Egg Production: थंडी वाढली की पौष्टिक प्रथिनयुक्त आहाराकडे बहुतांश जणांचा कल असतो. त्यामुळे सध्या अंड्यांना मागणी वाढली आहे. त्या तुलनेत बाजारात पुरवठा मात्र नाही. त्यामुळे दरात तेजी असून शेकडा ७०० रुपये (प्रतिनग ७ रुपये) असा उच्चांकी दर अंड्यांना मिळतोय. महत्त्वाचे म्हणजे मक्यासह सोयापेंडचे दर थोडे घसरल्याने उत्पादन खर्च कमी होऊन लेअर पोल्ट्री व्यावसायिकांच्या नफ्यात वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे श्रावण महिना तसेच उन्हाळ्यामध्ये अंड्यासह चिकनलाही मागणी थोडी कमी असते. परंतु यावर्षी श्रावणातही प्रतिनग साडेचार रुपये असा परवडणारा दर अंड्यांना मिळाला. .आपल्या गरजेपुरती अंडी महाराष्ट्रात उत्पादित होत नाहीत. परिणामी आंध्र प्रदेशसह दक्षिणेतील राज्यांतून आपल्याकडे अंड्यांची आवक होते. तमिळनाडू मधील नमक्कल हा अंडी उत्पादनात देशात अग्रेसर जिल्हा असून येथून देशभर अंडी पुरविली जातात. शिवाय आखाती देशांमध्ये महिन्याला २० कोटी अंड्यांची निर्यात याच भागातून होते. जुलै - २०२५ मध्ये तमिळनाडूमधून पहिल्यांदाच एक कोटी अंड्यांची निर्यात अमेरिकेला झाली..Eggs Rate: अंडी दर पोहोचले ७०० रुपये शेकड्यावर.त्याचा परिणाम देशातील पुरवठ्यावर होऊन जुलैमध्ये ६०० रुपये शेकडा असे अंड्यांचे दर होते. तर मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजे थंडीच्या महिन्यात ओमानमध्ये होणारी आपली अंड्याची निर्यात ठप्प झाल्याने त्याचा परिणाम दर कोसळण्यावर (प्रतिशेकडा ६७५ वरून ५७० रुपये) झाला होता. अर्थात अंड्याच्या दरातील तेजी-मंदीला आयात-निर्यातही जबाबदार आहे..सध्या अंडी उत्पादन किफायती ठरत असले तरी वाढता उत्पादन खर्च आणि अंड्यांना मिळणाऱ्या कमी दरामुळे हा व्यवसाय अनेकदा तोट्याचाच ठरत आला आहे. मजूरटंचाईचे ग्रहण या व्यवसायाला कायम लागलेले असते. राज्यातील मजूर पोल्ट्रीमध्ये काम करायला तयार नाहीत. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातून मजूर आणावे लागतात. त्यांच्या मजुरीचे दरही अधिक आहेत. कोंबडीपालन मग ते अंड्यासाठी असो की मांसोत्पादनासाठी यात जोखीम अधिक आहे. बदलत्या हवामानाबरोबर बर्ड फ्लूसारख्या आजाराच्या अफवेचा मोठा फटका या व्यवसायाला आत्तापर्यंत बसत आला आहे..World Egg Day: कोंबडीचे अंडे : आरोग्यासाठी परिपूर्ण खजिना .अंडी उत्पादनात बहुतांश वेळा नफ्या-तोट्याचे गणित जुळत नसल्याने राज्यात अनेकांनी या व्यवसायातून माघार घेतली आहे, हेही विसरून चालणार नाही. अधिक गंभीर बाब म्हणजे राज्यात सात ते आठ लाखांवर पोल्ट्री व्यावसायिक असताना कोंबडी खाद्य घटकांचे विश्लेषण आणि रोगराईच्या काळातील नमुने तपासणारी प्रयोगशाळा पुण्यात फक्त एकच आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांना खाद्य असो की रोगांसंबंधात नमुने तपासणी वेळखाऊ आणि खूपच खर्चिक पडते..अशावेळी विभागीय पातळीवर नमुने तपासणी प्रयोगशाळा असायला हव्यात अशी व्यावसायिकांची मागणी आहे. राज्य सरकारने पशू संवर्धनला सप्टेंबर २०२५ मध्ये कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. या निर्णयाने दुग्ध-मत्स्य-कोंबडी पालन या व्यवसायांना वीज दर, कर्ज तसेच व्याज यासह कृषी प्रमाणे कर सवलती मिळायला हव्यात. परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी होताना दिसत नाही..हे सर्व व्यवसाय शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न स्रोत म्हणून काम करतात. या व्यवसायामुळे शेतीतील जोखीम कमी होण्यास शेतकऱ्यांना हातभार लागतो. शिवाय यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर कोंबडीपालन सह इतरही पूरक व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने सवलती, लाभ यांची तत्काळ अंमलबजावणी झाल्यास शेतकरी तसेच व्यावसायिकांना अधिक दिलासा मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.