अनिल जाधव
पुणेः अगदी मागील आठवड्यापर्यंत कापूस बाजार (Cotton Market) व्यवस्थित सुरु होता. कापूस दरात वाढही झाली. मात्र चीनमध्ये (China) अचानक कोरोना वाढला आणि बाजारात चर्चा सुरु झाली. त्याचा परिणाम कापूस बाजारावरही काहीसे जाणवत आहेत. पण कापूस दरावर फार मोठा परिणाम झाला नाही. मात्र भविष्यात कोरोना चिंता वाढवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाचा कापूस हंगाम सुरु झाला, तेव्हापासून जगात महागाईची चिंता होती. युरोप, अमेरिका, चीन, भारत यासह महत्वाच्या देशांमध्ये महागाई वाढलेली होती. त्यामुळे यंदा कापडाला मागणी कमी राहून कापूस वापर घटण्याची शक्यता गृहीत धरली जात होती. मात्र यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढून वापरही कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण याचवेळी मागील हंगामातील साठा कमी होता. त्यामुळं मागणी आणि पुरवठा समिकरण बरोबरीत येईल, अशी शक्यता होती. परिणामी परिस्थिती सुधारेल तसा कापूस वापरही वाढत जाईल, असा अंदाज होता.
भारतातही कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. तसेच देशात मागील हंगामातील शिल्लक साठा निम्म्यापेक्षाही कमी होता. म्हणजेच कापसाचा एकूण पुरवठा गेल्यावर्षीपेक्षा कमी राहणार आहे. गेल्यावर्षी मागील हंगामातील शिल्लक, देशातील उत्पादन आणि आयात मिळून ३९२ लाख गाठींचा पुरवठा झाल होता. मात्र यंदा एकूण पुरवठा ३८३ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. मात्र त्यात पुढील काळात कपात केला जाणार आहेच. त्यामुळे यंदा कापसाचा वापर काहीसा कमी झाला तरी बाजार तेजीत राहून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.
पण मागील काही दिवासांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कमी जास्त होण्यामागे मुख्य दोन कारणं सांगितली जातात. एक म्हणजे चीनमध्ये वाढणारा कोरोना. चीनमध्ये आता कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. चीनमध्ये काही भागांत मागील काही दिवासांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केले जात होते. त्यामुळे चीनची मागणी वाढून कापूस बाजार वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र अचनाक कोरोनाची लाट आली आणि बाजारावर पुन्हा बंदचे सावट आले. तर अमेरिकेची मागील आठवड्यात कापूस निर्यात कमी झाली. तसेच पाकिस्तानची आयातही थांबली आहे. भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला, याचा परिणाम कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे.
काय राहू शकते दरपातळी?
तसंच वाढत्या कोरोनामुळे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी सध्याच्या कापूस दरात फार मोठी घसरण दीर्घकाळासाठी होईल, असे वाटत नाही. सध्या कपासाला सरासरी ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. मात्र कोरोना वाढलाच तर शेतकऱ्यांना सरासरी किमान ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो. तर कोरोनाची परिस्थिती कमी झाली तर किमान सरासरी ९ हजार रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.