तो येणार, हमखास बरसणार!

केरळला एक जूनला मॉन्सून दाखल झाल्यावर महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस १० जूनपासून सुरु होतो. तोपर्यंत राज्यात मॉन्सूनपूर्व सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
agrowon editorial
agrowon editorial

जून महिना लागला आहे. अजूनही सूर्य अक्षरशः आग ओकतोय. चार दिवसांपूर्वी राजस्थानातील तापमान ५० अंश सेल्सिअरवर गेले होते. राज्यातही तापमानाच्या पाऱ्याने या उन्हाळ्यात ४७-४८ अंश सेल्सिअस गाठले. राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी उकाडा असह्य होतोय तर काही भागात फळे-भाजीपाला तप्त उन्हाने करपत आहेत. तप्त भूमातेसह जन-माणसांनाही मॉन्सूनच्या आगमनाची आस लागली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे दक्षिण अंदमानात १७ मे ला दाखल झालेला मॉन्सून १० दिवस तेथेच स्थिरावला होता. तो सक्रिय होऊन त्याने चार दिवसांपूर्वी अंदमान-निकोबार बेटांची मजल मारली. आणि आज एक जूनला म्हणजे आपल्या ठराविक वेळी केरळमध्ये दाखल होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये दाखल होणे हे सर्व भारतीयांसाठी अत्यंत दिलासादायक बाब असते. केरळ हे नैऋत्य मॉन्सूनचे प्रवेशद्वार आहे. तेथूनच तो कर्नाटक, गोवा मार्गे कोकण किनारपट्टी आणि मग राज्यभर पसरत असतो. हा क्रम कधी बदलत नाही. तारखा मात्र थोड्याफार बदलत असतात. केरळला एक जूनला मॉन्सून दाखल झाल्यावर महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस १० जूनपासून सुरु होतो. तोपर्यंत राज्यात मॉन्सूनपूर्व सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने असह्य उकाड्यापासून थोडापार दिलासा मिळेल. या १० दिवसांदरम्यान पेरणीपूर्व कामांनाही राज्यात वेग आलेला असेल.

मॉन्सूनच्या भारतातील आगमनास अनेक घटक कारणीभूत असतात. याचा अभ्यास डॉ. गोवारीकर यांनी केला. डॉ. गोवारीकर एकदा म्हटले होते, ‘‘माझ्या मायभूमीमध्ये बरसणारा मॉन्सून आफ्रिकेमधील अवर्षणाएवढा कठोर नाही! तो येतो, हमखास येतो, कधी नेहमीप्रमाणे तर कधी उशिरासुद्धा! कधी हलका सौम्य, केव्हा मध्यम आणि रागावला तर मुसळधारसुद्धा! त्यास तो आहे तसा स्वीकारणेच योग्य! त्याचे राजकारण करू नका.'' शेतकऱ्यांचे अश्रू थोपविण्याचे केवढे तरी सामर्थ्य या शब्दांत आहे. मॉन्सून ही निसर्गाने भारतास दिलेली फार मोठी देणगी आहे. या देणगीकडे सकारात्मकतेनेच पाहायला पाहिजे, हे त्यांनी आम्हास शिकवले. जेष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर हे सुद्धा मॉन्सूनकडे नेहमी सकारात्मकच दृष्टिनेच पाहतात. सध्याच्या अनियमित पावसाला सुद्धा ते एक मॉन्सूनची नियमित प्रक्रिया मानतात. त्यांच्याही मते, ‘‘पाऊस एखाद्या वर्षी आलाच नाही असे कधी झाले नाही. तो त्याच्या नियमित वेळेला येतो आणि हमखास बरसतो.’’

देशातील ६० टक्के तर राज्यातील ८२ टक्के जिरायती शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. देशातील तसेच राज्यातील उर्वरित बागायती शेतीही अप्रत्यक्षपणे पावसाच्याच पाण्यावर अवलंबून आहे, म्हणावे लागेल. कारण पाऊस चांगला पडला तरच धरणे, बंधारे, नदी, नाले, विहीरी, तलाव, कुपनलिका यांना पाणी राहून शेती सिंचन होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला की दुष्काळाचे चटके बसतात. गेले वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात यावर्षी उन्हाळभर पाणी पुरले. काही भागात पाणीटंचाई जाणवत असली तरी त्याची तिव्रता फारच कमी आहे. गेल्या वर्षी चांगले पाऊसमान असले तरी खरीपातील मोठे खंड आणि वर्षभर पडत राहिलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. अर्थात पाऊस कमी पडो की अधिक शेतकरी आणि शासन-प्रशासनाने येणाऱ्या आपत्तीस तोंड देण्यास सज्ज असले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com