरा लागलेल्या असतात. या अधिवेशनात प्रामुख्यमाने तेथील प्रश्नांची चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र चित्र काय आहे? लक्षवेधी सूचनांचे विषय आणि तारांकित प्रश्न पाहिले तर मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतील प्रश्न, त्यातही बांधकाम व्यावसायिकांशी, पुनर्विकास प्रकल्पाशी संबधित प्रश्नांवर मुबलक चर्चा करण्यात आली. राज्यातील ९३ लाख हेक्टर जमिनीवरील पिके खरवडून गेली. मागील वर्षात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूरमधील एका शेतकऱ्याला कर्ज भागविण्यासाठी किडणी विकावी लागली. राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभ्या करून घेत नाहीत. सोयाबीन खरेदीत घोळ सुरू आहे. सीसीआयची कापूस खरेदी सत्तधारी आमदारांनी गोंधळ घातल्यावर वाढवली. या सगळ्या गोंधळात विरोधकांचा आवाज कुठे होता?.आता कुणी म्हणून राज्यात विरोधक औषधाला शिल्लक नाही. तरीही जे काही शिल्लक आहे त्यांच्यात काय सुरू आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) असे तीन पक्ष विरोधात आहेत. यातील ज्येष्ठ नेत्यांनींची प्रत्येक विषयावर बोलून घेण्यात धन्यता मानली. नव्या आमदारांना बोलू देणे, त्यांच्या प्रश्नांना मांडण्याची संधी देणे हे कर्तव्य असते. मात्र प्रत्येक प्रश्नावर विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील, भास्कर जाधव हेच बोलत होते. त्यामुळे राष्ट्रवादीची खिंड लढवणारे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह अन्य आमदार अपवादाने सभागृहात होते. अर्थात, त्यांच्या अनुपस्थितीला इतकेच कारण पुरेसे नाही हेही खरे आहे..Nagpur Winter Session: छावणीच्या थकित बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित अमेडिया कंपनी प्रकरण, महसूल विभागाने निवडणूक आयोगाच्या आडून तहसीलदारांना दिलेल्या पदोन्नत्या, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला न पाठवणे, रायगड जिल्ह्यात एका आमदाराच्या घरात सापडलेली नोटांची बंडले, सातारा जिल्ह्यात ड्रग्ज कारखान्यावर पडलेली पोलिसांची धाड अशा अनेक प्रश्नांची मालिका विरोधकांना दिसेना झाली आहे. सातारा येथे ऐन अधिवेशन काळात पोलिसांनी एका बड्या नेत्याच्या नातेवाइकांच्या नावावर असलेल्या शेतात धाड टाकून ड्रग्जचा साठा जप्त केला. मात्र हाक ना बोंब अशी अवस्था आहे. विरोधक नेमके थंडीने गारठले की अन्य कोणत्या कारणांनी, हे समजायला मार्ग नाही..भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सत्ताधारी असून अनेक विषयांवर सरकारचे वाभाडे काढत होते. बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके या सत्ताधारी आमदारांनी भर विधानसभेत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या विभागाची लक्तरे काढली. अपवाद वगळला तर विरोधातील एकही आमदार बोलायला तयार नाही. विधान परिषदेत सदाभाऊ खोत यांचे भाषण म्हणजे घरचा आहेर होता. हे विधेयक म्हणजे राज्याच्या मंत्र्याने गावचा सरपंच होण्यासारखे आहे असा त्यांच्या भाषणाचा सूर होता. आपल्या पक्षाच्या मंत्र्याला आरसा दाखवत असताना विरोधकांना काय अडचण होती, असा प्रश्न पडू शकतो. पण दोनच दिवसांपूर्वी विधान परिषदेतील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपवासी झाल्या. यावरून विरोधातील आमदारांचे घोंगडे कुठे अडकले आहे, याची कल्पना जनतेला यावी. या घोंगड्यासाठी कुणीही बोलायला तयार नाही..Nagpur Winter Session: महापालिकेकडे लक्ष; शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष .पणनमंत्र्यांचा सोसनाफेड आणि एनसीसीएफच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर कितीही बोंब असली तरी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अच्छे दिन कायम असतात. त्यांनी नुकतेच राष्ट्रीय बाजार समिती सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. या विधेयकात त्यांनी पणनमंत्री राष्ट्रीय बाजार समितीचे अध्यक्ष असतील अश तरतूद मान्य करून घेतली. अन्य बऱ्याच तरतुदी आहेत. मात्र एखाद्या बाजार समितीचा अध्यक्ष पणनमंत्री का असावा याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. कापूस, सोयाबीन खरेदीवरून त्यांचे वाभाडे निघत असताना हे विधेयक दीर्घ चर्चेनंतर मंजूर झाले..बहुतांश सत्ताधारी आमदारांनी या विधेयकाची पिसे काढली. मात्र शेवटी चारऐवजी पाच शेतकरी प्रतिनिधी संचालक मंडळावर घेण्याच्या आणि किरकोळ दुरुस्त्यांना मान्यता देत हे विधेयक मंजूर झाले. विशेष म्हणजे हे विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी शांत राहणे पसंत केले. रावल हे पणनमंत्री झाल्यापासून त्यांनी काही गोष्टींचा चंग बांधला होता. त्यात पणन खात्याची सहकार खात्यापासून काडीमोड झाला पाहिजे असा चंग प्रथम क्रमांकावर होता. या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी अतिरिक्त मुख्य कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती..या समितीने पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना व सक्षमीकरण करण्यासाठी मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र सवर्ग तयार करण्यासाठी अभ्यास करून शिफरशी केल्या आहेत पण मित्राचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी अनेक बदल सुचवले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवला आहे. या बदल्यात म्हणून मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समित्यांचा दर्जा देऊन त्यांचे अध्यक्षपद देण्यात आले असावे..अस्तित्व आता हातघाईवरनगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतील तीन पक्ष एकमेकांविरोधात लढले. महाविकास आघाडीत मात्र सामसूम होती. आता तर थेट महापलिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात मुंबईसारखी महानगरपालिका असल्याने तेथे अनेकांचे अस्तित्व पणाला लागले आहे. गेल्या दोन निवडणुकांत हातातोंडाशी आलेला महापौर पदाचा घास भाजपला खुणावतो आहे. उद्धव ठाकरे यांना शेवटचे आव्हान देऊन धनुष्यबाण हा आमच्याच आहे हे एकनाथ शिंदे यांना सिद्ध करायचे आहे, तर ठाकरे बंधू अस्तित्वाची लढाई लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी- चिंचवड महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कशी लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.