Commodity Market: चीन आणि अमेरिकेतील ताणामुळे २०२५ मध्ये जागतिक सोयाबीन बाजारात बऱ्याच उलथापालथी बघायला मिळाल्या. चीनने खरेदी कमी केल्यामुळे अमेरिकेत सोयाबीनचा बाजार दबावात राहिला आणि त्याचे पडसाद जागतिक बाजारावर दिसले. पण चीनला शिंगावर घेणे अमेरिकेला महागात पडले, तर ब्राझीलने अतिफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्जेंटिनाने ऐनवेळी निर्यात धोरणात बदल करून संधी साधली. यावरून शेतीमालाविषयी देशाचे धोरण कसे असावे आणि कसे असू नये, या दोन्हींचा बोध घेता येईल..चीन हा सोयाबीनचा जगातील सर्वांत मोठा वापरकर्ता देश. आयातीतही चीन एका बाजूला आणि पूर्ण जग एका बाजूला असे चित्र दिसते. कारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन आयात एकटा चीन करतो. चीन दर वर्षी १ हजार लाख टनांपेक्षा जास्त सोयाबीनची आयात करतो. चीन सुरुवातीपासूनच इतर शेतीपिकांचे उत्पादन जास्त घेतो आणि सोयाबीन आयात करतो. सोयाबीन पिकविण्यापेक्षा आयात करणे चीनला परवडते, अशी मांडणी अनेक अभ्यासक करत असतात. अनेक दशके अमेरिका चीनचा मुख्य पुरवठादार होता. अगदी २०१८ पर्यंत अमेरिकेचा सोयाबीन उत्पादनात दबदबा होता..अमेरिकेत सोयाबीन उत्पादनासाठी पोषक हवामान, बियाणे, तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि महत्त्वाचे म्हणजे निर्यातीसाठी पायभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे अमेरिकेतून चीनला सोयाबीनची निर्यात वाढत होती. चीनने २०१७ मध्ये अमेरिकेकडून विक्रमी ३२० लाख टन सोयाबीनची आयात केली होती. अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ७८ टक्के सोयाबीन चीनने खरेदी केले. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांसाठी चीनची बाजारपेठ खूप मोठा आधार होती.Soybean MSP: सोयाबीनची हमीभाव खरेदी ठरतेय मृगजळ.ट्रम्प इफेक्टमागील अनेक दशके अमेरिका सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आणि चीन त्याचा मुख्य ग्राहक, अशी घडी बसली होती. पण ही पहिल्यांदा विस्कटली ती डोनाल्ड ट्रम्प यांनी. ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी २०१८ चीनसोबत व्यापार युद्ध छेडले. त्यांनी चीनच्या मालावर आयात शुल्क लागू केले. चीननेही अमेरिकेच्या सोयाबीनसह इतर मालावर आयात शुल्क लावले. या व्यापार युद्धाचा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना २ हजार ७०० कोटी डाॅलर्सचा फटका बसल्याचे वृत्त त्या वेळी प्रसिद्ध झाले होते..चीनसारख्या मोठ्या ग्राहक देशाला निर्यात थंडावल्याने भाव पडले होते. सोयाबीनचा साठा देशात पडून होता. सोयाबीन साठविण्याचा खर्च वाढत होता. तोपर्यंत ब्राझील सोयाबीन उत्पादनात अमेरिकेच्या मागे चालत होता. पण या व्यापार युद्धात ब्राझीलला संधी सापडली. व्यापार युद्धामुळे चीनने अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीनची आयात वाढविली आणि इथून सोयाबीनचे उत्पादन केंद्र ब्राझीलकडे सरकले..अमेरिकेने २०१६-१७ मध्ये ११६४ लाख टन सोयाबीन उत्पादन घेतले होते, तर ब्राझील ११४९ लाख टन उत्पादन घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर २०१७-१८ मध्ये ब्राझीलने १२३४ लाख टन उत्पादन घेतले, तर अमेरिकेत १२०० टन उत्पादन झाले होते. २०१८-१९ मध्ये दोन्ही देशांमधील उत्पादन सारखेच म्हणजे १२०५ लाख टनांवर होते. .परंतु व्यापार युद्धामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड कमी केली. परिणामी, २०१९-२० मध्ये अमेरिकेतील उत्पादन ९६६ लाख टनांवर स्थिरावले, तर ब्राझीलने विक्रमी १२८५ लाख टन उत्पादन घेतले. तेव्हापासून आजपर्यंत ब्राझील जगात सोयाबीन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे..Soybean Seed Production: सोयाबीन बीजोत्पादनात ‘होलोसेन’ची आघाडी.