Dairy Farming: राज्यात सध्या डेअरी उद्योगात तेजी असून, दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय खासगी, तसेच सहकारी दूध संघांनी, तर विक्रीदरातही वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. दुष्काळी स्थितीमुळे घटते उत्पादन, वाढलेली मागणी हे दूधदर वाढीस अनुकूल घटक आहेत. दूध भुकटी आणि लोण्याच्या दरातील तेजीही दुधाचे दर वाढण्यास उपयुक्त ठरत आहे. .शिवाय दुधाचे उत्पादन घटत असताना राज्यात भेसळयुक्त, कृत्रिम दुधाचा सुळसुळाट पाहायला मिळतो. परंतु ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थांना चांगलाच आळा बसला आहे. परिणामी, बाजारात दुधाचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढीला चालना मिळत आहे. खरे तर दूध उत्पादनाचा वाढता खर्च, दुधाला सातत्याने मिळणारा कमी दर यामुळे मागील दीड-दोन दशकांपासून दुग्धोत्पादन व्यवसाय उत्पादकांना तोट्याचा ठरत आहे..Dairy Processing Business: संघर्षातून घेतली दुग्ध प्रक्रिया उद्योगात भरारी.अशा परिस्थितीत डेअरी उद्योगाला आलेल्या तेजीचे स्वागतच करायला हवे. परंतु पुढे वाढत्या दुष्काळामुळे या उद्योगापुढील आव्हानेही वाढणार आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर ४२ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ५५ ते ५७ रुपये मिळतोय. यातून दूध उत्पादकांची खर्च-मिळकतीची केवळ तोंडमिळवणी होत आहे. मात्र हाच दर ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत अनुक्रमे ७० रुपये आणि ७८ रुपये होतो. अर्थात, दुधाचे अधिक पैसे अजूनही मध्यस्थांच्याच हातात जातात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आताच हस्तक्षेप करायला हवा..राज्यातील दूध उत्पादकांपुढे सध्या सर्वांत मोठे आव्हान दुष्काळाचे आहे. पाणीटंचाईची झळ थेट पशुधनाला देखील बसणार आहे. पाणीटंचाईमुळे हिरवा आणि कोरडा अशा दोन्ही चाऱ्याची टंचाई पशुपालकांना जाणवू लागली आहे. पशूसंवर्धन विभागाचे यावर मात्र करण्याचे ठोस असे काहीही नियोजन दिसत नाही. कृषी विभागाने नुकतेच एक पत्रक काढून रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा लागवड करण्याचे आवाहन केले आहे. आता ही चारा लागवड कधी होणार आणि पशुधनाला चारा कधी उपलब्ध होणार, हा येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत चाराटंचाईच्या झळा मात्र पशुपालकांना बसणार आहेत..Maharashtra Dairy Industry: डेअरी उद्योगात तेजी.भीषण चाराटंचाई निर्माण होऊन हिरव्या, कोरड्या चाऱ्याचे दर प्रचंड वाढतील. पशुखाद्याचे दरही वेगाने वाढताहेत. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पशुखाद्य कंपन्यांनी प्रति गोणी १५० ते २०० रुपये दर वाढविले आहेत. कच्च्या मालाचे दर वाढल्याने पशुखाद्याचे दर वाढवावे लागत आहेत, असे कारण कंपन्या सांगताहेत. यात काही अंशी तथ्यही आहे. सध्या दुधाला चांगला दर मिळत असला तरी चारा, पशू खाद्यावरील खर्च वाढल्याने उत्पादकांच्या हाती फारसे काही उरत नाही..दुष्काळाची तीव्रता जसजशी वाढेल, तसतसा हा खर्च वाढत जाऊन दूध उत्पादक अडचणीतच येणार आहेत. पशुखाद्यावर दूध उत्पादकांना काही अनुदान देता येईल का यावर विचार व्हायला हवा. अथवा पशुखाद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना काही सवलती देता येतील का, हेही पाहावे. दुष्काळात अनेक पशुपालक दावणी मोकळ्या करतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आगामी चारा-पाणीटंचाईत राज्यातील एकाही पशुपालकांवर ही वेळ येऊ नये, असे नियोजन हवे. एवढेच नाही तर दुधाचे दर वाढत असताना उत्पादकांच्या घरात आर्थिक समृद्धी पोहोचली, तरच या व्यवसायाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे म्हणता येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.