Onion price news: कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नसल्याने कांद्याचा प्रश्न पेटला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत काही दिवसांपूर्वी संतप्त शेतकरी उपोषणाला बसले होते.तीन दिवस चाललेले हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे असल्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेऊन शिष्टाई केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी प्रतनिधींची बैठक घडवून आणून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु ही बैठक झालीच नाही. .विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) सदस्य सचिन अहीर यांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी कांदा खरेदी आणि बैठकीच्या आश्वासनाचा मुद्दा मांडला. त्यावर शेतकऱ्यांकडून मार्च मध्येच कांदा खरेदी केला जावा असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याचे पणनमंत्री जयकुामर रावल यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्याच बरोबर त्यांनी निर्यातीच्या मुद्यावरही भाष्य केले..Onion Farmers: कांद्यासाठी भावांतर योजना राबवा.पारंपरिक बाजारपेठांमध्ये स्पर्धा वाढत असल्याने नवीन निर्यात बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले. श्रीलंका आणि बांगलादेश हे पूर्वी भारतीय कांद्याचे मोठे आयातदार होते; मात्र गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतःचे कांदा उत्पादन वाढविले आहे. पाकिस्तान चीनमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात करत आहे. त्यामुळे जागतिक कांदा व्यापारात स्पर्धा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर मॉरिशससारख्या नव्या बाजारपेठा धुंडाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारच्या आडमुठ्या आणि कचखाऊ धोरणामुळे कांदा निर्यातीच्या क्षेत्रात देशाची पत ढासळली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आशियातील हक्काची बाजारपेठ आपण गमावली.पणनमंत्री भारताच्या निर्यातीवरील हल्ला म्हणून त्याचे वर्णन करत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणात्मक धरसोडीची मोजावी लागलेली ती किंमत आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. कारण भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे ८० टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते..Onion Farmers Demand: कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन.या पार्श्वभूमीवर मॉरिशसच्या रूपाने कांद्यासाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे चित्र पणनमंत्र्यांनी रंगविले आहे. मॉरिशस भारतातून एक लाख टनांहून अधिक कांदा आयात करणार आहे; त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगर या दोन प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी निर्यातीची संधी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. परंतु निर्यातदारांच्या मते हा अंदाज वास्तवाला धरून नाही..कारण मॉरिशसच्या बाजारपेठेचे आकारमान लहान आहे. मॉरिशस दरवर्षी केवळ काही हजार टन कांदा आयात करतो. तसेच मॉरिशसमध्ये कांदा आयात करण्यावर कडक नियंत्रण आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या देशाच्या कृषी पणन मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या केवळ चार निर्यातदारांनाच तिथे कांदा पुरवण्याची परवानगी आहे. त्यामुळे त्यांचे या व्यापारावर वर्चस्व आहे. परिणामी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही..निर्यातदार शेतकऱ्यांकडून कांदा कमी भावाने खरेदी करतात आणि चढ्या दराने निर्यात करून नफा कमावतात. या पार्श्वभूमीवर काही निर्यातदारांनी मॉरिशस प्रशासनाला पुरवठा व्यवस्था अधिक खुली करण्याची विनंती केली आहे.उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार मॉरिशसचा बाजार काही मोजक्या कंपन्यांपुरता मर्यादित न ठेवता अधिक निर्यातदारांसाठी खुला केल्यास स्पर्धा वाढेल. तसे झाले तरच निर्यातीमधून मिळणाऱ्या नफ्यातील अधिक हिस्सा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.