‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष - २०२६’ हे धोरणात्मक सुधारणा, कायदेशीर बदल आणि लक्ष केंद्रित गुंतवणुकीसाठी एक ऐतिहासिक संधी आहे. शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये महिलांना नेतृत्वाच्या संधी, कृषी निर्णय प्रक्रियेत समान सहभाग आणि महिला-केंद्रित कृषी धोरणांची अंमलबजावणी ही या वर्षाची मुख्य अपेक्षा आहे. .संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेले आंतरराष्ट्रीय ‘महिला शेतकरी वर्ष २०२६’ हे कृषी क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाची जागतिक पातळीवर झालेली महत्त्वपूर्ण दखल आहे. जगभरातील कृषी व अन्नप्रणाली टिकवून ठेवण्यात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची असतानाही त्यांचे श्रम, ज्ञान आणि योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर हे वर्ष केवळ गौरव, सन्मान आणि औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता धोरणात्मक सुधारणा, कायदेशीर बदल आणि कृतिप्रधान उपक्रमांचे वर्ष ठरले पाहिजे.महिला शेतकऱ्यांचा निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविणे, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना नेतृत्वाच्या संधी देणे आणि महिला-केंद्रित कृषी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे आज अत्यावश्यक बनले आहे..Women Farmer: तिचा सर्वोच्च सन्मान.कृषी अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिकाभारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा विचार केला असता ‘शेतकरी’ हा केंद्रबिंदू असतो; मात्र या शेतकऱ्याच्या यशस्वी प्रवासामागे महिलांचे योगदान अनेकदा दुय्यम मानले जाते. प्रत्यक्षात महिला शेतकरी केवळ साहाय्यक भूमिका बजावत नाहीत, तर शेती उत्पादन, संसाधन व्यवस्थापन, प्रक्रिया, विपणन आणि कुटुंबाच्या अन्नसुरक्षेपर्यंत त्यांचा सहभाग निर्णायक असतो. त्यामुळे महिला शेतकरी हाच कृषी अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे, असे ठामपणे म्हणता येईल..पीक लागवड, रोपवाटिका व्यवस्थापन, तणनियंत्रण, कापणी, साठवणूक, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधुमक्षिका पालन तसेच अन्नप्रक्रिया व स्थानिक बाजारपेठेतील विक्री या सर्व टप्प्यांवर महिलांचे श्रम दिसून येतात.ग्रामीण भागातील शेतीची दैनंदिन कामे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या कष्टावरच अवलंबून आहेत. जागतिक स्तरावर कृषी व अन्नप्रणालीत कार्यरत महिलांचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे, तर भारतात अनेक राज्यांमध्ये हा वाटा याहून अधिक आहे..International Women Farmer Year: ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आशादायी.योगदान असूनही असमानताशेतीत महिलांचे इतके मोठे योगदान असूनही महिला शेतकऱ्यांना आजही अनेक संरचनात्मक अडचणींचा सामना करावा लागतो. जमीन मालकी हक्कांमध्ये असमानता, कर्ज व वित्तपुरवठ्याची मर्यादित उपलब्धता, आधुनिक तंत्रज्ञान व कृषी सल्ला सेवांचा अभाव, बाजारपेठेपर्यंत अपुरी पोहोच आणि निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग ही प्रमुख आव्हाने आहेत. बहुतांश महिला शेतकरी लहान व सीमांत क्षेत्रावर शेती करतात..संसाधनांवरील नियंत्रण नसल्यामुळे समान क्षेत्र असूनही त्यांच्या शेतीची उत्पादकता पुरुषांच्या तुलनेत कमी राहते. महिलांचे कृषी काम प्रामुख्याने असंघटित, अल्प मोबदल्याचे आणि श्रमप्रधान असते.शेतीसोबतच घरकाम, बालसंभाळ, वृद्धांची काळजी आणि सामाजिक जबाबदाऱ्या महिलांवरच येतात. या श्रमांचा कृषी अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असूनही त्याची आर्थिक मोजणी केली जात नाही. परिणामी, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि सामाजिक स्थान मर्यादित राहते..Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे.महिला शेतकऱ्यांवरील वाढता ताणहवामान बदलाचा सर्वाधिक आणि थेट फटका महिला शेतकऱ्यांना बसत असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येते. अनियमित व कमी-अधिक पर्जन्यमान, वारंवार येणारे दुष्काळ व पूर, तसेच वाढते तापमान यामुळे शेतीतील अनिश्चितता आणि जोखीम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बहुतांश महिला शेतकरी लहान व सीमांत क्षेत्रावर अवलंबून असल्याने हवामानातील कोणताही प्रतिकूल बदल त्यांच्या उपजीविकेवर तात्काळ परिणाम करतो..संशोधनातून असे आढळून आले आहे, की टोकाच्या हवामान परिस्थितींमध्ये महिलांच्या पीक उत्पादनाच्या मूल्यामध्ये तुलनेने अधिक घट होते. यामागे सिंचन, तंत्रज्ञान, विमा आणि आर्थिक संसाधनांपर्यंत मर्यादित पोहोच ही प्रमुख कारणे आहेत.हवामान बदलामुळे वाढणारे कामाचे ओझे, पाण्यासाठी वाढलेली धावपळ आणि घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण यामुळे महिलांचे आरोग्य व उत्पादकता दोन्ही प्रभावित होतात. महिला-प्रमुख कुटुंबांचे उत्पन्न पुरुष-प्रमुख कुटुंबांच्या तुलनेत अधिक प्रमाणात घटत असून त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या अन्नसुरक्षा, पोषण आणि सामाजिक स्थैर्यावर होत आहे..Women Farmers: साधने, अवजारांनी केले महिलांचे कष्ट हलके.सक्षमीकरणाशिवाय विकास नाहीया पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हे कृषी विकासाचे केंद्रबिंदू असणे अत्यावश्यक आहे. महिलांना समान जमीन हक्क, सुलभ व परवडणारे कर्ज, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी प्रशिक्षण, विस्तार सेवा आणि बाजारपेठेतील थेट संधी उपलब्ध करून दिल्यास शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न दोन्ही वाढू शकते. अभ्यासानुसार, शेतीतील लैंगिक असमानता कमी केल्यास अन्न उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन कोट्यवधी लोकांना अन्नसुरक्षा मिळू शकते..महिला शेतकरी वर्षसंयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने घोषित केलेले आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ (IYWF 2026) हे केवळ गौरवाचे वर्ष नसून धोरणात्मक सुधारणा, कायदेशीर बदल आणि लक्ष केंद्रित गुंतवणुकीसाठी एक ऐतिहासिक संधी आहे. शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये महिलांना नेतृत्वाच्या संधी, कृषी निर्णय प्रक्रियेत समान सहभाग आणि महिला-केंद्रित कृषी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी ही या वर्षाची मुख्य अपेक्षा आहे.हे वर्ष महिला शेतकऱ्यांची विविधता अधोरेखित करते. लहान व सीमांत शेतकरी, आदिवासी महिला, पशुपालक, मत्स्य व्यवसायातील महिला, अन्नप्रक्रिया व विपणन क्षेत्रातील महिला तसेच कृषी संशोधन व विज्ञान क्षेत्रातील महिला तज्ज्ञ - त्यांचे पारंपरिक ज्ञान, अनुभव आणि नेतृत्व शाश्वत अन्नप्रणालीसाठी अत्यावश्यक आहे..महिला शेतकरी सक्षम झाल्यास केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. अन्नसुरक्षा, पोषण, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा पाया अधिक मजबूत होईल. म्हणूनच ‘कृषी अर्थव्यवस्थेचा कणा : महिला शेतकरी’ हे विधान केवळ घोषवाक्य नसून सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक वास्तव आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे हे वास्तव ओळखून त्यानुसार ठोस धोरणे व कृती राबविण्याचे निर्णायक पर्व ठरावे, हीच काळाची गरज आहे.९९७५६७८१७५, (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.