स्थलांतर हे तात्पुरते की कायमचे, यावरूनही भाषिक बदलाच्या ठशांचा माग काढता येतो. पण हे नक्की, की स्थलांतरामुळे मूळ भाषेला/बोलीला धक्का लागतो. सध्या सुरू असलेल्या भाषा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर एकंदर मराठी बोलीभाषेमधील घडणाऱ्या स्थित्यंतराचा नेमका वेध घेणारा हा लेख....व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांच्यातील स्थलांतराची प्रकिया ही कालानुकाल चालत आलेली पाहायला मिळते. माणसं गावं सोडतात. शहरं सोडतात. एका मुलखातून दुसऱ्या मुलखात जातात. या देशातून त्या देशात जातात आणि नव्या भूमीवर स्थिर होतात. शिवाय, हे सतत घडत राहते. यातून एकप्रकारे नव्या भाषेचे, नव्या बोलीचे अवगतीकरण होत राहते. हे घडणं नकळत, लीलया, सहज होते. हे घडण्याला जसा नवा मुलूख कारणीभूत ठरतो, त्यासोबतच लोकसान्निध्यता आणि लोकभाषा यापण कारणीभूत ठरतात. यातून अर्थातच या स्थलांतर निष्ठतेचा बोलीभाषांवर मोठा परिणाम होतो..Indian Language: भाषा मरता देशही मरतो....बोलभाषा धनवस्तुतः स्थलांतर हे बहुपेडी असते. ते कुठल्या एका कारणानं होत नाही. जसे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, आपत्ती, जगण्याचे बदलते रूप, दहशत, नव्या संधी, पोटापाण्याचे प्रश्न, आजारपण, रोगराई आणि नैसर्गिक अरिष्टे अशा कितीतरी कारणांनी स्थलांतर हे घडत राहते. याचे ठसे बोलीवर, भाषेवर होत राहतात. व्यक्ती, व्यक्तिसमूह यांच्यात हे स्थलांतर होते. खूपदा बलाढ्य अशा धरणांसारख्या प्रकल्पामुळे तर गावेच्या गावे उठतात. लोकांची चक्क भूमी बदलते. यातून भाषिक, सामाजिक सांस्कृतिक मोठी उलथापालथ होते. मग यातून, पोटात आणि ओठांत असलेली भाषाही बदलतेच..कारण माणूस भाषाशरण असतो. तो एक भाषा सोडतो आणि दुसरी भाषा धरतो. आता हेच पाहा ना, नोकरीच्या निमित्तानं गावे सोडलेली (स्थलांतरित) माणसे वाचून, लिहून गावबोली सोडतात आणि प्रमाण म्हणवल्या गेलेल्या भाषेला कायम जोडून राहतात. यात जसे शिक्षण कारण ठरले, तसेच स्थलांतरही कारण ठरले आहे. यातून घडते असे, की आपले मूळ बोलीभाषा धन गमावले जाती आणि नवे भाषाधन अवगत केले जाते. डॉ. गणेश देवी म्हणतात त्याप्रमाणे, खरे तर हा एकप्रकारे शब्दसंहाराचा (फोनोसाइड) दुखरा आणि हळवा भाग म्हणायला हवा. कारण यात बोलीचा मूळ ऐवज गमावणे हे आहेच..Zadiboli Language: गोड लहेजा झाडीपट्टीबोलीचा....यात अजून एक गंमत आहे आणि ती म्हणजे विविध कारणांनी घडलेल्या स्थलांतरातून नव मिश्रभाषा तयार होत जाते. खरे तर यामुळेच बोलीची ढब आणि चवही बदलते. हेलात बदल होतो. शब्दकाठिण्य किंवा लवचिकता यातले भेद सहज कळतात. ही एका अर्थाने स्थलांतराची देणच! तसेच वय आणि लिंग यातूनही बदलत गेलेल्या बोलभाषेची नवी रीत व प्रत समजून घेता येते. उदा. लहान मुले एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झाली, की त्यांचे मैत्र जिवांचे व्हायला वेळ लागत नाही. त्यांच्यात खेळांतून सोबत चटकन वाढते. मग ते भाषेसोबत खेळतात. नवी भाषा पटकन पकडतात. स्थलांतरातून लहानांकरवी उमटणारा हा भाषक ठसा मोठा रोचक, मोठा रंजक म्हणावा असा!.