Global Wheat Production: वर्ष २०२६-२७ या हंगामात जागतिक गहू उत्पादनात सुमारे २.३ कोटी टनांची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या उत्पादन घटीने जागतिक पातळीवर गहू उपलब्धता आणि वापर जवळपास सारख्याच पातळीवर (८२.२ कोटी टन) येणार आहे. गव्हाचा अंतिम साठाही घटणार असल्याने जागतिक गहू बाजारावर दबाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गहू उत्पादन घटीची कारणे अनेक आहेत. यावर्षी एल निनोमुळे भारतासह इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया तसेच आफ्रिकेतील काही देशांमध्ये पाऊस कमी पडणार आहे. .तर उत्तर, दक्षिण अमेरिकेसह पूर्व आफ्रिकेतील काही देशांमध्ये पूर परिस्थिती असणार आहे. या दोन्ही परिस्थितीमध्ये संबंधित देश गव्हाऐवजी इतर पिकांना प्राधान्य देतील. भारतात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर २०२० मध्ये केंद्र सरकारने लाखो नागरिकांना मोफत गहू वाटपाची योजना राबवली..त्यामुळे सरकारी गोदामांमधील गव्हाचा साठा कमी झाला. नवीन हंगामातील गहू उत्पादनानंतर हा खड्डा भरून निघेल, असा सरकारचा कयास होता. परंतु त्यानंतर देशात सातत्याने उत्पादन घटत असून सरकारी गोदामांमधील गव्हाचा साठा अपेक्षेनुसार वाढला नाही..Global Wheat Production: जागतिक गहू उत्पादनात २.३ कोटी टनांची घट शक्य.मागील चार वर्षांपासून रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम देखील जागतिक गहू उत्पादन आणि उपलब्धतेवर झाला आहे. रशिया हा जगातील प्रमुख गहू उत्पादक देशांपैकी एक आहे. परंतु रशियामधील प्रतिकूल हवामानामुळे उत्पादक गव्हाकडे पाठ फिरवित आहेत. त्यातच युद्धामुळे निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत..रशिया, युक्रेन, युरोपियन युनियन आदी देश गहू निर्यातीत आघाडीवर असतात; मात्र युद्धामुळे सर्वच गणिते बदलली आहेत. युक्रेनमधून निर्यात ठप्प झाली तर रशियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाला. शिवाय इराण, इस्त्राईल-अमेरिकेतील संघर्षाचा फटकाही गव्हाला बसला आहे..नेमक्या याच काळात भारतात गव्हाचे उत्पादन वाढवून निर्यात वृद्धीची संधी होती. परंतु गहू उत्पादनात आघाडीवरचा भारत देश धोरणात्मक सातत्य नसल्यामुळे निर्यातीत आघाडीची संधी असूनही तिचे सोने करू शकला नाही. देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर थोडे वधारत असताना केंद्र सरकारने मे २०२२ मध्ये गहू निर्यातीवर बंदी लादली..Wheat MSP Procurement: देशात यंदा गव्हाची हमीभावाने विक्रमी खरेदी.एवढेच नव्हे तर ऑगस्ट २०२३ मध्ये गहू आयातीसाठी भारताने रशियापुढे हात पसरून तेथून गव्हाची आयात केली. मागील हंगामात देशात गव्हाचे उच्चांकी उत्पन्न झाले. त्यामुळे केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२६ मध्ये २५ लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे. गहू उत्पादन आणि निर्यातीच्या धोरणात सातत्य ठेवले तर देशातून निर्यात वाढून त्याचा फायदा उत्पादकांना होऊ शकतो..भारतात गव्हाची उत्पादकतावाढ जवळपास गोठली आहे. हरितक्रांतीत संकरित बियाण्यांच्या नवीन वाणांच्या जोरावर गव्हाची उत्पादकता वाढवता आली. त्यानंतर मात्र उत्पादकता वाढीसाठी उल्लेखनीय असे संशोधन देशात झाले नाही. यावर्षी पाऊसमान कमी आहे. अशा वेळी कमी पाऊसमान आणि एकंदरीतच बदलत्या ऋतुचक्रानुसार शेतकऱ्यांना तातडीने नवीन वाण उपलब्ध करून देण्याची गरज आहे..गव्हाची उत्पादकता पर्यायाने उत्पादन वाढले म्हणजे नवीन भू-राजकीय परिस्थितीत पारंपरिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झालेल्या असताना निर्यातीच्या नवनव्या संधी शोधायला हव्यात. हे करीत असताना महागाईचा बाऊ न करता अनाठायी आयात होणार नाही, हेही पाहावे लागेल. हजारो वर्षांपासून गहू हा मानवजातीचा सर्वात विश्वासार्ह अन्नस्रोत राहिला आहे..मात्र गेल्या दोन दशकांत गव्हाबद्दलच्या सार्वजनिक धारणा पूर्णपणे बदलल्या आहेत. एकेकाळी आरोग्यदायी आहाराचा मुख्य भाग मानला जाणारा गहू आता अनेकदा धोकादायक अन्न म्हणून सादर केला जातो. परंतु याबाबतचे अभ्यासाअंतीचे ठोस पुरावे नाहीत, हेही जगासमोर मांडावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.