Pune News : केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरील शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काढले. त्यामुळे देशात कापसाची आयात वाढणार आहे. तर दुसरीकडे यंदा देशातील कापसाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी घटल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून दिसत आहे. परंतु तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदा कापूस उत्पादन अधिक राहील, असा अंदाज अमेरिकेचा कृषी विभाग (यूएसडीए) आणि उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे. म्हणजेच आयात जास्त आणि लागवड कमी होऊनही उत्पादन वाढीचा दबाव राहणार आहे..कृषी विभागाकडील २२ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात कापसाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी घटली. कापसाचे भाव कमी असल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने यंदा कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. यंदा कापसाची लागवड १०८ लाख हेक्टरवर झाली. मागील हंगामात १११ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सरकारच्या मते लागवड तीन टक्क्यांनी घटली असली तरी प्रत्यक्ष शेतकरी लागवडीतील घट जास्त असल्याचे सांगत आहेत..Cotton Production: कापूस उत्पादकता हेक्टरी ४ क्विंटल २२ किलो प्रस्तावित.गुजरात आणि महाराष्ट्रातील लागवड प्रत्येकी सात टक्क्यांनी घटली आहे. तर मध्य प्रदेशात कापसाचे क्षेत्र १८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. परंतु पंजाबमधील लागवड २० टक्क्यांनी तर राजस्थानमधील लागवड २७ टक्क्यांनी वाढली आहे. तर हरियानातील लागवड १६ टक्क्यांनी कमी झाली आहे. दक्षिण भारतातही लागवड यंदा ८ टक्के वाढल्याचे सरकारी आकड्यांवरून दिसत आहे. कर्नाटक आणि तेलंगणात कापूस क्षेत्र वाढले आहे..देशातील लागवड कमी झाली तरी यंदा पाऊसमान चांगले असल्याने देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीएवढे राहील, असा अंदाज यूएसडीएच्या मुंबई कार्यालयाने व्यक्त केला. यंदा पाऊस चांगला आहे. याचा पिकाला फायदाच होईल. त्यामुळे कापसाची उत्पादकता वाढून कापसाचे उत्पादन ३१४ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला. देशातील उद्योगांनीही आतापर्यंत पिकाचे फार नुकसान नसल्यामुळे यंदा उत्पादकता वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. परंतु पिकाची ऑगस्टच्या मध्यापर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज दिलेले आहेत. त्यामुळे हे प्राथमिक अंदाज आहेत. पण कापूस हाती यायला अजून वेळ आहे. कापसाची वेचणी उत्तर भारतात सुरू झाली तरी वेचणीला गती यायला दोन ते तीन आठवडे लागतील. गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यात ऑक्टोबरमध्येच कापूस हाती यायला सुरुवात होईल. या मधल्या काळात पाऊस कसा राहतो? पिकाचे नुकसान होते का? यावरून उत्पादकता निश्चित होईल..Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता.देशातील कापसाची लागवड आटोपली आहे. अनेक भागांत पीक दोन ते अडीच महिन्यांचे झाले. परंतु कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने चांगलाच तडाखा दिला. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात पिकाला जास्त प्रमाणात फटका बसला आहे. काही भागात सतत आठवडाभर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. पावसामुळे पिकाचे किती नुकसान होईल, यावरूनच कापूस उत्पादन किती राहील, याचा अंदाज बांधता येईल. त्यामुळे प्राथमिक अंदाज उत्पादन वाढीचा असला तरी प्रत्यक्षात स्थिती काय राहते, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल..कापूस दर दबावातकेंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा लगेच बाजारावर दबाव आला. सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर कमी झाले आहेत. सीसीआयने मागील ११ दिवसांमध्ये कापूस विक्रीचे दर खंडीमागे २५०० रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे बाजारातील भावही कमी झाले. सध्या देशात सीसीआय हाच सर्वात मोठा स्टाॅकिस्ट आहे. सीसीआयकडे अजून २७ लाख गाठी कापूस आहे. हा कापूस ३० सप्टेंबरपर्यंत विकण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे..नव्या हंगामात सीसीआय जास्त कापूस खरेदी करण्याच्या इराद्याने बाजारात उतरणार आहे. त्यापूर्वी आधीचा कापूस संपवण्याचे सीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे आयात कापसाचे भाव लक्षात घेऊन सीसीआय कापूस खंडीचेही भाव कमी करेल, यात दुमत नाही.कापूस आयातीचा दबाव बाजारावर आत्तापासूनच येत आहे. शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आल्यानंतर भावावर आणखी दबाव वाढणार आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांकडे हमीभावाने कापूस विक्री करणे हाच पर्याय असेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.