Chemical Pesticide Management System: देशात कीडनाशक बाजारपेठेत कसा गोरख धंदा चालतो याचा प्रत्यय आठवडाभरापूर्वीच आला होता. सायक्लोसिनॉन या नोंदणी नसलेल्या तणनाशकाची देशात राजरोसपणे ऑनलाइन विक्री सुरू होती. याची तक्रार केल्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (सीसीपीए) संबंधित कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला. या बातमीचा देशातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला विसर पडतो न पडतो, तोच कीडनाशक बाजारपेठेत बनावट आणि बेकायदा उत्पादन आणि विक्रीचा वाटा तब्बल २५ टक्के असल्याचे केपीएमजी इंडिया आणि फिक्की कॅस्केड यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आले आहे. .नोंदणीकृत रासायनिक कीडनाशकांच्या देशातील ४५ हजार कोटींच्या बाजारपेठेत सुमारे ११ हजार कोटींची उलाढाल बनावट मालाची आहे. या देशातील शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १७ टक्के आहे. मुळात प्रगत पीक वाण, बियाणे, तसेच लागवड तंत्राच्या अभावाने आपली बहुतांश पीक उत्पादकता जगाच्या सरासरीच्या तुलनेत खूपच कमी आहे..Fake Pesticide: ऑनलाईन बनावट कीडनाशक विक्री रोखण्यासाठी कडक नियम हवेत, 'क्रॉपलाईफ'ची मागणी.त्यातच बनावट कीडनाशकांनी पीक उत्पादन तीन ते चार टक्क्यांनी घटत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. प्रश्न केवळ रासायनिक कीडनाशकांचाच नाहीतर जैविक कीडनाशकांची परिस्थिती तर त्याहूनही वाईट आहे. देशात नोंदणीकृत जैविक कीडनाशकांची बाजारपेठ एक हजार कोटींची आहे तर नोंदणी नसलेल्या बेकायदा जैविक कीडनाशकांची उलाढाल त्याहून आठ पटीने अधिक म्हणजे आठ हजार कोटींची आहे..सात-आठ वर्षांपूर्वी बनावट, भेसळयुक्त कीडनाशकांनी महाराष्ट्रात पन्नासहून अधिक शेतकरी-शेतमजुरांचा जीव घेतला होता. त्या वेळी देशपातळीवर नोंदणी नसलेल्या, बनावट भेसळयुक्त कीडनाशकांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशा कीडनाशकांच्या निर्मिती, नोंदणी, विक्री, वापर यावर नियंत्रण आणले जाईल, त्याविरोधात ठोस कायदे केले जातील, असे दावे शासन - प्रशासनाकडून करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे सर्व दावे वारंवार फोल ठरताना दिसतात..Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर.कारण त्यानंतर २०२१-२१ मध्ये कीडनाशकांची विषबाधा झाल्याची नोंद इतर आठ राज्यांमध्ये झाली होती. या आठ राज्यांपैकी तीन राज्यांत १६१ लोकांचा कीडनाशकांच्या विषबाधेने मृत्यू झाला होता. या वेळी बनावट कीडनाशके व अन्य रसायनाच्या अतिवापराने मृत्यू थांबविण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला संबंधित संस्थांकडून खुलाशाची मागणी करीत, हे प्रकार तत्काळ थांबविण्याबाबत निर्देश दिले होते..त्यानंतरही अनोंदणीकृत, बेकायदा कीडनाशकांची निर्मिती, विक्री, वापर देशात वाढतच आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशात यावर कोणतेही ठोस कायदेशीर नियंत्रण नाही, याबाबतचे जे काही कायदे आहेत ते पुरत नाहीत, त्यात अनेक पळवटादेखील आहेत. खरे तर आता वेळ आली आहे की देशातील रासायनिक कीडनाशके व्यवस्थापन प्रणालीत तत्काळ आमूलाग्र बदल करून ती लगेच लागू करण्याची! मानवी तसेच पशू-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक औषधांची रीतसर नोंद होते..त्यांचा मागणी तसेच गरजेनुसार देशभर पुरवठाही केला जातो. रुग्णांना मेडिकल स्टोअर्स मालकाच्या मनाने नाही तर डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’नुसार अर्थात औषधपत्रानुसार मेडिकल स्टोअर्समधून औषधी दिली जातात. ही औषधी डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या मात्रेनुसारच आपण घेतो. मानवी आरोग्यासाठीच्या सर्व औषधांचे ‘लेबल क्लेम’ आहे. त्याशिवाय औषधी विक्रीला परवानगीच मिळत नाही. अशी परिपूर्ण आणि सक्षम यंत्रणा कीडनाशकांबाबतही देशात हवी. त्याशिवाय देशात बनावट, बेकायदा कीडनाशकांची निर्मिती, विक्री, वापर थांबणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.