शेतीतील खेळत्या भांडवलासाठी अल्प मुदत कर्ज

सामान्यत: पीककर्ज हे संकरित बी-बियाणे खरेदी, खतांची खरेदी, किडनाशके, तणनाशके खरेदी, ट्रॅक्टर व अन्य यंत्र, अवजारांचे भाडे, मजुरी, वीजबिल, पाणीपुरवठ्यावरील खर्च, पीक काढणी, साठवणूक खर्च इ. बाबीसाठी दिले जाते.
Crop Loan
Crop LoanAgrowon

पिकाच्या व्यवस्थापनामध्ये (Crop Management) मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची (Working Capital For Agriculture) आवश्यकता असते. उदा. पूर्वमशागत, बी-बियाणे खरेदी (Seed), खते, कीडनाशके, तणनाशके, आंतरमशागत, पीक काढणी, पीक साठवण आणि विक्रीसाठी वाहतूक वगैरे अशा अनेक बाबींसाठी खर्च होत असतो. त्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज म्हणजेच पीककर्ज बॅंकेकडून उपलब्ध केले जाते. पीक उत्पादनाच्या कालावधीनुसार या पीककर्जाची (Crop Loan) परतफेड ठरवली जाते.

पीक कर्ज कोणाला मिळते?

 • वैयक्तिक शेतकरी, नोंदणीकृत भागीदारी फर्म, कंपनी आणि नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था.

 • स्वतःच्या नावे शेती असलेले प्रगतिशील शेतकरी वा संस्था.

 • संकरित बीज उत्पादक शेतकरी, बीज उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली बीज उत्पादन करतात.

पीककर्जाची रक्कम कशी ठरवतात?

पिकांची लागवड, प्रत्येक पिकास लागणारा खर्च (Cultivation Cost) , पीककर्जाचे ठरविलेले प्रमाण (Scale of Finance)

पीककर्ज प्रमाण (Scale of Finance) -

जिल्ह्यात लागवड होणाऱ्या पिकासाठी पीककर्ज प्रमाण हे जिल्हास्तरीय समिती ठरवते. या समितीचे आमंत्रक ही त्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक असते. तर समितीचे अन्य सभासद

१) जिल्ह्यातील प्रमुख बँकेचे प्रतिनिधी

२) जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक

३) निमंत्रित प्रगतिशील शेतकरी

४) नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आणि

५) राज्य शासनाच्या शेती विभागाचे प्रमुख.

ही समिती दर वर्षी जिल्ह्यातील पीक लागवडीस येणाऱ्या खर्चाचा विचार करून पीककर्ज प्रमाण ठरवते. ते पीककर्ज प्रमाण जिल्ह्यातील सर्व बँका अंमलात आणतात.

पीककर्जाविषयी अन्य नियम -

१) कर्ज तारण -

 • रु. १,६०,०००/- पर्यंत पीक हेच तारण.

 • रु. १,६०,०००/- पेक्षा जास्त कर्जासाठी पीक तारण आणि जमिनीचे गहाण खत.

(विविध सहकारी सोसायटी इकराराद्वारे पीककर्जाची नोंद केली जाते.)

२) स्वत:ची रक्कम -

 • रु. १,६०,०००/- पर्यंत : काही नाही

 • रु. १,६०,०००/- पेक्षा जास्त : २० ते २५ टक्के*

(*कर्जदार आणि त्याचे कुटुंबीय यांचे शेतातील काम हीच त्यांची स्वत:ची रक्कम होय. वेगळी रोख रक्कम लागत नाही.)

परत फेड -

 • पिकाचा परतफेडीचा कालावधी हा पिकानुसार ठरवला जातो.

व्याज दर -

अ) राष्ट्रीयीकृत बँक -

 • रु. ३ लाखांपर्यंत ः ७% दरसाल -पीककर्जाच्या मुदतीपर्यंत

 • रु. ३ पेक्षा जास्त ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा बँकेच्या दराप्रमाणे.

ब) जिल्हा मध्यवर्ती बँक -

 • बँक ते सोसायटीला : ४% दरसाल लहान व मोठ्या शेतकऱ्यांसाठी.

 • सोसायटी ते सभासद शेतकरी : ६% दरसाल.

(काही जिल्हा मध्यवर्ती बँका शून्य टक्के व्याजाने पीककर्ज देतात.)

रु. ३ लाखांपर्यंतच्या पीककर्जासाठी २ टक्के व्याजसवलत (सबव्हेंशन) हे पीककर्जाच्या रकमेवर त्याच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा कर्जदाराच्या वास्तविक परतफेड तारखेपासून किंवा बँकांनी निश्‍चित केलेल्या कर्जाच्या निश्‍चित तारखेपर्यंत मोजले जाते. जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन.

वेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ टक्के अतिरिक्त व्याज सवलत सबव्हेंशन करणे म्हणजे कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा शेतकऱ्यांनी परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत किंवा बँकांनी परतफेड करण्यासाठी निश्‍चित केलेल्या तारखेपर्यंत कर्ज, त्यापैकी जे आधी असेल, त्या वितरणाच्या तारखेपासून जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन असतील.

पीककर्ज आणि त्यावरील व्याज आकारणी -

 • पीककर्जाचा जो परत फेडीसाठीचा कालावधी असतो, तोपर्यंत या कर्जास सरळ व्याज दराने व्याज आकारले जाते.

 • दिलेल्या मुदतीत पीककर्जाची परत फेड न झाल्यास मुद्दल आणि मुदतीपर्यंत लावलेले व्याज यावरही व्याज आकारले जाते. मुदतीनंतर व्याजावर व्याज लागते. म्हणजेच पुढील आकारणी ही चक्रवाढ व्याज पद्धतीने होते.

किसान क्रेडिट कार्ड -

शेतकऱ्यांस जे अल्प मुदतीचे किंवा पीककर्ज मंजूर झालेले असते, त्या रक्कमेची नोंद एका क्रेडिट कार्डवर केली जाते. या क्रेडिट कार्डच्या साह्याने कर्जदार तितक्या रक्कमेची खते, बी-बियाणे व अन्य गरजेच्या निविष्ठांची खरेदी करू शकतो. म्हणजेच दरवेळी बॅंकेत जाऊन रोख रक्कम काढण्याची गरज भासत नाही. जितकी रक्कम काढली जाते, त्यावर व्याजाची आकारणी होते.

किसान क्रेडिट कार्डची उद्दिष्ट्ये -

शेतकऱ्यांच्या शेतीविषयक व अन्य गरजांसाठी, एकाच खिडकीमधून सुलभ व लवचिक कार्य पद्धतीने पुरेसे व वेळच्या वेळी कर्जरक्कम उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे. पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लघू मुदत कर्जाच्या गरजांची पूर्तता करणे,

 • कापणी व हंगामासाठी येणारा खर्च.

 • उत्पादनाच्या विक्रीसाठी होणारा खर्च.

 • शेतकऱ्यांचा घरखर्च.

 • शेती मालमत्ता व शेतीसाठी लागणारे खेळते भांडवल.

उदा. समजा पिकानुसार सर्व खर्चाचा विचार करून बँकेने रु. ३.०० लाख पीककर्ज मंजूर केले. त्या वेळी त्या शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्डचे मूल्य ३ लाख रुपये असते. म्हणजेच आपल्याला मंजूर झालेल्या पीककर्जाचीच नोंद त्यावर केलेली असते. या पीककर्जाच्या मर्यादेमध्ये आपण निविष्ठांची खरेदी करू शकतो. रोख रक्कम काढू शकतो.

किसान क्रेडिट कार्डचा वापर -

१) शाखेमार्फत व्यवहार करता येतात.

२) चेकने व्यवहार.

३) एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरून.

४) बिझनेस कॉरस्पॉडंट्स व बँकिंग आउटलेट्स/पार्ट टाइम बँकिंग आउटलेटद्वारे व्यवहार करून.

५) विशेषतः जोडणी अग्रिम राशीसाठी साखर कारखाने किंवा करार शेतीमध्ये कार्यरत कंपन्यांमध्ये असलेल्या पीओएस (Point Of Sale) मार्फत.

६) खत, कीडनाशके व बी-बियाणे वितरकांकडे असलेल्या पीओएस मशिनद्वारे.

७) शेती माल व्यापारी व मंडईमध्ये मोबाईल आधारित हस्तांतर व्यवहार करून.

कर्जदारास फायदे -

१) इतर वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत व बँकेच्या वेळेत जावे लागते. सुट्टीच्या दिवशी पैसे काढता येत नाहीत. मात्र किसान क्रेडिट कार्डमुळे आठवड्याचे सातही दिवस, २४ तास कधीही एटीएममधून पैसे काढता येतात. बँकेत जाण्याचा वेळ वाचतो.

२) खते, बी-बियाणे आणि कीडनाशकांची खरेदी करता येते.

३) रोख पैसे बाळगण्यातील धोके कमी होतात.

४) आवश्यकतेवेळीच कार्ड वापरून पैसे काढल्याने तितक्याच कर्जाचा वापर होतो. म्हणजे तेवढे कमी व्याज भरावे लागते.

बँकेसाठी फायदे -

१) बँकेत रोखीचे व्यवहार कमी होतात,

२) कर्जदारास बँकेत जावे लागत नसल्यामुळे बँकेत गर्दी व ताण कमी,

३) बँकेच्या सेवा खर्चात बचत.

४) ग्राहकास समाधानकारक सेवा देणे सुलभ होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com