Financial Aid For Farmers: खरे तर सप्टेंबर-ऑक्टोबर हे खरीप सुगीचे अन् सणवारांचे महिने आहेत. खरिपातील पिके हाती आलेली असतात. त्यातून सणवारांचा आनंद द्विगुणित होतो. परंतु या वर्षी शेतशिवारात पावसाने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या वर्षीची ही काही पहिलीच आपत्ती नाही. जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर या तिन्ही पावसाळी महिन्यांत अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. .अनेक ठिकाणी काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात आहे. कापसाची बोंडे शेतात साठलेल्या पाण्यात सडत आहेत. नदी-नाले परिसरात पिकांबरोबर शेतातील माती, पशू-पक्षी याबरोबर ट्रॅक्टर, कडबा कुट्टी, सोलर पंप, खते-धान्यांची पोते, सूक्ष्म सिंचन संच आदी साहित्य वाहून गेले आहे. काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकड्यांत अंदाज बांधणे कठीण आहे..राज्यभरात अतिवृष्टी झाली असली, तरी मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर या भागांना तडाखा अधिक बसला आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १३५ लाख हेक्टरवर पेरा होतो. त्यातील २६ लाख हेक्टर (२० टक्के) क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबर राज्याचीही ही मोठी हानी आहे..Ativrushti Madat : जून ते ऑगस्टच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी रुपये मंजूर.मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी मदत निधीची घोषणा केली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मदतीची ग्वाही दिली आहे. परंतु या सर्व घोषणा औपचारिक असतात. नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना आलेला अनुभव वेगळाच आहे..नुकसानग्रस्त भागांचे नीट पाहणी-पंचनामे होत नाहीत. शासनाची मदत अनेकांपर्यंत पोहोचत नाही. ज्यांना मदत मिळाली तिही तुटपुंजी असते. या वर्षी पीकविम्याला थोडा कमीच प्रतिसाद मिळाला. त्यातही नुकसानीचे महत्त्वाचे ट्रिगर्स कमी केल्यामुळे विमा भरपाई मिळण्याच्या आशाही कमी झाल्या आहेत. शासकीय मदत जुन्या निकषांप्रमाणे मिळणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणार नाही..Soybean Crop Damage: सोयाबीन शेतातच अंकुरले! .या वर्षीच्या संकटाकडे शासन-प्रशासनाला नेहमीचे संकट म्हणून पाहू नये. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नोकरदाराला महिन्याचा पगार दिला नाही तर घर कसे चालणार म्हणून ओरड सुरू होते. येथे तर मागील तीन-चार वर्षांपासून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सातत्याच्या नैसर्गिक आपत्तींनी पूर्ण पीक वाया जात असताना त्यांनी घरसंसाराचा गाडा कसा चालवायचा, हा खरा प्रश्न आहे..राज्यात अतिवृष्टीच्या निकषांत बदल करा, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्या शेतकरी करीत आहेत. सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून कमी पावसाला अवर्षण, तर १० टक्क्यांहून अधिक पावसाला अतिवृष्टी म्हणून संबोधले जाते. यानुसार अतिवृष्टीजन्य परिस्थिती राज्याच्या अनेक भागांत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन जुन्या-नव्या निकषांनुसार नाही तर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई अथवा मदत मिळायला हवी..एवढेच नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी, शैक्षणिक फी माफी आदी सवलती त्यांना मिळायला हव्यात. असे झाले तरच या आपत्तीत तो तग धरणार आहे. बदलत्या हवामान काळात सातत्याच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. अशा वेळी ओल्या दुष्काळावर नव्याने विचार करावा लागणार आहे. भरपाईचे निकषही नव्याने ठरवावे लागतील. असे झाले तरच अतिवृष्टी अथवा ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.