बोली किंवा भाषा यांच्यातील बदलाच्या दृष्टीने स्थलांतराच्या कालगतीलाही महत्व आहेच. स्थलांतर हे तात्पुरते की कायमचे, यावरूनही भाषिक बदलाच्या ठशांचा माग काढता येतो. पण हे नक्की, की स्थलांतरामुळे मूळ भाषेला/बोलीला धक्का लागतो. माणसं निकड म्हणून प्रमाण भाषेजवळ जातात आणि भाषिकदृष्ट्या प्रमाण होतात, हे खरे असले, तरी यामुळे त्यांची म्हणून असलेली जी जिभेवरची भाषा आहे, तिला मात्र झळ तर अवश्य पोहोचतेच. याशिवाय, आपल्या प्रतिष्ठा आड येतात. शुद्ध बोलावे असे काही आपले सामाजिक, नागरी धोके असतात. .Hindi Language Imposition: हिंदी भाषेच्या सक्तीवरुन मनसे आक्रमक; हिंदी पुस्तकांची होळी करत सरकारला इशारा!.यातूनही मूळ, रसाळ, लयदार, गोड अशा बोलीमधील मूळ रूपे हरवली जातात. स्थलांतरामध्ये जसा काळाचा अवकाश महत्त्वाचा असतो, तसेच व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांचे जिथे स्थलांतर झाले आहे त्या स्थलांतरस्थळी लोक एकमेकांच्या सान्निध्यात किती आले, हे पण लक्षात घेणे आवश्यक ठरते. कारण सान्निध्य परिणामही महत्त्वाचा असतो. यातून भाषिक बदलाचे नेमके मापन करता येणे शक्य होते. तसेच बदलत्या शब्दावलीचं नीट असे सांख्यिक स्वरूप स्पष्ट करता येऊ शकते. ‘‘एखाद्या समाजाची भाषा निर्माण होण्यासाठी शतकानुशतके लागतात.’’ अशा ठोस अभ्यासातून डॉ. गणेश देवी यांनी जो आधार काढला आहे तो खूपच मूल्यगर्भ आहे..भाषेतील धर-सोडशिवारामधून जसे रब्बी अथवा खरीप हंगाम काढले जातात, तशी भाषा मात्र उत्पादित करता येणारी नसते. आणि हेही सत्य, की भाषेत सतत आवक-जावक होते. पण ती निर्माण व्हायला शतके लागतात हेही खरेच! त्यासाठी स्थलांतराची एक कसोटी पुष्कळ ठळक आहे, की ज्यामुळे लोक भाषेत नवे काय काय आणून सोडतात आणि आपले जुने काय काय सोडून देतात. भाषेमध्ये सतत चालणारी ही ‘धर-सोड’ अगदीच मजेशीर आहे. माणसाला मातृभाषेतून तुटायला वेळ लागतो हे किती जरी खरे असले, तरी पण एकंदर समाजातील माणसे भाषिकदृष्ट्या आपल्या म्हटल्या जाणाऱ्या भाषेपासून तुटतात हेही खोटे नाही. .आता शेवटचा मुद्दा प्रतिपादित करतो आणि तो असा, की करुणेने भरलेली, दुःखावेग प्रकट करणारी, विव्हळजन्य भाषा ही पुष्कळ खोल, अर्थात अधिक जड असते. ती जिभेवरून लीलया हटत नाही. ती मनातूनही सहजी लोप पावत नाही. एकप्रकारे हे भाषिक टिकाऊपण लक्षात घेण्यासारखेच आहे. याउलट उल्हास, आनंद किंवा हर्षोत्पन्नशील भाषा ही आपल्यापर्यंत चटकन पोहोचणारी आणि झटकन विसरायला होणारी अशी भाषा असते. स्थलांतरातूनही हा पडताळा समजून घेता यावा, इतका लक्षणीय आहे. गतकालीन सोडलेला मुलूख, माणसे, आठवणी या स्मृतिपटलावर भाषेलापण जुळून असतात. भाषेस त्या मनात आंदोळत राहतातच. स्थलांतराचा हा ठसा, ठसाच असतो पण तो अमीट म्हणावा असा.९४२२७२१६३१(लेखक ज्येष्ठ बोली-भाषा अभ्यासक असून, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.