Health Awareness: काही नफेखोर गूळ निर्मितीत निकृष्ट साखर, कृत्रिम रंगासह अनेक रसायनांचा वापर करीत असल्याने असा गूळ आरोग्यास घातक ठरतोय. अशा नफेखोरीने राज्यातील दर्जेदार गूळ निर्मितीस गालबोट लागत असून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे..भारतीय गुळाची गोडी जागतिक बाजारपेठेत वाढत असताना देशांतर्गत बाजारात मागील काही महिन्यांपासून गुळातील भेसळीचीच चर्चा अधिक आहे. कोल्हापूर, सांगलीच्या गुळाला देशभरातून मोठी मागणी असते. मात्र दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर बाजार समितीतून गुजरातला गेलेल्या गुळात कृत्रिम रंगाचा अतिवापर आढळून आल्याने तो चक्क नाकारला गेला. एवढेच नाही तर संबंधित व्यापाऱ्यावर तेथील ‘अन्न व औषध प्रशासन’ विभागाने (एफडीए) कारवाईचा बडगा देखील उगारला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी असा गूळ खरेदीस नकार दिला होता. कोल्हापूर बाजार समितीतील काही काळ ठप्प झालेले सौदे आता नियमित होत असतानाच सांगली, कोल्हापूर बाजार समितीतील गूळ बाजाराला एफडीएच्या कारवाईसह व्यापाऱ्यांच्या बहिष्काराची झळ बसली आहे. .Jaggery Rate: नीरा बाजार समितीत गुळाला ४५२५ रुपये दर.एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे झाल्यापासून त्यांनी राज्यात भेसळीविरोधात कारवाईची मोहीमच उघडली आहे. या कारवाईच्या धसक्याने दौंड परिसरातील काही परप्रांतीय गूळ उत्पादकांनी आपला गाशा गुंडाळ्याचे कळते. साखरेपेक्षा गूळ बरा, असे पूर्वापार आपण ऐकत आलो आहोत. त्याचे कारण साखर निर्मिती प्रक्रियेत ऊस रसावर विविध रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे रसातील बहुतांश सर्व जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय घटक नष्ट होतात. याउलट गूळ निर्मितीत पूर्वी कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे गुळात लोह, कॅल्शिअम, स्फुरद, पोटॅशिअम तसेच काही जीवनसत्त्वे टिकून राहत होते. आता मात्र काही परप्रांतीय नफेखोर गूळ निर्मितीत देखील निकृष्ट साखर, कृत्रिम रंगासह अनेक रसायनांचा वापर करीत असल्याने गूळही आरोग्यास घातकच ठरतोय. याचा फटका दर्जेदार गूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसत असल्याने अशा नफेखोरांवर कडक कारवाई झालीच पाहिजे..Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी.भारत हा गूळ उत्पादनात जगात आघाडीवरचा देश असून, जागतिक उत्पादनात देशाचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी सुमारे २० ते ३० टक्के ऊस गूळ निर्मितीसाठी वापरला जातो. गुळावर आधारीत मोठा प्रक्रिया उद्योग देशात उभा आहे. ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या रोजगाराला या उद्योगाचा आधार मिळत आहे. .महाराष्ट्राचा गूळ उत्पादनातील वाटा २४.१ टक्के असून, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे परिसरात गूळ उद्योगाचे मोठे जाळे आहे. पारंपरिक प्रक्रिया उद्योग म्हणून गुऱ्हाळांनी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचेच काम केले आहे. आता भेसळीमुळे गूळ निर्मिती उद्योगाला थोडेफार गालबोट लागले असले, तरी भेसळमुक्त, गुणवत्तापूर्ण गुळाला देश-विदेशातून चांगली मागणी आहे. त्यामुळे दर्जेदार गूळ उत्पादकांस देश-विदेशांत आपला गूळ पाठविण्याची चांगली संधी आहे. स्वच्छ, सुरक्षित, दर्जेदार गूळ निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. .त्यात गुळासाठी उसाच्या निवडीपासून ते गूळ साठवणुकीपर्यंत काय काळजी घ्यावी लागेल, हे सांगितले आहे. एवढेच नाही तर ‘एफएसएसएआय’ने काही मानक यासाठी घालून दिली आहेत. गुऱ्हाळ घरांसह गूळ कारखान्यांनी दर्जेदार निर्मिती तंत्रासह `एफएसएसएआय’च्या मानकांचे तंतोतंत पालन करायला हवे. ‘कोल्हापुरी गुळाचा ब्रँड टिकवायचा असेल, तर नैसर्गिक गुणवत्तेशी तडजोड नको,’ अशी भूमिका गूळ उत्पादक, त्यांचा संघ, व्यापारी, बाजार समिती अशा सर्वांनी घेऊन प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यायला हवी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.