Forest fire prevention methods India: राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसवर गेला आहे. उष्णतेचे चटके असह्य होत असतानाच काही ठिकाणी वणव्याची धगही अस्वस्थ करून सोडत आहे.फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्याच्या काळात जंगल परिसरातील गवत वाळलेले असते. वृक्षांची पानगळ होऊन पानेही वाळलेली असतात. ही परिस्थिती वणवे लागण्यास पोषक असते. वणवे नैसर्गिक आणि मानवनिर्मितदेखील असतात. दुर्दैवी बाब म्हणजे ९५ टक्के वणवे हे मानवनिर्मित असतात..वणवे लागू नयेत तसेच वणवे लागल्यानंतर ते विझविण्यासाठीच्या अशा दोन्ही प्रयत्नांत वन विभाग कुचराई करीत असल्याचे बहुतांश ठिकाणी निदर्शनास येते. नाशिक जिल्ह्यातील राजधेर डोंगराला नुकताच भीषण वणवा लागला.याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिल्यानंतर एकतर त्यांची यंत्रणा वेळेवर सक्रिय झाली नाही, शिवाय आग विझविण्यासाठीची कोणतीही आधुनिक यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. परिणामी, या वणव्यात वनसंपदेबरोबर एकंदरीतच परिसरातील जीवसृष्टीचे मोठे नुकसान झाले..Forest Fire Prevention: वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कायद्यात दुरुस्ती.केंद्र सरकारच्या भारतीय वन सर्व्हेक्षण संस्थेच्या अहवालानुसार वर्षे २००१ ते २०२२ या २१ वर्षांत सातत्याने लागणाऱ्या वणव्यांमुळे ३.५९ लाख हेक्टर वन-आच्छादन नष्ट झाले. वणव्यात चराऊ कुरणे, जंगलातील साग, साल, खैर, बांबू आदी मौल्यवान वटवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होत आहेत..वन्य जीव, पशुपक्षीही वणव्यातून आपले प्राण वाचवू शकत नाहीत. एवढेच नव्हे, डोंगर उतारावर केली जाणारी शेती, जंगलालगतच्या जमिनीला वणव्याच्या झळा बसतात. शेतातील पिके, फळझाडे, गोठ्यातील जनावरे वणव्याच्या आगीत होरपळतात.त्यामुळे वनांच्या बरोबरीने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच! वणव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतच्या पिके आणि वनस्पतींना बसत असल्याचेही एक अभ्यास सांगतो. .Forest Fire Damage: राजधेर डोंगरावरील वणव्यात वनसंपदा खाक.वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. सातत्याने आगी लागल्यास वनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते..पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळविली जाऊ शकते.वन परिसरात लागलेली आग सर्वदूर पसरू नये म्हणून दरवर्षी जाळ-पट्टे घेण्याची प्रक्रिया गंभीरपणे राबवायला हवी. वणव्याची माहिती मिळताच तत्काळ ते विझविण्याचे प्रयत्न झाल्यास त्यात होणारी मोठी हानी टाळली जाऊ शकते..वणव्याविषयी गाव-परिसरात निरंतर लोकजागृती प्रक्रिया राबवायला हवी. गावपातळीवर वन विषयक विविध समित्या आहेत. पण कोणी नक्की काय काम करायचे, याविषयी समिती-सदस्य अनभिज्ञ आहेत.त्यांना कार्यरत करणे आवश्यक आहे. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणात वणवा विषय प्राधान्याने घेणे देखील आता गरजेचे झाले आहे. वणवा प्रतिबंध करण्यासाठी शासनाची कुठलीही योजना नाही..त्यामुळे वणवा प्रतिबंधक उपाययोजनांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात यावा, अशीही वन परिसरातील लोकांची मागणी असून त्यावरही विचार व्हायला हवा. दुर्गम भागात आदिवासी बांधव वन संरक्षण करीत त्यातील वनोपजावर आपली उपजीविका भागवत आले आहेत.त्यांनी वणवे पेटवून अथवा निसर्गाला ओरबाडून मध, डिंक असो की इतर वनोपज कधीच गोळा केला नाही. परंतु काही माफिया आता वन परिसरात सक्रिय झाल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईनेच वणवे लावण्यासह त्यांच्या वनांतील इतर अवैध कारवायांना आळा बसेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.