Cotton Production: देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज फुगवून सांगण्यात आल्याची चर्चा बाजारात आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती या चर्चेला दुजोराच देते. जागतिक पातळीवर यंदा कापूस उत्पादन एक टक्क्याच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज असला तरी वापर किंचित घटण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावामुळे यंदा विक्रमी आयात होणार आहे. असे असले तरी देशात कापूस दर स्थिर आहेत. पुढील काळात सीसीआयची खरेदी आणि शुल्कमुक्त आयातीची मुदत संपल्यानंतर कापूस बाजाराला आधार मिळेल, तसेच अमेरिकेसोबत व्यापार करार झाल्यास समीकरण बदलू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) आणि अमेरिकेचा कृषी विभाग (यूएसडीए) यांनी भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज नुकतेच जाहीर केले. सीएआयने ३०५ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. गेल्या वर्षीपेक्षा केवळ २.४ टक्क्यांनी उत्पादन कमी राहील, असे सीएआयचे म्हणणे आहे. तर युएसडीएने गेल्या वर्षीएवढेच म्हणजेच ३०७ लाख गाठी उत्पादन होईल, असा अंदाज दिला. पण या दोन्ही संस्थांच्या अंदाजावरून बाजारात चर्चा सुरू आहे..देशातील कापूस लागवड यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३ ते ४ टक्क्यांनी कमी झालेली आहे. त्यातच पावसाने सर्वच कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाचे नुकसान केले. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाने पिकाचे नुकसान केले आहे. कापूस उत्पादनात याच राज्यांचा वाटा मोठा असतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतही नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनातील घट जास्त असल्याचे दिसते. वास्तविक देशातील उत्पादन २८० लाख गाठींच्या दरम्यान असल्याचे उद्योगातील काही जाणकारांचे मत आहे. .Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांवर निगरणी समित्या स्थापन .विशेष म्हणजे देशातील कापसाचा शिल्लक साठा जास्त असल्याचे सीएआयचे म्हणणे आहे. यावरूनही मतभेद दिसत आहेत. देशातील उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त राहण्याची शक्यता आहे. देशातील कापसाचा वापर ३०० लाख गाठींवर राहण्याची शक्यता आहे. उत्पादनापेक्षा वापर जास्त दाखवल्यास कापूस बाजारातील समीकरणे आताच बदलतील. त्यामुळे उत्पादनाचे अंदाज विचारपूर्वक दिले जात आहेत, असेही बाजारातील अभ्यासकांनी सांगितले..आयातीचा धोकादेशातील कापूस उत्पादन गेल्या १७ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचणार आहे. देशात उत्पादन घटले. यामुळे आयात वाढणार आहे. भारताची कापूस आयात यंदा विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची उपलब्धता चांगली आहे. तसेच यंदा जागतिक कापूस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. तर भारत सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढले आहे. म्हणजेच या काळात आयातीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तिकडे अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कापसाची उपलब्धता आहे. भावही कमी आहेत..ब्राझीलचा कापूस तर सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंतच देशात ३० लाख गाठींपर्यंत कापसाची आयात होऊ शकते, असा अंदाज सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला आहे. तसेच यंदाच्या हंगामात (२०२५-२६) कापूस आयात जवळपास १० टक्क्यांनी वाढून विक्रमी ४५ लाख गाठींवर पोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. वाढत्या आयातीचा देशातील कापूस बाजारावरही दबाव येत आहे. देशातील उत्पादन कमी असूनही भाव अपेक्षेप्रमाणे न वाढण्यामागे आयात हे मुख्य कारण आहे. केंद्राने ३१ डिसेंबरनंतर शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही तर आयात अपेक्षित अंदाजाच्या दरम्यान होईल. पण केंद्राने मुदतवाढ दिली तर मात्र आयातीचे प्रमाण वाढू शकते..सीसीआयच्या खरेदीला कमी प्रतिसादबाजारात सध्या कापसाचे भाव हमीभावापेक्षा १००० ते १२०० रुपयाने कमी आहेत. असे असले तरी सीसीआयच्या कापूस खरेदीला कमीच प्रतिसाद मिळत आहे. सीसीआयने यंदा हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान अॅपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र राज्यात आतापर्यंत केवळ ५ लाखांच्या दरम्यान शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. सीसीआयने राज्यात आतापर्यंत २६८ खरेदी केंद्रे सुरु केली. तर आतापर्यंत या केंद्रांवर केवळ ९ हजार गाठी कापसाची खरेदी झाली..Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या खरेदीअभावी शेतकऱ्यांचे शोषण .सीसीआयची कापूस खरेदी कमी होण्यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे यंदा पावसामुळे आतापर्यंत हाती आलेल्या कापसाची गुणवत्ता कमी झालेली आहे. कापसात काडीकचरा जास्त आहे. तसेच कापसाचा रंगही बदलल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच कापसात ओलावाही अधिक आहे. यामुळे हा कापूस सीसीआय खरेदी करत नाही. सीसीआय १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूसच खरेदी करते. तर आतापर्यंत कापसात ओलावा अधिक आला..