Drought Relief for Farmers: पावसात पडलेला खंड आणि उन्हाचा तीव्र चटका यामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेल्या राज्यभरातील तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी, शेतकरी संघटना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने अनेक ठिकाणी शेतातील पिके करपून गेली आहेत. .अशा शेतात शेतकऱ्यांनी जनावरे चरायला सोडली, तर काहींनी वाळलेल्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवला आहे. ऐन पावसाळ्यात जनावरांना खायला चारा नाही. दुष्काळी पट्ट्यातील नदी-नाले आताच आटले आहेत. मराठवाड्यासारख्या भागात छोटी धरणे असून ती भरलेली नाहीत. भूगर्भातही पाणी नसल्याने विहिरी, बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. खरीप हंगाम तर हातचा गेला, परंतु आगामी रब्बीही धोक्यात आहे..Agriculture Crisis : पिके करपली, चारा संपला.असे असताना राज्य सरकार मात्र दुष्काळाबाबत केवळ बोलघेवडेपणा करत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात स्थिती चिंताजनक आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमानिमित्त मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केली. गेल्या १२ वर्षांत त्यांनी किमान दहा वेळा याच घोषणेचा उच्चार केला; परंतु प्रत्यक्षात कृतीच्या नावाने मात्र शंख आहे..शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड येथे घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्याचे प्रत्यंतर आले. ही बैठक दुष्काळाविषयक गंभीर चर्चेऐवजी काजू-बदामसारख्या थिल्लर विषयामुळे गाजली. बैठकीनंतर कृषिमंत्र्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली. शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवत कृषिमंत्र्यांनी राज्य सरकार नियम-निकष बाजुला ठेवून भरीव मदत करेल, असे आश्वासन दिले खरे; परंतु हेक्टरी किती मदत करणार, या प्रश्नावर मात्र त्यांनी हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला..राज्यात पंचनामे न करता सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असली तरी केंद्र सरकारने २०१६ साली निश्चित केलेल्या दुष्काळ संहितेनुसार तसे करणे शक्य नाही. या संहितेनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यातील तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून दुष्काळ जाहीर केला जातो..Marathwada Drought: सोयाबीनसह खरीप पिके करपली, नेते शेतीच्या बांधावर, सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार?.अधिकृतरित्या मॉन्सूनचा कालावधी चार ऑक्टोबर रोजी संपत असल्याने पाच ऑक्टोबर नंतर पंचनामे करून प्रस्ताव केंद्राला पाठवावा लागेल. खरिपाचा दुष्काळ जाहीर करण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी आधीच पिके काढून टाकली असतील तर पाच ऑक्टोबरनंतर पाहणी-पंचनामे कसे करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पीकपेऱ्याच्या नोंदी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व संवेदनशील दृष्टिकोन ठेऊन वाळलेल्या पिकांबरोबर रिकाम्या शेतात खरिपात कोणते पीक होते, याची खात्री करायला हवी..दुष्काळी भागातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, ही काळजी घ्यायला हवी. औपचारिकरित्या दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार असला तरी त्या आधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यापासून राज्य सरकारला कोणी रोखलेले नाही. राज्याने आपल्या अखत्यारित तातडीने मदत जाहीर करायला हवी. धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतील स्थितीचे अहवाल तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठवले आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील अहवालही तातडीने मागवून त्या आधारे मदत जाहीर करणे शक्य आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.