Impact of Funds Shortage: शेतकऱ्यांकडून शेततळ्यांसाठी आलेले सर्व अर्ज मंजूर करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता हे अर्ज मजूर करण्यात आले, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. खरे तर ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा अंदाज एप्रिल - २०२६ मध्येच वर्तविण्यात आला होता..काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी तर यापूर्वीच भारतात मॉन्सूनमध्ये कमी पाऊसमान असेल, त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागेल, असे सूचित केले होते. हे अंदाज लक्षात घेऊन तेव्हाच अधिकाधिक शेततळ्यांना मंजुरी देऊन काम सुरू केले असते, तर त्यातील काही शेततळ्यांमध्ये किमान एक-दोन संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन खरीप-रब्बीतील पिके वाचली असती. त्यामुळे आता दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सर्व अर्ज मंजूर करण्यात आले, असे म्हणणे म्हणजे कृषी विभागाचे ‘वरातीमागून घोडे’ असेच म्हणावे लागेल..Farm Pond Subsidy: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे सर्व अर्ज मंजूर, राज्यातील ८७ हजार १७४ शेतकऱ्यांची निवड.चालू वर्षासाठीच्या आधीच्या नियोजनाप्रमाणे केवळ एक हजारच्या आसपास शेतकऱ्यांची अनुदानासाठी निवड केली जाणार होती. परंतु प्रलंबित राहणारे तब्बल ८६ हजार अर्जांना मंजुरी दिल्यामुळे निधीची गंभीर समस्या उभी राहणार आहे. शेततळ्यांच्या मंजुरीनंतर वाढीव निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. ही मागणी कधी केली जाणार, त्यास शासनाची मंजुरी कधी मिळणार, मिळणार की नाही, निधीला मंजुरी मिळाली तर शेततळ्यांची कामे प्रत्यक्ष सुरू कधी होणार, हे सर्व गुलदस्तातच आहे. निधीविना शेततळे कोरडे राहू नये, हीच अपेक्षा!.राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’, ‘शेत तिथे शेततळे’ असा उद्घोष मागील एक-दीड दशकांपासून सुरू आहे. यासाठीच्या योजना पण आहेत. ‘शेत तिथे शेततळे’ झाल्यास राज्यातून दुष्काळ हद्दपार होण्यास उशीर लागणार नाही. परंतु शेत तिथे शेततळे झाले नाही, आणि आतापर्यंत मागेल त्यास शेततळे देखील मिळाले नाही..Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!.परिणाम आज सर्वांसमोर आहेत. अनेक शेतकरी शेततळ्यांसाठी अर्ज करतात. परंतु त्यातील फार कमी शेतकऱ्यांना मंजुरी मिळते. अर्ज करणे, मंजुरीची प्रक्रिया देखील वेळखाऊ आणि किचकट आहे. शेततळे अनुदान योजनांना जलद मंजुरी तसेच अनुदान वाटपाचे काम जलद व्हावे, त्यात पारदर्शकता असावी यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी आणले तर त्यातही अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना अजूनही करावा लागतो..शेततळ्यांना मंजुरी मिळाली शेतकऱ्यांनी काम सुरू करावे म्हटले तर निधीची अडचण येते. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. प्रत्यक्ष काम सुरू झाले, तर राज्यातील अनेक शेततळ्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण केले जात नाही. इनलेट-आउटलेटचे शेततळे जमिनीच्या उताराकडे खोलगट भागात व्हायला हवीत..पावसाळ्यात शेतातून वाहणारे पाणी अशा शेततळ्यांत अडावे, अडलेले पाणी भूगर्भात जिरावे, अशी याची संकल्पना आहे. परंतु बहुतांश शेतकरी शेततळ्यासाठी जागेची योग्य निवड करीत नाहीत. शेताच्या खराब भागात मग तो उंचावर असला, तरी त्या ठिकाणी शेततळे घेतात. अशा शेततळ्यात पाणीच येत नाही. त्यामुळे ते जमिनीत झिरपणे आणि त्यापासून संरक्षित सिंचन हे दोन्ही उद्देश साध्य होत नाहीत..आता राज्यात एकूण ८७ हजार शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहेच, तर ही सर्व शेततळी पुढील तीन-चार महिन्यांत तयार होतील, ही काळजी कृषी विभाग, राज्य शासनाने घ्यायला हवी. खोदलेले सर्व शेततळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावेत. या सर्व शेततळ्यांमध्ये पाणी साठून त्याचा कार्यक्षम वापर झाल्यास भविष्यात दुष्काळाच्या झळा कमी बसतील, यात शंका नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.