दुसरा हादरापहिल्या व्यापार युद्धानंतर शेतीमालासारख्या अत्यावश्यक मालासाठी एकाच देशावर अवंलबून राहणे धोक्याचे आहे, हा धडा घेत चीनने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व हळूहळू कमी केले. नंतर दोन्ही देशांमधील व्यापार पुन्हा सुरू झाला. बायडेन यांच्या काळातही अमेरिकेची सोयाबीन निर्यात चीनला सुरू राहिली पण प्रमाण कमी झाले. .२०१८-१९ मध्ये अमेरिकेच्या एकूण सोयाबीन निर्यातीपैकी केवळ ११ टक्के निर्यात चीनला झाली होती, जी आधीच्या वर्षी ४७ टक्के होती. मात्र २०२४-२५ मध्ये अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४६ टक्के सोयाबीन चीनला गेले होते. पण डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर चीन-अमेरिका सोयाबीन व्यापाराला दुसरा हादरा बसला..एप्रिल २०२५ मध्ये ‘टॅरिफ वाॅर’ सुरू झाले. ट्रम्प यांनी सुरुवातीला सर्वच देशांच्या वस्तू आयातीवर १० टक्के शुल्क जाहीर केले. त्यानंतर त्यात वाढ केली. त्यातही चीनला धारेवर धरत ट्रम्प यांनी २०१८ चा कित्ता गिरविला. ट्रम्प यांच्या शुल्काला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकेचीही कोंडी केली. अमेरिका सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी तिथे वापर कमी आहे..ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढविल्यानंतर चीननेही अमेरिकेच्या सोयाबीनवर २३ टक्के आयात लागू केले. याचा अमेरिकेच्या सोयाबीनला मोठा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात चीनने अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही खरेदी केला नाही. यामुळे अमेरिकेत सोयाबीनचे भाव दबावात आले. अमेरिकेला जगातील सर्वांत मोठ्या शेतीमाल आयातदार चीनला शिंगावर घेणे चांगलेच महागात पडले आहे..Soybean Procurement: सोयाबीनची आठ खरेदी केंद्रे वाढली.ब्राझीलने साधली संधीचीनला सोयाबीन हवे होते आणि अमेरिकेत सोयाबीनही होते, पण राजकीय ताणामुळे व्यापार युद्धात सोयाबीन अडकले. त्यामुळे चीनमधील आयातदारांनी आपला मोर्चा ब्राझीलकडे वळवला. ब्राझीलने गेल्या हंगामात विक्रमी उत्पादन घेतले होते. सोयाबीनचा साठाही होता. दुसरीकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक अर्जेंटिना सोयाबीन निर्यातीवर २६ टक्के निर्यात शुल्क लावून बसला होता. म्हणजेच ब्राझील हा एकमेव प्रमुख सोयाबीन पुरवठादार होता. याचा फायदा ब्राझीलने घेतला. ब्राझीलच्या निर्यातदारांनी विक्रमी सोयाबीन निर्यातीचा उद्देश ठेवला होता..चीन आपण सांगू त्या दराने सोयाबीन खरेदी करेल, हे माहीत असल्याने ब्राझीलमधील निर्यातदारांनी सोयाबीनचे भाव वाढवले. एप्रिल महिन्यातच सोयाबीनचे भाव तब्बल १० टक्क्यांनी वाढले. चीनमध्ये आयात सोयाबीनचा भाव ५०० डाॅलरवरून जवळपास ५५० डाॅलरपर्यंत पोहोचला होता..तर ब्राझीलमधील सोयाबीनचा स्पाॅटचा भाव ऑक्टोबर महिन्यात ४५७ डाॅलर प्रतिटनावर पोहोचला. एप्रिल ते ऑक्टोबर या काळातही सोयाबीनच्या भावात चांगली वाढ झाली होती. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील सोयाबीनच्या तुलनेत ब्राझीलच्या सोयाबीनचा भावही जास्त झाला होता. तरीही चीनची खरेदी सुरूच होती. मात्र हे पाहून ब्राझीलमधील निर्यातदारांच्या एका निर्णयाने बाजाराने पुन्हा नवे वळण घेतले..