Pune News: शेतीमालाच्या उत्पादन वाढीसाठी २०२५ हे वर्ष सकारात्मक ठरले. देशाने विक्रमी ३ हजार ५७७ लाख टन अन्नधान्य उत्पादन घेतले. पण अमेरिकेचे आयात शुल्क धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भाव आणि केंद्र सरकारचे शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याचे धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी आर्थिक निराशाच पडली आहे..शेतीविषयक घडामोडींच्या दृष्टीने २०२५ हे वर्ष धामधुमीचे ठरले. माॅन्सून चांगला राहिल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. केंद्रीय कृषी विभागाच्या अंदाजानुसार २०२५-२६ खरीप हंगामात अन्नधान्यांचे उत्पादन १७३३ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. खरीप २०२४-२५ मध्ये देशात १६९४ लाख टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते..यामुळे देशाची अन्नसुरक्षा आणखी भक्कम झाली आहे. पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठीही पोषक स्थिती आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि पडलेले बाजारभाव या दुहेरी संकटांचा सामना करावा लागला..Farmer Issue: कर्जाशिवाय अनुदान नाही अन् कर्जही मिळत नाही.देशातील शेतकऱ्यांनी बहुतांशी शेतीमालाचे उत्पादन वाढवले, तरी केंद्र सरकारची धोरणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे शेतीमालाचे दर दबावात राहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन आणि मका बाजारात निराशेचे वातावरण आहे. याचा फटका देशातील शेतकऱ्यांनाही बसला. यंदा कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, हरभरा या प्रमुख पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. तर कांद्याला मागील वर्षीच्या तुलनेत कमी भाव हाती आला..हमीभावापेक्षा कमी दरमहाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रमुख पिकांना बाजारात हमीभावाइतकाही दर मिळाला नाही. कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल ८११० रुपये असताना बाजारात बहुतांश काळ दर ७ हजारांच्या आसपास राहिला आहे. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये असताना बाजारात सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. मक्याचा हमीभाव २४०० रुपये असताना बाजारभाव १५०० ते १६०० रुपयांच्या आसपास राहिला..तुरीचा हमीभाव ८ हजार रुपये असताना ७ हजारांच्या खालीच तूर विकली जात आहे. तसेच मूग, उडदाचे भावही हमीभावापेक्षा २० ते २५ टक्के कमी आहेत. हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ८७५ रुपये असताना सध्या ५ हजारांच्या आसपास बाजारात हरभरा विकावा लागत आहे..Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’.आयातीचा असह्य माराशेतीमालाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने खुल्या आयातीचा मार्ग २०२५ मध्येही कायम ठेवला. त्यामुळे आयातीचा लोंढा सुरूच आहे. तुरीची मुक्त आयात ३१ मार्च २०२६ पर्यंत कायम असणार आहे. हरभरा आयातीवर १ एप्रिलपासून केवळ १० टक्के शुल्क लागू केल्याने आयात सुरूच आहे..वाटाणा आयातीवर १ नोव्हेंबरपासून ३० टक्के शुल्क लावले, पण ते पुरेसे नाही. मसूर आयातीवरही केवळ १० टक्के शुल्क आहे. सरकारने हरभरा, वाटाणा आणि मसूर आयातीवर शुल्क लावताना आयात सुरूच राहील, याचीही काळजी घेतलेली आहे. ऑगस्ट महिन्यात कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले त्यामुळे यंदा विक्रमी कापूस आयात होत आहे. प्रमुख शेतीमालाच्या आयातीला मोकळे रान मिळाल्यामुळे त्यांचे दर पडले आहेत..व्यापार युद्ध आणि करारअमेरिकेने व्यापार युद्ध छेडल्यानंतर जागतिक पातळीवर द्वीपक्षीय करारांची लाट पाहायला मिळाली. अमेरिकेने आयात शुल्क लागू केल्यानंतर भारतातून कापड, कोळंबी, चामड्याच्या वस्तू, भाजीपाला आणि फळे यांची निर्यात कमी झाली. त्यानंतर भारताने इतर बाजारपेठांचा शोध घेत द्वीपक्षीय करार केले..भारताने न्यूझीलंड, युके, ओमानसह काही देशांसोबत नव्याने द्वीपक्षीय व्यापार करार केले आहेत. याचा फायदा भारतीय शेतीलाही होत आहे. तर अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबत चर्चा सुरू आहे. यामुळे भारतीय शेतीमालासाठी २०२६ मध्ये या देशांची दारे खुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..शेतकऱ्यांची आंदोलनेदेशात २०२५ मध्ये शेतकरी आंदोलनाची धगही पाहायला मिळाली. प्रामुख्याने शेतीमालाला भाव, वीज, कर्जमाफी तसेच सरकारची आयात निर्यात विषयक धोरणे या विषयांवर आंदोलने झाली. हमीभावाला कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा, किमान मजदूर मोर्चाने पंजाब आणि हरियाना सीमेवर आंदोलन केले. शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी १२३ दिवस उपोषण केले. महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी आंदोलन झाले. तसेच मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसह अन्य राज्यांमध्येही विविध प्रश्नांवर शेतकरी आंदोलने झाली. वर्षाचा शेवटही बियाणे कायद्याविरोधात आंदोलनाने झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.