West Asia Conflict Impact: पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इंधन (फ्युएल), खते (फर्टिलायजर्स) आणि परकीय चलन (फॉरेक्स) या इंग्रजी ‘एफ’ अक्षरपासून सुरू होणारी तीन आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. या तीन आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगतानाच देशाची अर्थव्यवस्था आजही भक्कम स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी परकीय चलनाच्या बचतीचे आणि काटकसर करण्याचे केलेले आवाहन योग्यच होते, अशी भलामण त्यांनी केली. पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका करणाऱ्यांचा त्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. अर्थव्यवस्थेपुढची ही तीन आव्हाने प्रामुख्याने बाह्य घटकांमुळे निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे हे सरकारचे अपयश असल्याचे साफ नाकारले आहे. थोडक्यात, पाणी अगदी गळ्यापर्यंत आल्याचे अर्थमंत्री मान्य करत आहेत पण त्याला आपले सरकार जबाबदार नाही, असे सांगत त्यांनी हात वर केले आहेत..युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सगळ्यात मोठी झळ शेतकरी वर्गाला बसत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी चौथ्यांदा इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे एकूण दरवाढ जवळपास प्रति लिटर साडेसात रुपयांवर पोहोचली आहे. डिझेलचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण भागात गंभीर संकट ओढवले आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी डिझेलची आवश्यकता आहे. पण डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. .बऱ्याच ठिकाणी लोक डिझेलसाठी हातघाईवर येऊन अप्रिय प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांची गोची झाली. ट्रॅक्टरसारखी वाहने घेऊन तासनतास रांगेत उभे राहणे अव्यवहार्य आहे. अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून कॅनमध्ये डिझेल देण्यास मुभा देण्याची सूचना करावी लागली. दुसऱ्या बाजूला खतांची विशेषतः युरियाची टंचाई भासत आहे. शेतकरी पहाटेपासूनच खतांसाठी रांगा लावत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट सारख्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात खतांचे वाटप करावे लागत आहे. .राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट असताना शेतकऱ्यांना भर दुपारी खतांसाठी रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे. शिवाय खत पाहिजे असेल तर इतर निविष्ठांची खरेदी करण्याची लिंकिंग सक्ती सहन करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात खते मिळत नसल्याची कबुली देत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे..राज्य सरकार असो की केंद्र सरकार; सुरुवातीला ते टंचाईचे वास्तव मान्यच करायला तयार नव्हते. खत, इंधनाची पुरेशी उपलब्धता असून, साठेबाजीमुळे सध्याचा प्रश्न उद्भवला असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक सरकारने याआधीच वस्तुस्थिती पारदर्शकपणे जनतेसमोर ठेवून संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट बऱ्याच प्रमाणात टाळता आली असती. पण तसे झाले नाही. .विशेषतः ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत बेदखल करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी नमूद केलेल्या तीन आव्हानांचा सामना भारतीय अर्थव्यवस्थेला करावाच लागत आहे. उशिरा का होईना त्यांनी याची कबुली दिली. पण या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी आगामी काळात धोरणात्मक व्यूहरचना आणि अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना काय असतील यावर त्यांनी भाष्य करणे आवश्यक आहे. अन्यथा ते अरण्यरुदन ठरेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.