ब्राझीलमधील निर्यातदारांनी सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सोयाबीनचे भाव जवळपास १२ टक्क्यांनी वाढविले. आधीच एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनच्या भावात मोठी वाढ झाली होती. सुरुवातीला स्वस्त असलेले ब्राझीलचे सोयाबीन ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या तुलनेत ५० ते ६० डाॅलर प्रति टन महाग पडत होते. त्यातच ब्राझीलियन रिअलचे अवमूल्यन, महागाईत वाढ आणि सोयाबीन वाहतूक तसेच निर्यातीतील अडथळे यामुळेही भाववाढीला आधार मिळाला. भाव आणखी वाढतील या अपेक्षेने ब्राझीलचे शेतकरीही माल मागे ठेवत होते..त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीनची विक्री सरासरीपेक्षा कमी झाली होती. परिणामी, चीनसाठी सोयाबीनची उपलब्धता कमी झाली, दरही वाढत होते. यामुळे चीन अडचणीत आला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलमध्ये गेले. ब्राझीलने सोयाबीनची निर्यात वाढीव दराने न करता रास्त दराने करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पण ब्राझीलने ती मान्य केली नाही, असे वृत्त त्या वेळी आले होते..अर्जेंटिनाचे धोरण शहाणपणचीन अमेरिकेकडून सोयाबीन घेणार नाही आणि ब्राझीलएवढा पुरवठा इतर देशांकडे नाही, परिणामी चीन सोयाबीन घेणारच, असे गृहीत धरून ब्राझील सोयाबीनचे भाव कमी करण्यास तयार नव्हता. ब्राझील चीनच्या नडीचा फायदा घेत होता. पण जागतिक सोयाबीन बाजारात घडणाऱ्या या घडामोडींकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन उत्पादक अर्जेंटिनाचे लक्ष होते. अर्जेंटिना सरकारने सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीवर लावलेले २६ टक्के शुल्क सप्टेंबर महिन्याच्या शेवटी काढले..त्यामुळे चीनचे आयातदार लगेच अर्जेंटिनाकडे वळाले आणि ब्राझीलमधून आयातीचे करार रद्द केले. निर्यातशुल्क काढल्याने अर्जेंटिनाचे सोयाबीनही स्वस्त झाले. अमेरिका आणि ब्राझीलच्या सोयाबीनपेक्षा अर्जेंटिना स्वस्त सोयाबीन देत होता. ब्राझीलला पर्याय ठरू शकेल एवढे सोयाबीन अर्जेंटिनाकडे उपलब्ध नव्हते. पण चीनची तात्पुरती मागणी पूर्ण करण्याची क्षमता होती. याच काळात जानेवारीतील निर्यातीसाठी जवळपास ९० लाख टनांच्या आसपास करार झाले होते. तेव्हापासून अर्जेंटिनाच्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. एकंदर २०२६ च्या सुरुवातीला चीनच्या बाजारात अर्जेंटिनाच्या सोयाबीनचा पुरवठा असेल..चीन-अमेरिकेत सामंजस्याचा प्रयत्नमधल्या काळात चीन आणि अमेरिका यांच्यात सोयाबीनवरून काही तडजोडी झाल्या आणि चीनने यंदा १२० लाख टन सोयाबीन आयात करण्याचे मान्य केले. पण डिसेंबरच्या मध्यापर्यंत केवळ ७० लाख टन सोयाबीन चीनने आयात केल्याचे युसडीएच्या आकड्यांवरून दिसते. तसेच पुढील २ वर्षे चीन अमेरिकेतून वर्षाला २५० लाख टन सोयाबीन आयात करेल, असा समझोता झाल्याचेही वृत्त आहे. ब्राझीललाही आता आपल्या नव्या सोयाबीनची विक्री करायची आहे..अमेरिकेत नवे सोयाबीन बाजारात आले आहे. अमेरिकेला सोयाबीन विकायचे आहे. अर्जेंटिनातही एप्रिलपासून सोयाबीन येईल. त्यामुळे चीनकडे सोयाबीनसाठी पर्याय असतील. अमेरिकेने शुल्क लावले म्हणून ब्राझील पर्याय ठरला. तर ब्राझीलने भाव वाढवले म्हणून अर्जेंटिना पुढे आला. यापैकी ब्राझील आणि अर्जेंटिनाने चीन आणि अमेरिकेतील तणावाचा फायदा घेतल्याचे दिसते..या सगळ्यात अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत. तसेच अमेरिकेत सोयाबीनचे भाव कमी झाल्याने इतर देशांमधील बाजारावरही दबाव राहिला. कारण अमेरिकेतील बाजार जागतिक पातळीवर बेंचमार्क समजला जातो. आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात २०२५ मध्ये घडलेल्या या घडामोडींवरून एखाद्या देशाचे धोरण शेतीमालाविषयी कसे असायला हवे आणि कसे नसावे, हे स्पष्ट झाले आहे.(लेखक ‘ॲग्रोवन’ डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.