Climate Science: ऐतिहासिक नोंदी हे दाखवितात की काही ‘एल-निनो’ वर्षांत भारतावर दुष्काळ पडला होता, तर इतर काही एल-निनो वर्षांत मॉन्सूनचा पाऊस सामान्य राहिला होता. म्हणून एल-निनो म्हणजे दुष्काळ असे समीकरण मांडता येत नाही..मॉन्सून म्हणजे भारतावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडणारा पाऊस अशी त्याची व्याख्या सामान्य जनतेने करून टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र मॉन्सूनचा पाऊस दोन टप्प्यांत पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर ते जानेवारी हा दुसरा टप्पा. महाराष्ट्रावर पाऊस पडतो तो फक्त नैर्ऋत्य मॉन्सूनचा. दर वर्षी मॉन्सून महाराष्ट्रात १० जूनच्या सुमारास दाखल होतो आणि १० ऑक्टोबरच्या सुमारास तो परतू लागतो हे वेळापत्रक आता महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून शेतकरी बंधुभगिनींपर्यंत सर्व जनतेच्या ओळखीचे झाले आहे..March 2026 Warmest : मार्च २०२६ जगभरात चौथा सर्वात उष्ण महिना; हवामान बदलाचे संकट चिंताजनक.अलीकडच्या काळात जे दोन नवीन शब्द मराठी भाषेत रोजच्या उपयोगात आले आहेत ते म्हणजे ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’. सर्वसामान्यांसाठी ते कुतूहलाचे विषय आहेत. काहीसे गहन, थोडेसे भीतिदायक असे ते शब्द आहेत. ला-निना वर्ष संपले आहे किंवा एल-निनो प्रबळ होत आहे, असे जेव्हा शास्त्रज्ञ बोलू लागतात तेव्हा चांगले होणार की वाईट, हे लगेच समजत नाही. एल-निनो आणि ला-निना यांचा मराठीत सोपा अनुवाद करायचा म्हटला, तर तो एक मुलगा आणि एक मुलगी, असा करता येईल. गंमत ही, की या स्पॅनिश शब्दांचा संबंध युरोपमधील स्पेन देशाशी नसून तो दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाशी आहे जेथे स्पॅनिश भाषा बोलली जाते. .समजून घेण्यासारखे हे आहे, की एल-निनो आणि ला-निना या चक्री वादळ किंवा अतिवृष्टीसारख्या अधूनमधून घडणाऱ्या आकस्मिक घटना नाहीत. त्या दीर्घ काळ चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्या आलटून पालटून बळावतात आणि मंदावतात, पण अगदी नियमितपणे नाही. परिणामी, आगामी वर्ष एल-निनोचे असेल किंवा ला-निनाचे असेल किंवा परिस्थिती तटस्थ राहील हे निश्चितपणे सांगणे हवामानशास्त्रज्ञांपुढे एक आव्हान ठरते. डिसेंबर महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान किती असेल याचे पूर्वानुमान मार्चमध्ये करणे सोपे नसते आणि ते चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही..मॉन्सूनचे जागतिक सहसंबंधपाऊस सगळीकडे पडतो. कधी कधी सौदी अरेबिया, दुबईसारख्या अगदी वाळवंटी प्रदेशातदेखील. पण त्यामागची प्रक्रिया बहुतेक स्थानिक असते. त्याउलट, भारतावरील पावसाचे वैशिष्ट्य हे आहे की मॉन्सूनचे धागेदोरे जगभर पसरलेले असतात. भारतापासून पंधरा हजार किलोमीटर दूर असलेल्या पेरू देशाच्या किनाऱ्यावरील प्रक्रियांशी किंवा युरोपवरील हिमपाताशी मॉन्सूनचे देणेघेणे सुरू असते. मॉन्सूनच्या या जागतिक सहसंबंधाचा शोध कोणी नव्याने लावलेला नाही किंवा तो परदेशी शास्त्रज्ञांनी लावला असेही नाही. .खरे तर तो शोध शंभर वर्षांपूर्वी भारतातच लावला गेला होता. १९०४ ते १९२४ च्या दरम्यान सर गिल्बर्ट वॉकर हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक होते. विभागाचे मुख्यालय त्या काळी सिमला येथे होते. भारतावर इंग्रजांची राजवट होती. इंग्रज साम्राज्याचा भौगोलिक विस्तार फार मोठा असल्याने वॉकर यांना सिमल्यात राहून जगभरातील वेधशाळांच्या नोंदी मिळवणे शक्य झाले. भारतीय मॉन्सूनचे विविध जागतिक सहसंबंध त्यांनी शोधून काढले आणि त्यावर आधारित मॉन्सूनचे पूर्वानुमान ते दर वर्षी देऊ लागले. प्रशांत महासागरावरील एल-निनोशी संबंधित सदर्न ऑसिलेशनचा शोध वॉकर यांनी लावला. मॉन्सूनचे काही सहसंबंध आता कालबाह्य ठरले असले तरी एल-निनो सदर्न ऑसिलेशनशी (एन्सो) वॉकर यांनी जोडलेला सहसंबंध अजूनही मॉन्सूनचे पूर्वानुमान करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाचा मानला जातो..El Nino Impact: जगावर ‘एल निनो’चे सावट गडद.