देशातून तेलबिया पेंड निर्यातीत मोठी घट

एसईएच्या (SEA) मते, भारतात सोयाबीनचे दर अधिक आहेत. त्यामुळे पुढील २ ते ३ महिने सोयापेंडचे दर स्पर्धात्मक राहण्याची शक्यता नाही. तसेच सोयाबीनचे गाळप कमी होत आहे. परिणामी सोयाबीन तेलाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे सोयाबीन तेल आयात वाढत आहे.
Oilseed meal
Oilseed meal

पुणे -  देशातून एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांत तेलबिया पेंड (Oilseedmeal) निर्यातीत ३४ टक्क्यांनी घट झाली. तर जानेवारी महिन्यात निर्यात ६५ टक्क्यांनी घसरली. दक्षिण कोरियाने ५ लाख टनांची आयात करून भारतीय तेलबिया पेंडेचा सर्वांत मोठा ग्राहक ठरला. तर दुसरा क्रमांक व्हिएतनामचा आहे, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (The Solvent Extractors  Association of India) अर्थात सोपाने सांगितले. सोयापेंड आणि मोहरीपेंड निर्यातीती झालेली मोठी घट एकूण निर्यात घटीस कारणीभूत ठरली, असेही सोपाने सांगितले.

चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी या काळात देशातून १९ लाख ४३ हजार टन तेलबिया पेंड निर्यात झाली होती. तर मागील आर्थिक वर्षात याच काळात देशातून २९ लाख ६९ हजार टन तेलबिया पेंड विदेसात पाठवली गेली. फक्त जानेवारी महिन्याचा विचार करता यंदा १ लाख ७६ हजार टन पेंड निर्यात झाली. तर मागील वर्षी हाच आकडा ५ लाख टनांवर होता, असे एसईएने म्हटले आहे.

एसईएच्या (SEA) मते, भारतात सोयाबीनचे दर (Soybean Rate) अधिक आहेत. त्यामुळे पुढील २ ते ३ महिने सोयापेंडचे दर स्पर्धात्मक राहण्याची शक्यता नाही. तसेच सोयाबीनचे गाळप कमी होत आहे. परिणामी सोयाबीन तेलाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे सोयाबीन तेल आयात वाढत आहे. मागील हंगामात एप्रिल ते जानेवारी या काळात ११ लाख ७१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. मात्र यंदा केवळ ३ लाख १५ हजार टन सोयापेंड विदेशात गेले. केवळ सोयापेंड निर्यातीचाच विचार करता ७३ टक्क्यांनी घटली आहे.

देशात मागील तीन महिन्यांपासून गाळपासाठी मोहरीची (Mustard) उपलब्धता नाही. त्यामुळे मोहरीपेंड निर्यात (Mustardmeal Export) प्रभावित झाली. मागील हंगामात मोहरीचे मोठ्या प्रमाणात गाळप झाले. परिणामी आता मोहरी उपलब्धतेसाठी झगडावे लागत आहे. नवीन मोहरी मार्च महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातून एप्रिल ते जानेवारी या काळात ७ लाख २९ हजार टन मोहरी पेंड निर्यात झाली. तर मागील हंगामात याच काळात ९ लाख ९० हजार टन पेंडेची निर्यात झाली होती, असेही एसईएने म्हटले आहे.  

व्हिडीओ पाहा - भारतीय तेलबिया पेंडेचे मुख्य आयातदार

भारतीय तेलबिया पेंडचा दक्षिण कोरिया सर्वांत मोठा आयातदार देश ठरला आहे. दक्षिण कोरियाला भारताने ५ लाख टन तेलबिया पेंडेची निर्यात झाली. यामध्ये २ लाख ४४ हजार टन मोहरी पेंड, २ लाख २८ हजार टन एरंडीपेंड आणि ३५ हजार टन सोयापेंडचा समावेश आहे. व्हिएतनामला देशातून ४ लाख ७८ हजार टन तेलबिया पेंडेची निर्यात झाली. यात राईब्रान एक्सट्राक्शन जवळपास ४ लाख टन होते. बांगलादेशही भारतातून मोहरीपेंड आणि राईसब्रान एक्सट्राक्शनची आयात करते. बांगलादेशला २ लाख ९० हजार टन तेलबिया पेंडेची निर्यात झाली. तर थायलंडला दीड लाख टन, तैवानला ७७ हजार टन आणि अमेरिकेला ५८ हजार टन तेलबिया पेंडची निर्यात झाली.  

सध्या देशात सोयाबीन गाळपातील मार्जिन दरवाढीमुळे कमी झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना सोयाबीनला जास्त दराची अपेक्षा असल्याने बाजारात कमी माल आला. सध्या सोयाबीनचे दर साडेसहा हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत. सध्या भारतीय सोयापेंडेचे दर ७८५ डाॅलर प्रतिटन आहेत. तर ब्राझीलची सोयापेंड ५९५ डाॅलर आणि अर्जेंटीनाची सोयापेंड ५७५ डाॅलर प्रतिटनावर आहेत. - भारत मेहता, कार्यकारी संचालक, साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com