व्हा सावध, वेळ ही बाका... विनाशाची!

पृथ्वीवरील सात अब्ज लोकसंख्येच्या रोजच्या आयुष्यावर वाढत्या जागतिक तापमानाचा होणारा परिणाम हे एक आव्हानच आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी कोणतेही नवे तंत्रज्ञान अजून विकसित होऊ शकले नाही. उलट तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पर्यावरणाला आणि पर्यायाने हवामान बदलांनाही पोषकच ठरत आहेत.
संपादकीय
संपादकीय

भारतात दररोज पंधरा लाख टन कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळला जातो. त्यातून एक लाख चौदा हजार मेगावॅट वीज निर्माण होते. तेवीस लाख टन कार्बन डायऑक्‍साईड वातावरणात व सुमारे सहा लाख टन राख दऱ्याखोऱ्यात, नदीखाडी, सागरात टाकली जाते. त्यासाठी करोडो एकर शेती व पिण्यास उपयोगी पाणी वापरले जाते. त्यापासून लाखो टन अन्नधान्य उत्पादित झाले असते व कोट्यवधी गरिबांच्या पोटात अन्नाचा घास गेला असता. एकवेळची का होईना भूक भागली असती. तसेच लाखो टन विषारी वायू सूक्ष्म राखेसह वातावरणात सोडले जातात. अशा औष्णिक कारखान्यांना थंड ठेवण्यासाठी सागरातले साठ हजार कोटी लिटर पाणी दररोज कोट्यवधींची वीज वापरून खेचले जाते. ते गरम पाणी परत नदी, समुद्रात सोडले जाते. ज्यामुळे कोट्यवधी जलचर नष्ट होतात. या घडामोडीत जीवसृष्टीचा प्रचंड नाश होतो आहे. तापमान वाढतेय. कोळसा जाळून बनविणाऱ्या विजेचा भारतात होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनात ६० टक्के वाटा आहे. तर जागतिक पातळीवर तो ४२ टक्के आहे. एकूण जागतिक कार्बन उत्सर्जन दरवर्षी सुमारे एक हजार टन आहे. यापैकी सुमारे चारशे कोटी टन कार्बन हरितद्रव्याकडून शोषला जातो. ज्याचा ताण निसर्ग, पृथ्वीवर पडतो. तर दुसरे सहाशे कोटी टन कार्बन वातवरणात सोडला जातो.  ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्‍ट’ या संस्थेच्या २०१७ च्या आकडेवारीनुसार कोळसा वापराचे प्रमाण ७.१ टक्के, पेट्रोलियम पदार्थ २.९ टक्‍क्‍यांनी व नैसर्गिक वायूचे प्रमाण ६ टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे सिद्ध झाले आहे.

कार्बन उत्सर्जनात चीन पहिल्या क्रमांकावर असून त्याचे प्रमाण २७ टक्के आहे. त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. त्यांचा वाटा १५ टक्के आहे व युरोपियन महासंघ १० टक्के त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारत ७ टक्के कार्बन उत्सर्जन करतो. हे प्रमुख चार देश मिळून ५९ टक्के कार्बन उत्सर्जन करतात. भारत व चीनमध्ये कोळशावरील वीजनिर्मितीचे प्रमाण अधिक आहे. ते आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मग प्रदूषण व तापमानवाढीचे काय होईल? दरवर्षी ०.२० अंश सेल्सिअस प्रमाणे पाच वर्षांत १ अंश सेल्सिअस या गतीने पृथ्वीच्या इतिहासात कोट्यवधी वर्षांत कधी नव्हे इतकी तापमान वाढ होते आहे, असे जागतिक हवामान संघटनेने २३ मार्च २०१७ ला जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढली असून पुढील शंभर वर्षांत मुंबईला सर्वाधिक धोका आहे. असा अंदाज ‘नासा’ने वर्तवला आहे. ‘ग्रॅडिएंट फिंगर प्रिंट मॅपिंग’च्या मदतीने नासाने समुद्र पातळीवरील वाढीची आकडेवारी गोळा केली. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील जगभरातील २९३ शहरासमोर येत्या काळात मोठे संकट उभे असणार आहे. 

