Agriculture Challenges: फेब्रुवारी-मार्च खरड छाटणी, जून-ऑगस्ट गोडी छाटणी आणि ऑक्टोबर-जानेवारी द्राक्ष काढणी आणि विक्री-निर्यात हा प्रामुख्याने अर्ली द्राक्षाचा हंगाम आहे. यांत खरड छाटणी ते काढणी पर्यंत नियमितपेक्षा दोन ते अडीच महिने हंगाम आधी घेण्याचे कौशल्य राज्यातील प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांनी आत्मसात केले आहे. भर पावसाळ्यात अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये गोडी छाटणीनंतर काढणीपर्यंतचे व्यवस्थापन हे सोपे काम नव्हते..परंतु नाशिकसह पुणे आणि सांगलीतील अनेक जिगरबाज द्राक्ष उत्पादकांनी ते साध्य केले. ऐन हंगामात देशांतर्गत तसेच जागतिक बाजारात द्राक्षांची आवक वाढून भाव पडतात म्हणून अर्ली द्राक्ष घेऊन अधिक दर पदरात पाडून घेणे हा त्यामागचा उद्देश! याद्वारे जागतिक बाजारात नाताळासाठी म्हणून सर्वात प्रथम द्राक्ष ही आपल्या देशातून प्रामुख्याने नाशिकच्या कसमादे पट्ट्यातून जातात..Nashik Grapes Export: ‘अर्ली’ द्राक्षांची निर्यात ५० टक्क्यांनी कमी.शिवाय उत्तर भारतातून नवरात्रोत्सवासाठी देखील द्राक्षाला मागणी वाढलेली असताना, तो हंगामही साधायचा असतो. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून अतिवृष्टीसह लांबलेल्या पावसाळ्याचा मोठा फटका अर्ली द्राक्षांना बसत आहे. यावर्षी मे ते ऑक्टोबर अशा सहा महिने कालावधीच्या पावसाने अर्ली द्राक्षाचे गणितच बिघडवून टाकले आहे. अर्ली द्राक्षाचे उत्पादन घटले, दर्जाही घसरला. द्राक्षाचे खुडे महिनाभर लांबले. निर्यातीसही उशीर होऊन ती थेट ५० टक्क्यांवरच आली..नियमित हंगामाच्या तुलनेत अर्ली द्राक्षास देशांतर्गत बाजार असो की निर्यात साहजिकच दर अधिक मिळतो. यावर्षी द्राक्षाच्या रंग, दर्जानुसार १५० ते २१० रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. अर्ली द्राक्ष उत्पादनात जेवढ्या संधी आहेत, त्यापेक्षा अधिक आव्हाने देखील आहेत. भर पावसाळ्यात उत्पादन घ्यायचे असल्याने कीडनाशकांच्या फवारण्या अधिक कराव्या लागतात. त्यामुळे कीडनाशके अंश निर्यात मर्यादेपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अनेकदा असते. अर्ली द्राक्ष अनेकदा आंबट चवीची निपजतात..Grape Farming Loss: जुन्नर तालुक्यात ४०० एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड.अशी द्राक्षे देशांतर्गत बाजारात विकायचे म्हटले तर ऑक्टोबर ते डिसेंबर अशा थंडीच्या काळात कोणी खाणे पसंत करीत नाही. त्यामुळे दर कमी मिळू शकतो. अर्ली द्राक्ष व्यवस्थापनाचा मुळातच खर्च अधिक असतो. अशा वेळी दर कमी मिळाला की उत्पादकांचे मोठे नुकसान होते. यावर्षी प्रतिकूल हवामानाने उत्पादन आणि निर्यातही घटल्याने दर उच्चाकी मिळत असला तरी त्यातून दोन पैसे उरतील, या अर्ली द्राक्ष उत्पादकांच्या आशेलाच तडे गेले आहेत..उत्पादक प्रयोगशीलता आणि जिद्दीने अर्ली द्राक्ष उत्पादन घेत असले तरी सरकारचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. अर्ली द्राक्ष उत्पादकांना जगभरातून शोधून गोड चवीच्या जाती उपलब्ध करून द्याव्या लागतील. सध्या निर्यातक्षम द्राक्षासाठी ग्लोबल गॅपनुसार मार्गदर्शन होत असले तरी अर्ली द्राक्ष उत्पादकांना कमी खर्चात अवशेषमुक्त उत्पादनांचे अतिरिक्त धडे संशोधन संस्थांनी द्यायला हवेत..यावर्षी प्रतिकूल हवामानातही ज्यांचे ‘क्रॉप कव्हर’ आहे, अशा शेतकऱ्यांच्या बागा वाचून त्यांना चांगले उत्पादन देखील मिळाले आहे. क्रॉप कव्हरसाठी अनुदान असले तरी ते मिळण्यात अनेक अडचणी असून त्या दूर करायला हव्यात. अर्ली द्राक्ष निर्यातीतून परकीय चलन मिळत असल्याने काढणीनंतर साठवणूक शीतकरणासह निर्यातीपर्यंतच्या सर्व सोयीसुविधा उत्पादकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात. एवढेच नव्हे तर अर्ली द्राक्षांसाठीच्या जगभरातील बाजारपेठा कोणत्या याचा शोध घेऊन तिथे आपली द्राक्ष पोहोचतील, ही काळजी देखील घ्यावी लागेल. असे झाले तरच अर्ली द्राक्ष उत्पादकांना गोड ठरतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.