सुनील चावकेIndian Politics: भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभूत करून दिल्लीवर चाल करून जाण्याची महत्त्वाकांक्षा ममता बॅनर्जींनी बोलून दाखविली. पण कोलकात्यातून सोडलेल्या क्षेपणास्त्राची मारकक्षमता दिल्लीच्या आकाशात दाखल होण्यापूर्वी हवेतच विरून जाते, असा गेल्या दहा वर्षांचा अनुभव आहे..पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला विजयाची संधी आहे ती आसाममध्येच. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांतून १० टक्क्यांहून अधिक मतदारांची नावे वगळून तसेच निकाल लागेपर्यंत राज्यात अघोषित ‘राष्ट्रपती राजवट’ लावूनही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याचे दिसत नाही. अर्थात, भाजपला यंदा पश्चिम बंगालमध्ये प्रथमच शंभरीचा आकडा पार करण्याची संधी असेल. पण २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या ७७ जागांच्या दुप्पट यश मिळाले तरच हा शंभरीचा आकडा सार्थक ठरेल. अन्यथा, या निवडणुकीनंतर राष्ट्रीय राजकारणात मोदी सरकारचीच शंभरी भरावी म्हणून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जीं देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी आक्रमक होतील..State Assembly Elections: प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पणाला.‘‘यंदाचा विजय आपल्याला संपूर्ण देश हलविण्याची ताकद देईल’’, असे विधान करीत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून राष्ट्रीय राजकारणात बदलाची सुरुवात होऊ शकते, असे सूचित केले आहे. पश्चिम बंगालव्यतिरिक्त तमिळनाडू, केरळ, पंजाब ही राज्ये भाजपला आजवर जिंकता आलेली नाहीत. यंदाही तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता नाही आणि राज्यांच्या निकालांमध्येही देशाच्या राजकारणावर अनुकूल प्रतिकूल परिणाम घडविण्याची क्षमता नाही. आसाममध्ये काँग्रेसशी थेट लढत असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये तसे नाही. मतदारयाद्यांमधून घुसखोर, मृत आणि स्थलांतरित ठरवून ८५ लाख मतदारांची नावे कापली आहेत. हे भाजपच्या पथ्यावर पडावे म्हणून केले गेल्याचा आरोप होत आहे. तो खरा असो वा नसो, परंतु भाजपला प. बंगालमध्ये आसामप्रमाणे खात्री वाटत नाही..२०२१च्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात तृणमूल काँग्रेसला दोन कोटी ८७ लाख (४८ टक्के) मते मिळाली होती, तर भाजपला दोन कोटी २७ लाख (३८.१ टक्के). अंतर होते ६० लाख मतांचे किंवा ९.९ टक्क्यांचे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दोन कोटी ७६ लाख ७४ हजार (४६.२ टक्के) मते मिळविली तर भाजपने दोन कोटी ३४ लाख ३१ हजार (३९.१ टक्के). अंतर होते ४२.४ लाख किंवा ७.१ टक्क्यांचे. आता मतदारयाद्यांमधून सरळसरळ ८५ लाख (ममता बॅनर्जींच्या मते हा आकडा एक कोटी २० लाख इतका आहे) वगळल्यानंतर २०२१ आणि २०२४ च्या निवडणुकांच्या तुलनेत भाजपचे पारडे जड झाले असल्याचे बोलले जाते..Zilla Parishad President: धाराशिव ‘झेडपी’ अध्यक्ष, सभापती निवडीचा मार्ग मोकळा.केंद्रात बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पश्चिम बंगाल जिंकता आलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री या पदांमुळे मिळालेल्या अधिकारांचा शंभर टक्के वापर करूनही अमित शहांची रणनीती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिखरावर पोहोचलेली लोकप्रियता भाजपला बंगालचे युद्ध जिंकून देऊ शकलेली नाही. निवडणुकीत होणारी पीछेहाट भरून काढण्यासाठी मोदी सरकारने यंदाच्या निवडणुकीत नव्या डावपेचांचा अवलंब केला आहे..