साधारणपणे १९७० पासून हवामान बदलामुळे झालेल्या जागतिक तापमानवाढीचा ९३ टक्के हिस्सा पृथ्वीवरील पाण्याने शोषून घेतला आहे. वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. मात्र, समुद्रातील बदलामुळे सागरी प्राणी जीवन धोक्‍यात आले आहे. दुर्दैवाने त्याचा फारसा विचार होताना दिसत नाही. या तापमानवाढीत मानवाचा ७० ते ८० टक्के वाटा आहे. पृथ्वीवरील सात अब्ज लोकसंख्येच्या रोजच्या आयुष्यावर वाढत्या जागतिक तापमानाचा होणारा परिणाम हे एक आव्हानच आहे. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी कोणतेही नवे तंत्रज्ञान अजून विकसित होऊ शकले नाही. उलट तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पर्यावरणाला आणि पर्यायाने हवामान बदलांनाही पोषकच ठरत आहेत. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असताना विविध उपकरणांनी मानवी आयुष्य व्यापत चालले आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा आणि त्यातून निर्माण होणारा ई-कचरा, त्यांच्या निर्मितीसाठी खर्च होणारी ऊर्जा, कार्बन उत्सर्जन यासारख्या बाबीकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यांचा वापर घटवावा लागेल.  

वाढत्या वायू प्रदूषणाने ओझोन स्तराला छिद्र पडत आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे सरळ रेषेत पृथ्वीवर पडतात. त्याचा मानवी त्वचेवर घातक परिणाम होतोय. हवा प्रदूषणाने देशातील प्रतिमिनिटाला दोन बळी पडतात, असे लॅन्सेट या नियतकालिकाच्या अभ्यासात निष्पन्न झाले असून दरवर्षी सरासरी दहा लाख लोक हवा प्रदूषणाने बळी जातात. वादळे, पूर, दुष्काळ, वनवा यांबाबतच्या पूर्वसूचना लक्षात घेऊन हवामान बदल हे भविष्यातील आव्हान न मानता आपल्या वर्तमानातील चुका समजून घेऊन ठोस पावले उचलली पाहिजेत. जागतिक ऊर्जा वापरामध्ये ८० टक्के ऊर्जा ही जीवाश्‍म इंधनातून म्हणजे कोळसा, तेल, प्राकृतिक गॅस यांच्यापासून तयार होते. त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन होते. हा वायू आपल्या गुणधर्मानुसार सूर्यकिरणातील उष्णता शोषित असतो. आता वसुंधरा तापाच्या घेऱ्यात सापडली आहे. त्यासाठी अक्षय ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढवावा लागेल आणि जीवाश्‍म इंधनावरील अवलंबित्व कमी करावे लागेल. ऑक्‍सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी लागेल.

पृथ्वीवरील जैविक वनसंपदा वाढवावी लागेल. नष्ट होणारी जंगले सांभाळावी लागतील. सागरातील वनस्पती पूर्ववत आणणे, हरितगृह वायू व कार्बनडाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे आहे. कृषी अवशेष न जाळता त्यापासून सेंद्रिय खत तयार करावे लागेल. हवामान बदलाबाबत गांभीर्याने पावले न टाकल्यास मानवाचेच नव्हे तर पृथ्वीचेच अस्तित्व धोक्‍यात येऊ शकते. विज्ञान माणसाला अनेक वरदाने देत आला आहे. पण, ही वरदाने दुधारी अस्त्रासारखी आहेत. त्याचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक जाणवतो आहे. विज्ञानाचा वापर मर्यादित ठेवावा लागेल. नाहीतर आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेताहोत हे विसरून चालणार नाही.  

रमेश चिल्ले : ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com