दुर्लक्षित पिकांवर करा लक्ष केंद्रित

अनेक दुर्लक्षित फळे-भाजीपाला पिके, रानभाज्या, विदेशी भाजीपाला यांचा आहारात वापर वाढत असताना त्यावरील संशोधनावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाल्यास राज्यातील शेतीत वैविध्यता येईल.
sampadkiya
sampadkiya

ब्रोकोली, रेड कॅबेज, सिलेरी, झुकेनी आदी विदेशी भाजीपाल्याची लागवड राज्यात वाढत आहे. याच बरोबर दुर्लक्षित अशा चेरी टोमॅटोचे पीकही बरेच शेतकरी आता घेऊ लागले आहेत. चेरी टोमॅटो हे देशी भाजीपाला पीक असून, याची रोपे शेत-शिवारात प्रामुख्याने हिवाळी हंगामात दिसतात. आहार आणि औषधी गुणधर्माच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त असे हे पीक संशोधन आणि त्यामुळेच लागवडवृद्धीच्या बाबतीतही दुर्लक्षित राहिले आहे. अलीकडे या भाजीपाला पिकाचे महत्त्व कळाल्याने खासकरून मोठ्या शहरांमधील बाजारपेठेत चेरी टोमॅटो विदेशी भाजीपाल्याबरोबर विकले जात आहे. चेरी टोमॅटोचा उपयोग तारांकित हॉटेल्समधून सलाड साठी होतो. तसेच याचा भाजी आणि सॉसेस मध्येही वापर वाढत आहे. मागणीच्या प्रमाणात आवक कमी असल्याने यांस दरही चांगला मिळतोय. चेरी टोमॅटोची लागवड वाढवायची म्हणजे याबाबात वाणांबरोबर प्रगत लागवड तंत्राचाही अभावच दिसून येतो. चेरी टोमॅटोची लागवड करायची म्हटलं तर आजतागायत तरी खासगी कंपन्यांचेच वाण, त्यांच्याकडूनच बियाणे विकत घ्यावे लागते. नियंत्रित शेतीत काटेकोर व्यवस्थापनात चेरी टोमॅटोचे उत्पादन घ्यावे लागत असल्याने खर्च अधिक येतो. चेरी टोमॅटोची व्यवस्थित पॅकिंग करून मोठ्या शहरांतच विक्री करावी लागते. हे कामही खर्चिक आहे. त्यामुळे या भाजीपाला पिकाच्या व्यावसायिक लागवडीत बहुतांश करून खासगी कंपन्याच उतरलेल्या आहेत. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चेरी टोमॅटोचा फुले जयश्री हा वाण विकसित केला आहे. चेरी टोमॅटोवर संशोधन करून वाण विकसित करण्याचा हा राज्यातील तरी पहिलाच प्रयोग आहे. 

फुले जयश्री हा वाण पारंपरिक, जंगली चेरी टोमॅटोच्या अनेक जातींपासून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे उंच वाढणाऱ्या या वाणाचे घडात फळे लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादकता अधिक मिळते. मुख्य म्हणजे आंबट गोड असा चेरी टोमॅटोचा मूळ स्वाद यात उतरविण्यात आला असल्याने ग्राहकांना तो चाखता येणार आहे. या वाणाच्या चेरी टोमॅटोस बाजारात मागणी वाढून दरही अधिक मिळू शकतो. फुले जयश्री या वाणाचे बियाणे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. या वाणामुळे भाजीपाला उत्पादकांना (खासकरून विदेशी भाजीपाला घेणाऱ्यांना) लागवडीसाठी एक वेगळा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहराजवळच्या गावातील शेतकरी एवढेच नव्हे शहरातही टेरेस, किचन गार्डन करणारे या वाणाची लागवड करून उत्पादन घेऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना विद्यापीठाने चेरी टोमॅटोच्या नवीन वाणाच्या बियाण्याबरोबर याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रगत तंत्रही द्यायला हवे. विशेष म्हणजे याची विक्री करताना घ्यावयाची काळजी, टिकाऊ अन् साठवण क्षमता, मूल्यवर्धन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळायला हवे. खरे तर अनेक दुर्लक्षित फळे-भाजीपाला पिके, रानभाज्या, विदेशी भाजीपाला यांचा आहारात वापर वाढत असताना त्यावरील संशोधनावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाल्यास राज्यातील शेतीत वैविध्यता येईल. विभागनिहाय अनेक पिके, त्यांची नवनवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. चांगले उत्पादन आणि अधिक दर देणाऱ्या या पिकांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com