तृण यंत्राचे व्यापारीकरण करताना किंमत थोडी कमी होईल, यावर संशोधकांनी भर द्यायला हवा. यात खासगी उद्योजकांना प्रोत्साहन दिले तर त्यांच्यातील स्पर्धेतून यंत्राची किंमत कमी होऊ शकते. आज शेतकऱ्यांची सर्वांत मोठी डोकेदुखी कोणती असेल तर ती आहे, त्यांच्या शेतात वाढणारी विविध तणे! पिकांमध्ये होणाऱ्या तणांच्या प्रादुर्भावाने एक तर उत्पादन खर्च वाढत आहे, दुसरीकडे तणांचे वेळीच नियंत्रण झाले नाही तर उत्पादनात मोठी घट येत आहे. पावसाळ्यात पाऊस लागून असला की तणांचा प्रादुर्भाव वाढतो, शिवाय नियंत्रणावर मर्यादा येतात. .तण नियंत्रणासाठी सध्या उन्हाळी मशागत, निंदणी, कोळपणी तसेच तणनाशकांचा वापर हे उपाय योजले जातात. ऐन हंगामात निंदणी, कोळपणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजुरीचे दरही वाढलेले असल्याने ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पीकनिहाय आंतरमशागतीसाठी फारसी यंत्रे-अवजारे उपलब्ध नाहीत..Ghaneri Weed Control: घाणेरीचे नियंत्रणाचे उपाय.अनेक तणनाशकांचा वापरही हल्ली प्रभावी ठरताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर लेसर वीडिंग तंत्रावर आधारीत ‘तृण’ हे स्वयंचलित यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. कृषी यांत्रिकीकरणातील बहुतांश यंत्रे-अवजारे ही एक तर विदेशातून आयात केलेली अथवा विदेशी तंत्राने देशात निर्मित आहेत. अशा वेळी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या तृण यंत्राचे स्वागतच करायला हवे..तृण यंत्राची बॅटरी क्षमता, वेग, कार्यक्षमता चांगली आहे. शिवाय शेतात विविध पिकांच्या रचनेनुसार यंत्राच्या चाकामधील अंतर कमी-जास्त करण्याची सुविधा आहे. या यंत्राच्या प्रक्षेत्र चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. शिवाय बाजारात आणतेवेळी त्यात आणखी शेतकरी उपयोगी सुधारणा करण्याची ग्वाही यंत्र विकसित करणाऱ्या तंत्रज्ञांनी दिली आहे. आपल्या देशात मुळातच कृषी यांत्रिकीकरणात कमी संशोधन झाले आहे. जे संशोधन झाले त्याला व्यावसायिक स्वरूप मिळाले नाही. त्याचे एक कारण संशोधकांना प्रोत्साहन मिळत नाही. यंत्रे-अवजारांच्या व्यापारीकरणासाठी देशात खासगी उत्पादकांना पूरक धोरणे नाहीत. अशा वेळी तृण हे यंत्र या अडचणींमध्ये अडकणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल..Weed Control: लव्हाळा तण नियंत्रणाचे कमी खर्चात ४ प्रभावी उपाय.यांत्रिकीकरणाचा एक हेतू शेती कामांतील वेळ, कष्ट आणि खर्चही वाचावा हा आहे. सध्या तृण या यंत्राची बाजारातील किंमत आठ ते नऊ लाख रुपये अर्थात देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी अशी नाही. त्यामुळे या यंत्राचे व्यापारीकरण करताना किंमत थोडी कमी होईल, यावर संशोधकांनी भर द्यायला हवा. यात खासगी उद्योजकांना प्रोत्साहन दिले तर त्यांच्यातील स्पर्धेतून यंत्राची किंमत कमी होऊ शकते..या यंत्राच्या व्यापारीकरणात कर सवलत हा निर्मिती खर्च कमी करण्यासाठीचा एक पर्याय आहे. अशा इतरही सवलती देण्याबाबत सरकार पातळीवर विचार व्हायला हवा. यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना, त्यांचा गट, उत्पादक कंपनी यांना थेट अनुदान हाही एक चांगला पर्याय आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा हे यंत्र वैयक्तिक खरेदी करण्याऐवजी गट-समूहात घेऊन त्याचा वापर करायला हवा, तसेच भाडेतत्त्वावर इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवे..पर्यावरणीयदृष्ट्या देखील तण नियंत्रणासाठीच्या ट्रॅक्टरद्वारे खोल मशागतीपासून ते तणनाशकांच्या वापराच्या तुलनेत लेसर तंत्रावर आधारीत तृण यंत्र सरस असल्याचे दिसते. तण नियंत्रणासाठी अशा यंत्र-तंत्राचा वापर वाढल्यास जमिनीच्या घनीकरणापासून ते तिच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून या यंत्राचे जलद व्यापारीकरण होऊन ते अधिकाधिक शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचण्यातच सर्वांचे हित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.