मृद्‍गंध हरवत चाललाय!

सुगंध देणारा सेंद्रिय कर्ब पाणी धरून ठेवतो, पाऊस लांबला तरी रोपं कधीही माना टाकत नाहीत. आता मात्र गंधविरहित माती पहिल्या मुसळधार पावसामध्ये उगवलेल्या रोपांसह वाहून जाते, ही शोकांतिका आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

यावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात तारखेपासून मॉन्सूनचे अभ्यंगस्नान सुरू असताना राजधानी मुंबई त्यास अपवाद कशी असणार! मुंबईच्या उपनगरात सकाळच्या रम्य वातावरणात सदनिकेच्या सज्जामधून पावसाची झड अनुभवताना समोरच्या टेबलवरच्या मोबाईलचा आवाज जाणवला. व्हॉट्सअॅप अतिशय कमी वापरणारा मी कृषी ग्रुप आणि जवळच्या मित्रांसाठी मात्र नेहमीच अपवाद ठरतो. तो संदेश होता माझ्या विदर्भामधील एका ज्येष्ठ कृषी संशोधक मित्राचा! फिका पडतो अत्तराचा फाया। जेव्हा पाऊस भिजवतो मातीची काया।। असा तो संदेश होता. मनात विचार आला, खरचं मॉन्सूनच्या पहिल्या पावसात आज मी माझ्या लहानपणी अनुभवलेला या अत्तराच्या फायाचा अनुभव आता मिळतो का? उत्तर तर नकारार्थीच होते. 

मुंबई अथवा कुठल्याही महानगरात, मोठ्या शहरात जा, पहिल्या पावसात उपसलेल्या गटारांची दुर्गंधीच जास्त येते. मग ग्रामीण भाग, शेतकऱ्यांची वावरे त्यास अपवाद असतील का? मुळीच नाही. तेथे फक्त पाऊस रपरप पडतो, मातीचा वरचा थर वाहून नेतो, मृद्‍गंध वगैरे काहीच नाही, पाऊस पडला, चला आता लवकर पेरणीला लागावे यातच शेतकरी समाधानी असतो. प्रथम वेळेवर पाऊस पडतो की नाही, पडला तर वाफसा येणार का? धान उगवल्यावर पुन्हा गर्जनार का? या चिंतेच्या महापुरात मातीचा मृद्‍गंध केव्हाच हरवलेला असतो. शाश्‍वत शेतीसाठी पहिल्या पावसाचा हा मृद्‍गंध आवश्यक असतोच हे सुद्धा किती जणांना माहीत आहे? 

पहिल्या पावसात आम्ही अनुभवतो तो रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वास. वास आणि सुवास यांतील फरक आम्हाला आजही कळत नाही. मित्राचा तो संदेश वाचून मन भूतकाळात गेले. जमीन उपयोगी जिवाणूंनी समृद्ध असेल, त्यात सेंद्रिय कर्ब भरपूर असतील तर ‘अॅक्टिनोमायसिटीज’ हे तंतुमय जिवाणू जे मातीमध्ये सुप्त अवस्थेत असतात ते पावसाच्या पहिल्या थेंबाने जागृत होतात. त्यांच्या आनंदाचा, प्रजननाचा तो सुगंध असतो, हा सुगंध मातीचा म्हणून हा मृद्‍गंध, हाच तो पहिल्या पावसाचा सुवास जो परिसरामधील, वावरामधील जैवविविधतेला नेहमीच नवीन चेतना देतो. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त तेथेच हा मृद्‍गंध, सोबत शेंदरी रंगाचे मृगकिडे आणि तांबूस विटकरी रंगाचे गोम, गांडुळे सुद्धा. कारण मृद्‍गंध मिळाला की शेतकऱ्याचे मित्र (कीटक) मातीतून वर येणारच. आम्ही शेतीला ओरबाडून पैसा घेतो; मात्र शेती समृद्ध करणारे मित्र कीटक कमी कमी होत आहेत. माझे आजोबा सातवी पास मात्र त्यांचे शेतीचे प्रयोग शास्त्रज्ञांना लाजविणारे. जमिनीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी सूक्ष्मजीव किती आहेत, हे ओळखण्यासाठी ते एप्रिल, मेच्या उन्हाळ्यात ज्या पट्ट्यामध्ये पेरणी करावयाची आहे तिथे आजीच्या विरलेल्या साडीचा लहान तुकडा वितभर खोल पुरून ठेवत, त्यावर आठवडाभर थोडे थोडे पाणी घालावयाचे काम माझ्याकडे. दहा, पंधरा दिवसांनी उकरून पाहिल्यावर चिंधी गायब, तिचे तुकडे तुकडे झालेले, संपूर्ण विरून गेलेल्या त्या तुकड्यावरून आजोबा त्या शेतात किती उत्पन्न येणार ते सांगत. चिंधीच्या विरण्यावरून आजोबा हे सुद्धा ठरवीत, की त्या जमिनीला किती खत द्यावयाचे. एप्रिल महिन्यात मेंढपाळ त्याच्या मेंढ्यासह आमच्या शेतात याचसाठी येत असे. त्या वेळची ती माती परीक्षा आणि सेंद्रिय कर्बाचे वाढलेले प्रमाण शेतकऱ्यांना भरभरून उत्पादन देत असे. अनेक वेळा आजोबा जिवाणू परीक्षण करण्यासाठी ओलसर मातीत बांधावरच्या पिंपळाचे पान पुरून ठेवत. दोन आठवड्यांतच आम्हाला जाळीदार पान पाहावयास मिळे. अशा मातीमधूनच पहिल्या पावसाचा मृद्‍गंध येतो हे सुद्धा त्यांनीच मला सप्रयोग शिकविले. पहिल्या पावसाच्या मृद्‍गंधाचा आनंद घेण्यासाठी गोठ्यामधील गाईची वासरे दावे तोडून आनंदाने सैरभैर होतात. ते सुद्धा मी अनुभवले, हाच तो खरा निसर्ग आणि त्यास जोडलेली निसर्ग शेती.

