१) कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच (Cotton Arrival)
देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. कापसाचे भाव सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापूस सूत आणि कापडाला उठाव नसल्यामुळे भाव दबावात आसल्याचं सांगितलं जातं.
तर बाजारातील कापूस आवक सध्या सरासरीपेक्षा जास्तच आहे. बाजारात सध्या ४० हजार गाठींच्या दरम्यान आवक असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
२) सोयाबीन बाजारावर दबाव कायम (Soybean Market)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे आज काहीसे नरमले होते. सोयाबीनचे वायदे दीड टक्क्यांनी कमी होऊन १४.०३ डाॅलरवर होते. तर सोयापेंडचे वायदे अडीच टक्क्यांनी कमी होऊन ३९० डाॅलरवर आले होते.
देशातील बाजारात सोयाबीन ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांवर कायम आहे. बाजारातील सोयाबीन आवक १ लाख ६० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. सोयाबीनचा बाजार पुढील काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) जिऱ्याच्या भावातील तेजी वाढली (Jeera Rate)
देशात सलग दुसऱ्या वर्षी बदलते वातावरण आणि पावसामुळे जिरा उत्पादन कमी राहीले. यामुळे देशातील जिरा स्टाॅकही कमी झाला. पण दुसरीकडे जिऱ्याला बाजारात चांगला उठाव मिळाला. निर्यातीसाठी मागणी चांगली आहे. त्यातही चीनला होणारी निर्यात वाढली. यामुळे जिऱ्याच्या भावात वाढ झाली.
सध्या जिऱ्याचे भाव वायद्यांमध्ये प्रतिक्विंटल ५८ हजारांवर पोचले. तर बाजार समित्यांमधील भावही ५४ हजारांवर पोचला. हा भाव गेल्या १२ वर्षांतील उच्चांकी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) हळदीचे भाव टिकून (Turmeric Rate)
देशातील बाजारात मागील तीन आठवड्यांमध्ये हळदीच्या भावात चांगली सुधारणा झाली. वायद्यांमध्ये हळद तेजीत आहे. वायद्यांमध्ये मागील १५ दिवसांमध्ये तब्बल २० ते २२ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. १३ जून रोजी हळदीचे वायदे ७ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटलवर होते.
आज वायदे ९ हजार २०० रुपयांवर होते. गुरुवारी वायद्यांनी एकदा ९ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मागील दीड वर्षांत पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी ९ हजारांचा टप्पा गाठला. हळदीचे भाव पुढील काही दिवस तेजीत राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) कांदा दरात झालेली सुधारणा टिकेल का? (Onion Rate)
देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून कांद्याच्या दरात काहीशी सुधाराणा झाली. पण अद्यापही भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आज बहुतांशी बाजारातील सरासरी भावपातळी एक हजार रुपयांच्या दरम्यान होती. किमान भाव आजही ६०० रुपयांपर्यंत होता.
दरात काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आणखी भाववाढीची आशा निर्माण झाली. यंदा खरिप हंगामाकडून शेतकऱ्यांनी पुरती निराशा झाली. खरिपातून नफा तर सोडा साधा उत्पादन खर्चही निघाला नव्हता.
आतापर्यंत रबीतील कांदाही ७०० रुपयाने विकला गेला. पण मागील आठवडाभरापासून देशभरातील कांदा आवक काहीशी कमी झाली. त्यातच बदलत्या वातावरणामुळे कांद्याचे नुकसान वाढत आहे.
चाळीत कांदा खराब होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. पुढील काळात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कांदा दरात सुधारणा दिसून येत आहे. सध्या कांद्याला १ हजार ते १ हजार २०० रुपये सरासरी भाव मिळत आहे. कांदा दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.