तेलबियांचे जागतिक उत्पादन वाढण्याची शक्यता

एप्रिल महिन्यात कापसाच्या किमती वाढत होत्या. मका, हळद, हरभरा, तूर, मूग व सोयाबीन यांच्या किमती उतरत होत्या. कांद्याच्या किमतीसुद्धा उतरता कल दाखवत होत्या.
Oil Seed
Oil SeedAgrowon

सध्या देशातील कापूस, सोयाबीन, हळद, मूग, तूर व टोमॅटो यांची आवक कमी होत आहे. हरभऱ्याची आवक पण आता कमी झाली आहे. कांद्याची आवक वाढून सध्या ती साप्ताहिक ३ ते ४ लाख टन आहे. मक्याची साप्ताहिक आवक ४० ते ७० हजार टन आहे.

अमेरिकी शेती खात्याने (USDA) या महिन्यात निरनिराळ्या पिकांच्या जागतिक पुरवठ्याचे अंदाज प्रकाशित केले आहेत. सोयाबीनसाठी केलेल्या अंदाजानुसार २०२२-२३ या वर्षी सोयाबीनचे जागतिक उत्पादन विक्रमी १३ टक्क्यांनी वाढून ते ३९४.७ दशलक्ष टन असेल. या वाढीस मुख्यत्वे अमेरिका, ब्राझील, अर्जेन्टिना व पेराग्वे येथील वाढीव उत्पादन कारणीभूत असेल. अमेरिकेत मक्याखालील क्षेत्र कमी होऊन त्या ऐवजी सोयाबीन लावण्याचा कल दिसून येत आहे. तसेच चांगला भाव व अनुकूल विनिमय दरामुळे ब्राझील व अर्जेन्टिनामध्ये क्षेत्र व उत्पादकता दोन्ही वाढण्याचा अंदाज आहे. सर्व तेलबियांचे जागतिक उत्पादनसुद्धा ८.४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या प्रमाणात खप वाढण्याची शक्यता नसल्याने वर्षअखेर सोयाबीनचा साठा १६.८ टक्क्यांनी, तर सर्व तेलबियांचा साठा १५.४ वाढण्याचा अंदाज या अहवालात दिला आहे. हा अंदाज खरा ठरला तर सोयाबीनमधील तेजी कमी होईल.

या सप्ताहात हळद, तूर व कांदा यांच्या किमती घसरल्या. कापूस, मका व टोमॅटोच्या किमती वाढत आहेत. कांद्याचे भाव लक्षणीय कमी झालेले आहेत.

या सप्ताहात किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) एप्रिल महिन्यात वाढत होते. याही महिन्यात ते वाढत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४ टक्क्यांनी वाढून रु. ४८,२७० वर आले होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ५०,०८० वर आले आहेत. जून डिलिव्हरी भाव रु. ४८,२०० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा ३ टक्क्यांनी वाढून रु २,४३६ वर आले आहेत. कापसातील तेजी कायम राहील.

मका
मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात मात्र त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. २,२६२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.७ टक्क्याने वाढून रु. २,३०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमती रु. २,३०९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. मक्याचा वाढता इथेनॉलसाठी वापर, युक्रेन युद्ध व खताच्या वाढत्या किमती यामुळे मक्याच्या जागतिक किमतीसुद्धा वाढत आहेत.

हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात सुद्धा त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,२६८ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती १.८ टक्क्यांनी घसरून रु. ८,२०२ वर आल्या आहेत.

हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती एप्रिलमध्ये उतरत होत्या. याही महिन्यात त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ४,८०२ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक कमी होत आहे; सध्या ती (साप्ताहिक) ६०,००० ते ८०,००० टन आहे.

मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,७०० होती; या सप्ताहात ती ६,७०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) एप्रिल महिन्यात उतरत होती. याही महिन्यात ती घसरत आहे. गेल्या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,२१५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ०.७ टक्क्याने वाढून रु. ७,२६५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे.

तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) एप्रिल महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ६,०६७ वर आली होती. या सप्ताहात ती २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,९४० वर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com