Microplastic Contamination in Indian Rivers and Fish: कोकणातील उल्हास आणि घाटावरील भीमा या नद्यांमध्ये अधिवास असलेल्या ‘वरडोळा’ माशाच्या पोटात आढळलेल्या सूक्ष्म प्लॅस्टिकसंदर्भातील बातमी ही केवळ दोन नद्यांमधील प्रदूषणाची सुटी नोंद नाही. ती अवघ्या जगाला ग्रासून टाकणाऱ्या प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटाची स्थानिक पातळीवर वाजलेली धोक्याची घंटा आहे. माणसाने वापरून फेकलेले प्लॅस्टिक नदीत जाते, तिथून माशांच्या पोटात आणि अखेरीस अन्नसाखळीतून पुन्हा माणसापर्यंत पोहोचते, हेच या आणि इतरही ठिकठिकाणी झालेल्या अभ्यासांतून अधोरेखित होते. उल्हासमधील १७ टक्के आणि भीमेतील ६५ टक्के माशांच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिक आढळल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे..प्लॅस्टिकने मानवी जीवन अधिक सोयीचे केले; पण ‘वापरा आणि फेका’ या संसर्गाने ग्रस्त संस्कृतीने त्याच प्लॅस्टिकचे पर्यावरणीय संकटात रूपांतर केले. त्यातूनच १९५० मध्ये २० लाख टन असलेले जागतिक प्लॅस्टिक उत्पादन पुढील सात दशकांत थेट ३० कोटी टनांपर्यंत वाढले. सागरी पक्ष्यांपैकी सुमारे ९० टक्के पक्ष्यांनी प्लॅस्टिकचे तुकडे गिळले असण्याची शक्यताही जैवशास्त्रज्ञांनी नोंदविली आहे. म्हणजे प्लॅस्टिक आता नुसताच कचरा राहिलेला नसून पृथ्वीच्या जैविक आणि भूगर्भीय व्यवस्थेचा बेमालूम भाग झालेला मानवनिर्मित घटक बनला आहे..Microplastics In Food: मायक्रोप्लॅस्टिक : अन्नातील अदृश्य संकट.नद्यांपेक्षा समुद्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञ आंद्रेस कोझार यांच्या चमूच्या नेतृत्वाखाली झालेल्या जागतिक अभ्यासात समुद्रातून गोळा केलेल्या ८८ टक्के नमुन्यांत प्लॅस्टिक आढळले आहे. तसेच जगातील पाचही उप उष्णकटिबंधीय महासागरी आवर्तांच्या अभिसरण क्षेत्रात प्लॅस्टिक साचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एन्व्हायर्न्मेंटल पोल्युशन’ या संशोधनपत्रिकेत याविषयीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे..समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिकचा अंदाज ७ हजार ते ३५ हजार टन इतका वर्तवण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात खूप कमी प्लॅस्टिक पृष्ठभागावर दिसते हीदेखील वस्तुस्थिती आहे. प्लॅस्टिकचे अतिसूक्ष्म कणांत विघटन होणे, ते जैविक प्रक्रियांमुळे खोल पाण्यात जाणे किंवा जलचरांनी गिळणे, अशा शक्यता संशोधकांनी मांडल्या आहेत. यातील सर्वांत मोठा धोका ‘अदृश्य’ प्लॅस्टिकचा आहे. सूर्यप्रकाश, लाटा आणि घर्षणामुळे मोठ्या प्लॅस्टिकचे सूक्ष्म तुकडे होतात. त्याचा आकार जसजसा कमी होत जातो, तसतसा ते गिळू शकणाऱ्या जलचरांची व्याप्ती वाढते..Water Management Challenges: गाव ते नदी : जबाबदारी कोणाची?.मासे आणि इतर जीवांमार्फत हे कण अन्नसाखळीत प्रवेश करतात. प्लॅस्टिकसोबतच शोषली गेलेली रसायनेही जिवांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे नद्या आणि समुद्रातील प्लॅस्टिकचा प्रश्न हा आता केवळ स्वच्छता किंवा सौंदर्यदृष्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो जैवविविधता, मत्स्यव्यवसाय, अन्नसुरक्षा आणि मानवी आरोग्याशी जोडला जाऊन बहुआयामी बनला आहे..या संकटावर मात करण्यासाठी केवळ प्लॅस्टिकबंदीचे आदेश पुरेसे ठरणार नाहीत. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, उत्पादकांचे उत्तरदायित्व कठोरपणे निश्चित करणे, कचऱ्याचे स्रोताच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे व पुनर्प्रक्रिया वाढविणे आणि नदीसंवर्धन, नाले-नद्यांत प्लॅस्टिक पोहोचण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध घालण्याची व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे..त्याचबरोबर नद्या, शेती-माती, पिण्याचे पाणी आणि अन्नपदार्थांतील सूक्ष्म प्लॅस्टिकचे सातत्याने परीक्षण करत राहण्याची गरज आहे. भीमा-उल्हासमधील माशांनी आपल्याला स्पष्ट इशारा दिला आहे, की प्लॅस्टिक आपण फेकून देऊन तात्पुरते नजरेआड करू शकतो; पण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आज समुद्र, नदी आणि माशाच्या पोटात दिसणारे प्लॅस्टिक उद्या आपल्या ताटात येण्यापूर्वी त्याच्या उत्पादनापासून ते विल्हेवाटीपर्यंतची संपूर्ण व्यवस्था बदलणे हाच या संकटावर मात करण्याचा शाश्वत उपाय आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.