आज मातीचा ‍गंध पूर्ण हरवला आहे. मातीची खरी काया म्हणजेच त्यातील जिवाणूंची श्रीमंती, अशा मातीवर उगवलेल्या वेली, झुडपे वृक्षांची प्रभावळ म्हणजे तिची तलम हरित वस्त्रे, शेतकऱ्यांनी पेरलेले आणि उगवलेले ‘धान’ म्हणजे तिचे सुवर्ण अलंकार! अशी मृद्‌काया नेहमीच प्रसन्न असते आणि तिलाच हा गंध येत असतो. ही मातीची काया आज खरंच प्रसन्न आहे का? खरीप आणि रब्बीला आपण तिला संकरित पिकांच्या रूपाने विविध दागिने चढवतो, रासायनिक खतांचा नैवद्य दाखवितो, त्या मुलामा दिलेल्या दागिन्याचे पैसे तुम्हाला मिळतात. पण त्यामधून सुवर्ण अलंकारांचे सुख कधी मिळते का? आधुनिक तंत्रज्ञानावर आरूढ झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीची ही खरी श्रीमंती कशी माहीत असणार? कारण आम्ही त्यांना तशी संधीच दिली नाही. त्यांना फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश असे वेगवेगळे रासायनिक खते, संकरित बियाणे, तीच ती दोन-तीन पिकांची शेती, पावसाळ्यात पडणारे कीड-रोग, त्यात दरवर्षी नवीन पाहुण्यांची भर. रिकामे होणारे कीडनाशकांचे डबे, डोक्यावर कर्ज, अनुदानासाठी चकरा, शासनाच्या विविध योजना, पीकविमा, धोधो पाऊस पडला तर आम्ही खाली पाहणार आणि उघड पडली की आकाशाकडे डोळे. दोष कुणाचा? शेतकऱ्यांचा की सद्यपरिस्थितीचा! 

मातीला गंध आला असता तर आज अशी वेळ आली असती का? सुगंध देणारा सेंद्रिय कर्ब पाणी धरून ठेवतो, पाऊस लांबला तरी रोपं कधीही माना टाकत नाहीत. आता मात्र गंधविरहित माती पहिल्या मुसळधार पावसामध्ये उगवलेल्या रोपांसह वाहून जाते, ही शोकांतिका आहे. पूर्वी पहिल्या मृगानंतर शेतात गेलेला शेतकरी पेरणी झाल्याशिवाय घरी येत नसे. आता मात्र पीककर्ज, अनुदान, वीमा, योजना यांसाठी शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या हंगामात तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांची वावरं रिकामी दिसताहेत. कर्ज, अनुदान हे शब्द शेतकऱ्यांच्या शब्दकोशात जमिनीचा मृद्‌गंध हरवल्यामुळेच आले आहेत, हे ज्या दिवशी आम्हाला समजेल तो सुदिन समजावा! 

डॉ. नागेश टेकाळे  ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com