तसेच सीसीआयची खेरदी केंद्रे राज्यात कमी आहेत. दोन खेरदी केंद्रांमधील अंतर खूपच जास्त आहे. कापूस कमी असेल तर शेतकरी या केंद्रांवर कापूस घेऊन जात नाहीत. त्याच प्रमाणे हेक्टरी कापूस खरेदीची मर्यादा यंदा सीसीआयने कमी केली. सीसीआयने घातलेल्या मर्यादेपेक्षा अनेक भागात यंदा कापसाचे उत्पादन जास्त आहे. यामुळेही सीसीआयची खरेदी आतापर्यंत कमी दिसत आहे. पण पुढील काळात कापसाची गुणवत्ता चांगली येऊ शकते. तसेच कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सीसीआयच्या खरेदीला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सीसीआयाने व्यक्त केला आहे..जागतिक उत्पादन वाढीचा अंदाजभारतात यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले तरी जागतिक पातळीवर उत्पादन वाढीचा अंदाज आहे. यूएसडीए अर्थात अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकताच नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर केला. ब्राझील, चीन, आफ्रिका, युरोपियन युनियन या देशांमध्ये कापूस उत्पादन वाढणार आहे. ब्राझीलमधील कापूस उत्पादन १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात उत्पादन कमी होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात उत्पादन गेल्या वर्षीच्या पातळीवर राहील, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला..अमेरिकेत यंदा कापसाची लागवड तब्बल १८ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे. पण यंदा तेथे कापसाची उत्पादकता वाढल्यामुळे उत्पादनातील घट तुलनेत कमी आहे. यंदा अमेरिकेत १०३४ किलो प्रति हेक्टर रुई उत्पादकता आली. गेल्या वर्षी ९९४ किलो उत्पादकता आली होती. त्यामुळे उत्पादनातील घट केवळ ३ टक्के आहे, असे यूएसडीएने म्हटले आहे. जागतिक कापूस उत्पादन वाढणार असले, तरी कापसाचा वापर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १ टक्क्याने कमी राहण्याची शक्यता आहे. तर यंदा चीन, व्हिएतनाम, बांगलादेशात कापसाची आयात वाढण्याची शक्यता आहे..जागतिक पातळीवर कापसाचा शिल्लक साठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज यूएसडीएने दिला आहे. एकंदरीत जागतिक पातळीवर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कापसाचा साठा चांगला राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील कापसाचा भाव ६२ सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. भारतातील कापसाच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे. अमेरिकेच्या कापसाच्या तुलनेत ब्राझीलचा कापूस स्वस्त आहे. अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये कापसाचा वापर कमी होतो. निर्यात जास्त होते. त्यामुळे येथील कापसाचे भावही कमी असतात. परंतु यामुळे जागतिक कापूस बाजारावर दबाव येतो. सध्या जागतिक कापूस दर या दोन्ही देशातील दरामुळे दबावात आहेत. याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसत आहे..देशांतर्गत बाजाराचे चित्रजागतिक बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आणि सरकारने मुक्त आयात केल्यामुळे विक्रमी आयात होत आहे. तर बाजारातील कापसाची आवकही वाढत आहे. पुढे देशातील पीक बाजारात यायचे आहे. असे असतानाही कापसाचे भाव स्थिर आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील घटलेले कापूस उत्पादन. तसेच गुणवत्ताही कमी झाली आहे..चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला उत्तर भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रति क्विंटल ७ हजार २०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सीसीआयची खरेदी वाढल्यानंतर गुणवत्तेचा कापूस बाजारात आणखी कमी राहील. सीसीआय जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी कापूस खरेदी करेल. तोपर्यंत शुल्कमुक्त आयात बंद झालेली असेल. सीसीआय खरेदी केलेला कापूस कमी भावात विकण्याची शक्यता कमीच आहे. मागील हंगामात सीसीआयने अगदी शेवटी भाव कमी केले होते. त्यामुळे सीसीआयची खरेदी जशी वाढत जाईल तसे खुल्या बाजारातही कापसाच्या भावाला आधार मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .या काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार वाटाघाटीत तोडगा निघाला आणि अमेरिकेने आयात शुल्क कमी केले तर देशातील कापसाचा वापर वाढण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे कापसाला मागणी येईल. या परिस्थिती कापूस बाजार साडेसात हजारांचा टप्पा पार करेल. तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दर ७७०० ते ७८०० रुपयांचीही पातळी दाखवू शकतात. पण सरकारने धोरण बदलल्यास त्याचाही बाजारावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.( लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.