केळी निर्यातीत फिलिपिन्सचा दबदबा आहे. परंतु फिलिपिन्सपेक्षा आपल्या देशातील केळीची गुणवत्ता चांगली असून, तिला जागतिक बाजारपेठेत पोहोचविणे आवश्यक आहे. ज्यात सध्या केळीची काढणी सुरू आहे. बहुतांश शेतकरी अधिक खर्च करून निर्यातक्षम केळी उत्पादन घेत असताना निर्यातीच्या केळीला मात्र १० ते ११ रुपये प्रति किलो असा कमी दर मिळतो. हा दर परवडत नसल्याने केळी उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी तर दोन ते तीन रुपये प्रति किलोने केळीचे शिवार सौदे सुरू आहेत. राज्यातील जळगाव, सोलापूर, अकोला, वसमत या प्रमुख केळी पट्ट्यांत बहुतांश उत्पादकांचा सध्या अत्यंत कठीण काळ सुरू आहे. .आपल्या शेजारील मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत तीन ते पाच रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने अनेक शेतकरी केळी पिकावर चक्क नांगर फिरवीत आहेत. पारंपरिक पिके आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत म्हणून केळीचा पर्याय शेतकरी निवडत असताना तोही आता अंगलट येताना दिसतो..Banana Export: केळी निर्यातीची गती मंदावली.महाराष्ट्रातच नाही तर देशात वाढलेले केळीचे क्षेत्र, त्यातून वाढलेले उत्पादन आणि त्याच वेळी बाजारातून घटलेली मागणी हे घाऊक बाजारातील दर पडण्यामागची कारणे सांगितली जात असली, तरी व्यापाऱ्यांचे लॉबिंग हे कमी दरामागचे मुख्य कारण आहे. उत्पादकांकडून दोन ते तीन रुपये प्रति किलोने घेतली जाणारी केळी किरकोळ बाजारात व्यापारी मात्र २५ ते ३० रुपये किलोने विकून उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही लुटत आहेत. आणि बाजार समिती प्रशासनाचे याकडे लक्ष देखील नाही..मागील महिनाभरापासून निर्यातीच्या केळीचा दरही २२०० रुपये प्रति क्विंटलवरून १२०० रुपयांवर म्हणजे जवळपास निम्म्यावर आला आहे. जागतिक व्यापार युद्ध, आखातातील तणाव, युरोपसह इतर राष्ट्रांना सागरी मार्गे केळी पाठविताना वाहतुकीत येत असलेल्या अडचणी यामुळे आपली निर्यातही सध्या मंदावली आहे. आपली केळीची निर्यात प्रामुख्याने आखाती देशांत होते, तर फार कमी केळी रशिया, युरोपमध्ये जाते..Banana Export: आखाती देशांत २५ कंटेनर केळी निर्यात.आपल्या केळीला पाकिस्तानमधून मागणी असायची. आपलीच केळी इराणमार्गे इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये जात होती. परंतु आता तणावपूर्ण वातावरणात आपली केळी पाकिस्तानात जात नाही, उलट इराण, इराकमध्ये पाकिस्तानची केळी पोहोतच आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये केळीचे उत्पादन वाढत असताना उत्पादन-विक्री-निर्यात याची योग्य अशी सांगड घालावी लागणार आहे. बाजार समित्या केळीचे दर जाहीर करीत असताना परिसरातील उत्पादकांना तोच दर मिळेल, याची किमान हमी बाजार समित्यांनी घ्यायला हवी..केळीची देशांतर्गत विक्री असो की निर्यात यांत आता वैयक्तिक शेतकरी, त्यांचे गट, समूह यांनी उतरण्याची गरज असून त्यासंबंधीच्या सर्व पायाभूत सुविधा शासनाने उभ्या करून द्यायला हव्यात. केळी निर्यातीसाठी क्लस्टरच्या घोषणा दशकभरापासून होत आहेत. जळगावमध्ये पणन मंडळाच्या पुढाकाराने याबाबत प्रयत्न झाले. परंतु पुढे रायपनिंग चेंबरसह पॅक हाउस हे खासगी संस्थांना देण्यात आल्याने त्याचा उत्पादकांना काहीही फायदा झाला नाही..आता केळीच्या निर्यातीत बहुतांश निर्यातदार, व्यापारी असून त्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढायला हवा. केळी निर्यातीत फिलिपिन्सचा दबदबा आहे. परंतु फिलिपिन्सपेक्षा आपल्या देशातील केळीची गुणवत्ता चांगली असून, तिला जागतिक बाजारपेठेत पोहोचविणे आवश्यक आहे. केळीसाठी स्वतंत्र व्यापारी दृष्टिकोन ठेवून यंत्रणा उभी करावी लागेल, जेणेकरून उत्पादकांकडून निर्यातीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा यातील जाणकार व्यक्त करीत आहेत. त्याकडे सरकार गांभीर्याने कधी पाहणार, हा खरा प्रश्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.