निवडणूक आयोगाने केवळ मतदारयाद्यांमधून तृणमूल काँग्रेसच्या समर्थक ‘घुसखोर’ मतदारांचीच नावे कापलेली नाहीत, तर निवडणुकीच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू होताच मुख्य निवडणूक आयुक्तांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, गृहसचिव आणि पोलिस महासंचालकांसह ५० हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या. राज्य पोलिसांना निष्प्रभ करण्यासाठी राज्यात लाखोंच्या संख्येने केंद्रीय सुरक्षा दले तैनात केली. त्यामुळे आपले सत्ताहीन झालेले सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यास असमर्थ ठरल्याचा युक्तिवाद ममता बॅनर्जी करीत आहेत..MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा.केंद्रीय सुरक्षा दलांचा वापर मतदारांना घाबरवण्यासाठी गाड्यांमधून पैसे आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केल्याप्रमाणे वगळलेल्या मतदारांचा आकडा एक कोटी २० लाखांच्या घरात असेल, राज्यात अघोषित राष्ट्रवादी राजवट लागू झाली असेल, तर पंधरा वर्षांच्या सत्ताविरोधी लाटेला सामोऱ्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करून भाजपही निवडणूक जिंकणार असे कागदावरचे तरी चित्र आहे..पण या विपरीत स्थितीतही पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या ‘आत्म्या’साठी लढण्याची जिद्द सोडलेली नाही. मोदी सरकार आज महिला, अल्पसंख्यांकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेत आहे, उद्या त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल. बंगालला संपवू इच्छिणारा भाजप सत्तेवर आल्यास बंगालच्या जनतेवर मांसाहाराच्या सवयी आणि भाषा बदलण्याचा दबाव आणला जाईल, असे म्हणत त्या बंगाली अस्मितेवर भर देत आहेत. २०२१च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजपचे अनेक कार्यकर्ते मारले गेले, शेकडो जखमी झाले आणि हजारोंना घरेदारे सोडावी लागली..Local Body Results: सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व.त्यामुळे कार्यकर्त्यांचा धीर खचला. भाजपने त्या निवडणुकीत ७७ जागा जिंकल्या. पण २०२६पर्यंत त्यातील १३ आमदार सोडून गेले. वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख असलेल्या पश्चिम बंगालशी समरस होण्याऐवजी राज्याबाहेरचा हिंदी पट्ट्यातील आणि राज्यातील संसाधनांवर ताण आणणारा परप्रांतीयांचा पक्ष ही प्रतिमा भाजपला पुसून टाकता आलेली नाही. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी मतदारयाद्यांतील तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांची नावे कापणे पुरेसे ठरेल काय, हा प्रश्न भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे..विरोधाची ‘स्पेस’ भाजपकडेकाँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे अस्तित्व संपल्यात जमा असल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील मते आपसूक भाजपच्या पारड्यात जमा झाली आहेत. त्यामुळे २०२१च्या निवडणुकीत भाजपने तीन जागांवर थेट ७७ जागांवर झेप घेतली. आता कदाचित भाजप शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ७९ वर्षांमध्ये काँग्रेसने तीस वर्षे, डाव्या आघाडीने विक्रमी ३४ वर्षे आणि तृणमूल काँग्रेसने गेली पंधरा वर्षे पश्चिम बंगालवर सत्ता गाजवली..एखाद्या पक्षाला दीर्घकाळ संधी देण्याची पश्चिम बंगालची ही परंपरा कदाचित यंदा तृणमूल काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून देशातील सर्व विरोधी पक्षांना एकजूटीचे प्रयत्न होतील. राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देण्यासाठी त्या दिल्लीचे राजकारण ढवळून काढण्याशिवाय राहणार नाहीत. पाच राज्यांतील निवडणुकांविषयी तेवढीच उत्सुकता आहे.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.