Maharashtra Farmer Issue: आपत्तीमध्ये शासन प्रशासनाने कसे काम केले पाहिजे, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेला आहे. त्यांच्या काळात दुष्काळ पडला असता त्यांनी फर्मावलेला आदेश सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. महाराजांचे नाव घेऊन सुशासनाच्या बाता मारणाऱ्या राज्य सरकारचा आपत्तीमधील कारभार मात्र याच्या एकदम विपरीत दिसून येतो. सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पशुधनासह मोठी जीवित, वित्तहानी झाली. .असे असताना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने एक तर विलंब केला. सर्वच स्तरातून यावर टीका झाल्यावर सुमारे ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यात चलाखीने मदतीचा आकडा फुगवून सांगण्यात आला. त्यानंतर दिवाळीच्या आधी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु फारच कमी शेतकऱ्यांच्या खात्यात, अत्यंत तुटपुंजी मदत जमा झाली. बहुतांश शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली..दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे का मिळाले नाहीत, यासंदर्भातील एक धक्कादायक बाब मंत्रिमंडळ बैठकीत उघड झाली. दिवाळीत काही जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी सुटीवर गेल्यामुळे मदत वाटपास विलंब झाला, याबद्दल महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी संतप्त तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव राजेशकुमार यांना धारेवर धरले. प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे शेतकरी जेरीस आले आहेत..Farmer Issue: आपत्तीग्रस्ताकडून तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड .शिवाय अॅग्रीस्टॅक आणि ई-केवायसीचा घोळ अजूनही सुरूच आहे. खरडून गेलेल्या जमिनीचे तर अजून पंचनामे होणे बाकी आहे. गंभीर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही प्रशासनाचे वर्तन किती गेंड्याच्या कातडीचे असू शकते, याचा हा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. प्रशासनावर वचक असेल आणि या नाठाळ घोड्यावर पक्की मांड ठोकून त्याला वठणीवर आणण्याचे कौशल्य असेल तरच राज्याचा कारभार सुरळीत चालू शकतो..वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रशासकीय कौशल्याच्या अनेक किस्से-कहाण्या आजही सांगितल्या जातात. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगातून नेमका तोडगा काढण्याची त्यांची हातोटी होती. तसेच परिस्थितीचे नेमके आकलन करून धडाडीने काम करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी होती. थेट जमिनीशी संपर्क असलेले हे नेते होते. त्यांना लोकांची नाडी कळत होती..Farmer Issue: शेतीप्रश्नांवर पाडव्याला किसान सभेचे राज्यभर आंदोलन.प्रशासकीय नियम, अटींचे जंजाळ कायमच असते. बहुतांश अधिकारी तो गुंता आणखीनच वाढविण्यात धन्यता मानतात. अशा प्रसंगी लोकांचे व्यापक हित ध्यानात घेऊन त्यातून नेमकी वाट कशी काढायची, हेच राजकीय नेतृत्वाचे कौशल्य असते. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा परिस्थितीचा अभ्यास आणि आकलन उत्तम आहे;.परंतु हेडलाईन मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीत राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे जाणवते. तसेच प्रशासनाला योग्य संदेशही जाणे आवश्यक आहे. अभूतपूर्व संकटाच्या काळात प्रशासकीय व्यवस्था इतक्या कोडगेपणाने वागत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर ठोस कारवाई करणे, हाच त्यासाठीचा योग्य मार्ग आहे..अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली पाहिजे. राज्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून भरभक्कम पॅकेज मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राज्य सरकारने मदतीसाठी प्रस्ताव दिल्यास पंतप्रधान लगेच त्याला प्रतिसाद देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. राज्याने हा प्रस्ताव पाठवला की नाही, याबद्दल काहीच स्पष्टता नाही. एकंदर प्रशासनावर वचक आणि डबल इंजिन सरकारचा फायदा घेण्याची संधी या दोन्ही आघाड्यांवर जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.