सुकाळ आणि दुष्काळमागील शंभर वर्षांच्या हवामानाच्या आणि समुद्री तापमानांच्या नोंदींचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अनेक ढोबळ पण महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. एक तर, प्रशांत महासागर जेव्हा थंड असतो म्हणजे जेव्हा तेथे ला-निना परिस्थिती असते तेव्हा भारतावर जून ते सप्टेंबर महिन्यांतील मॉन्सूनचा पाऊस बहुधा सामान्य किंवा त्याहून चांगला असतो. म्हणजे ला-निना भारतासाठी अनुकूल असते. अलीकडच्या काही वर्षांत ला-निना परिस्थिती होती आणि भारतावर मॉनसूचा पाऊस चांगला पडला. थोडक्यात, सांगायचे तर प्रशांत महासागरावर ला-निना म्हणजे आपल्यासाठी सुकाळ! एल-निनो परिस्थिती याच्या उलट असते..यामध्ये प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय भाग तापतो आणि त्यावरील हवा हलकी होऊन वर चढते. पुढे ती पश्चिमेकडे वाहू लागते आणि शेवटी ती हिंद महासागरावर खाली उतरते. यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहात व्यत्यय येतो. या अभिसरणाला सर गिल्बर्ट वॉकर यांच्या सन्मानार्थ ‘वॉकर सर्क्युलेशन’ असे नाव दिले गेले आहे. संक्षेपात सांगायचे तर एल-निनो भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल ठरू शकतो. पण प्रत्येक वेळची एल-निनो परिस्थिती मॉन्सूनला अपायकारक असतेच असे मात्र नाही. ऐतिहासिक नोंदी हे दाखवतात, की काही एल-निनो वर्षांत भारतावर दुष्काळ पडला होता, तर इतर काही एल-निनो वर्षांत मॉन्सूनचा पाऊस सामान्य राहिला होता. .म्हणून एल-निनो म्हणजे दुष्काळ असे समीकरण मांडता येत नाही. एल-निनो उद्भविण्याची जराशी चाहूल लागली, की लगेच दुष्काळाचा बागुलबुवा उभा करणे तितकेसे वाजवी नाही. हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालयाच्या पर्वत रांगा, आणि संपूर्ण युरोप व आशिया खंड यांचा भारतीय मॉन्सूनच्या निर्मितीत आणि सक्रियतेत सहभाग असतो. हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागांच्या तापमानातील तफावत मॉन्सूनच्या प्रक्रियेत महत्त्वाची असते. यंदाच्या वर्षी एल-निनो हा मॉन्सूनचा विरोधक म्हणून निर्माण होत असला तरी इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक मॉन्सूनचा समर्थक म्हणून उभा राहण्याची शक्यता आहे. एल-निनो आणि आयओडी यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात शेवटी कोण विजयी होईल, हे आताच सांगणे कठीण आहे..दीर्घकालीन पूर्वानुमानभारतीय हवामानशास्त्र विभागाने १३ एप्रिल २०२६ रोजी आगामी नैर्ऋत्य मॉन्सूनसाठीचे दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीर केले आहे. या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा हा अंदाज आहे. आकडेवारी सांगायची झाली, तर मॉन्सूनचे देशभरातील पर्जन्यमान सरासरीच्या ९२ टक्के राहण्याची शक्यता आहे. यातसुद्धा अधिक उणे ५ टक्के चूकभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एकूण पाऊस कदाचित एका टोकाला सरासरीच्या ८७ टक्क्यांइतका कमी पडू शकेल किंवा दुसऱ्या टोकाला ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल. मॉन्सूनच्या आगमनाला अद्यापही दीड महिना आहे. .१३ एप्रिलचा अंदाज एक प्राथमिक अंदाज असून, मे महिन्याच्या अखेरीस दुसरा सुधारित अंदाज अधिकृतपणे सादर केला जाईल. दरम्यान, हवामानशास्त्रज्ञ एल-निनो आणि आयओडी वर बारकाईने लक्ष ठेवतीलच. पण त्याबरोबर सामान्य जनतेने आणि विशेषकरून शेतकऱ्यांनी जागृत राहून सावधगिरीची पावले टाकायची गरज आहे.९८५०१८३४७५(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.