Gokul Milk Union news Maharashtra: लोकशाहीची देशभर सर्वत्र थट्टा चालू असताना तोच कित्ता ‘गोकुळ’मध्ये गिरविताना सत्ताधाऱ्यांना काहीही गैर वाटत नाही. बहुमत मिळो अथवा न मिळो, परंतु काहीही करून सत्ता आपल्याच हाती राहिली पाहिजे, अशी भाजपप्रणित महायुतीची अघोरी इच्छा ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेतून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे..खरे तर गोकुळ दूध संघात सतेज (बंटी) पाटील यांना मिळालेले यश सत्ताधाऱ्यांच्या पचनीच पडताना दिसत नाही. काँग्रेसच्या या नेत्याने महायुतीतील प्रस्थापित दिग्गजांना गोकुळमध्ये चांगला धोबीपछाड दिला. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याने एकट्या बंटी पाटलांच्या ताब्यात गोकुळ दूध संघ काहीही करून जाऊ द्यायचा नाही, यासाठीचा चंग महायुतीने बांधला आहे. त्यात गोकुळमध्ये निवडणुकीचा कौल १३-१२ असा लागला..Gokul Milk Union Election: ‘गोकुळ’मध्ये महायुतीची घुसखोरी; चार शासकीय संचालकांना मिळणार मतदानाचा अधिकार.बंटी पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ उमेदवार निवडून आले. सर्वसाधारणपणे मतदानाचा कौल आणि बहुमतही बघितले गेले असते, तर अध्यक्ष हा बंटी पाटील गटाचा होणे अपेक्षित होते. परंतु यात तांत्रिक अडचण आणून प्रसंगी रातोरात कायद्यात बदल करून आपल्याच गटाचा अध्यक्ष करण्याचा घाट सत्ताधारी महायुतीने घातला आहे. आणि सरकार नियुक्त (स्वीकृत) चार तज्ज्ञ संचालकांच्या मदतीने ते यात फत्ते होतील, असेच चित्र आहे. ही लोकशाहीची एकप्रकारे थट्टाच असून आपण गप्प बसणार नाही, याविरोधात आवाज उठविणार, अशी भूमिका बंटी पाटील यांनी घेतली आहे. निवडणुकीत होत असलेल्या मतचोरीने देशातील वातावरण आधीच तापलेले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्यात गोकुळमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले तर जनतेमध्ये असंतोषाचा भडका उडू शकतो..Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान.सहकारी संस्थांसह ठराव घेऊन मतदान होत असलेल्या इतरही सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या पक्षाचे पॅनेल आले, तर अशा सर्व ठिकाणी सरकारच्या हस्तक्षेपाने संचालक मंडळाला डावलून निकाल पालटला जाऊ शकतो. असे होत राहिले तर लोकशाही आणि सहकारी तत्त्वाला देशात अर्थच उरणार नाही. मुळात ठरावाच्या राजकारणात ज्यांच्याकडे पैसा आहे, यंत्रणा आहे तेच विविध संस्थांचा कब्जा मिळवत असतात, हा इतिहास आहे. भाजपप्रणित महायुतीदेखील याच मार्गाने सत्तेवर आपली मांड पक्की करू पाहत आहे..केंद्रात-राज्यात भाजपप्रणित महायुती सत्तेत असली, तरी अनेक सहकारी संस्था अजूनही त्यांच्या ताब्यात नाहीत, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, ही त्यांची खुमखुमी आहे. त्यांना राज्यातील दूध संघ, जिल्हा बँका, बाजार समित्या आदी सहकारी संस्थांत आपली पकड मजबूत करायची आहे. गुजरातमधील ‘अमूल’वर अशाच प्रकारे भाजपने काँग्रेसला बाजूला करून आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात आता गोकुळच्या माध्यमातून त्यांना करायची आहे. राज्यात अलीकडे ज्या मेडिकल असोसिएशनच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपला समर्थन न देणारा पॅनेल निवडून आला तेव्हाही ती निवडणूक रद्द करून तिथे प्रशासक लावण्यापर्यंत सरकारची मजल गेली आहे. अर्थात, लोकशाहीची सर्वत्र थट्टा चालू असताना तोच कित्ता गोकुळमध्ये गिरविताना त्यांना काहीही गैर वाटत नाही..राज्यातील सहकारमधील गोकुळ हा मोठा ब्रॅंड आहे. हा सुमारे साडेपाच लाख दूध उत्पादकांचा संघ आहे. साडेसात हजारांहून अधिक ग्रामीण दूध संस्था गोकुळशी जोडलेल्या आहेत. गोकुळची उलाढाल चार हजार कोटींच्या जवळपास आहे. अशा वेळी राज्यात अमूलच्या वाढीतील मुख्य अडसर गोकुळ ठरत असताना तिथे सत्ता प्रस्थापित करून अमूलला रान मोकळे करून देण्याचा हा डाव नाही ना, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.